पावनखिंड दौड — राष्ट्रभक्ती, इतिहासप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संगम

शिक्षण विवेक    14-Jul-2026
Total Views |
mes
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला, डेक्कन जिमखाना, पुणे येथे दिनांक १३ जुलै २०२६, सोमवार रोजी "पावनखिंड दौड" या प्रेरणादायी उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. हा उपक्रम केवळ धावण्याची स्पर्धा नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील शौर्य, त्याग आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनामनांत जागवणारा एक ऐतिहासिक व संस्कारमय उपक्रम ठरला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली प्रसंग म्हणजे पावनखिंडीचा संग्राम. इ.स. १६६० मध्ये शिवाजी महाराज विशाळगडाकडे सुरक्षित प्रस्थान करत असताना शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या मावळ्यांसह प्राणांची पर्वा न करता शत्रूला खिंडीत रोखून धरले. त्यांच्या अद्वितीय पराक्रमामुळे महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहोचले आणि स्वराज्याचे रक्षण झाले. या अमर बलिदानाची स्मृती जागवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, धैर्य, नेतृत्वगुण व इतिहासाबद्दल अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने या दौडीचे आयोजन करण्यात आले.
दौडीची सुरुवात सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या आवारातून झाली. विद्यार्थ्यांनी खंडोजी बाबा चौक – गुडलक चौक – फर्ग्युसन रोड – बी.एम.सी.सी. कॉलेज रोड – गोखले इन्स्टिट्यूट मार्गे – फर्ग्युसन कॉलेज – हनुमान टेकडी असा उत्साहपूर्ण मार्ग पूर्ण केला. संपूर्ण मार्गावर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना प्रकर्षाने जाणवत होती.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थीना, इतिहास व साहित्यप्रेमी अभिजित अंबेकर याने शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनकार्यावर प्रभावी व्याख्यान सादर केले. विद्यार्थ्यांना स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचे महत्त्व समजले आणि इतिहासाविषयी अभिमानाची भावना अधिक दृढ झाली.
दौडीचे औचित्य साधून हनुमान टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रप्रेमाबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा हा स्तुत्य प्रयत्न होता. तसेच विद्यार्थ्यांना बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावरील माहितीपूर्ण चित्रफीत दाखविण्यात आली. या चित्रफितीमुळे विद्यार्थ्यांना इतिहासाचा जिवंत अनुभव मिळाला आणि त्यांच्यात प्रेरणा, जिद्द व देशसेवेची भावना अधिक बळकट झाली.
या प्रेरणादायी उपक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. रोहिदास भारमळ सर, पर्यवेक्षिका सौ. जयश्री शिंदे मॅडम, ज्युनिअर कॉलेजचे योगेशचंद्र देवळालकर सर, क्रीडाशिक्षक श्री. गणेश हिले सर तसेच श्री. धनराज प्रजापती सर यांची उपस्थिती लाभली.
उपक्रमाच्या शेवटी दौडीत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
"पावनखिंड दौड" हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात शौर्य, त्याग, राष्ट्रभक्ती, इतिहासप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांची प्रभावी रुजवण होत राहील. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये सुदृढ शरीर, सशक्त मन आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा जागृत होईल,