पुणे, दि. १४ जुलै २०२६ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत पद्मभूषण डॉ. आबासाहेब गरवारे यांच्या सहचारिणी, शिक्षणसेवा, संस्कार आणि समाजकार्यास प्रेरणादायी योगदान देणाऱ्या सौ. विमलाबाई गरवारे यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात व कृतज्ञताभावाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ सर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी सौ. विमलाबाई गरवारे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा आणि गरवारे परिवाराने शिक्षण क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
या प्रसंगी गरवारे ट्रस्टचे सर्वेसर्वा श्री. सुनील सुतावणे सर, प्रशालेचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, उपमुख्याध्यापिका सुनिता गायकवाड, पर्यवेक्षिका जयश्री शिंदे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
गरवारे ट्रस्टच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या गुणवंत विद्यार्थी पारितोषिकांचे वितरण. यावर्षी इयत्ता दहावीतील प्रसाद जनार्दन झोरे, बारावी विज्ञान शाखेतील सचिन राहुल भिसे आणि बारावी वाणिज्य शाखेतील साक्षी संजय काटकर या विद्यार्थ्यांचा प्रत्येकी रु. ५,०००/- रकमेचा धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी साठी एक लाख रुपए रकमेचा धनादेश मा. मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केला.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करत उपस्थितांनी त्यांचे उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.
इयत्ता दहावीच्या शिवनेरी वर्गातील कु. शर्वरी येनपुरे हिने आपल्या मनोगतातून सौ. विमलाबाई गरवारे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या साधेपणा, संस्कार आणि शिक्षणप्रेमाचा भावपूर्ण परिचय करून दिला.
प्रमुख पाहुणे सुनील सुतावणे सर यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत प्रेरणादायी संवाद साधला. त्यांनी शशिकांत गरवारे आणि भूमिका गरवारे यांनी शिक्षणसेवेचा समृद्ध वारसा समर्थपणे पुढे नेल्याचे सांगितले. भारतीय संस्कृतीतील "मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव" या मूल्यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. आई-वडील व गुरुजन हेच जीवनाचे खरे शिल्पकार असून त्यांच्या संस्कारांमुळे व्यक्तिमत्त्व घडते, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आदर्श नागरिक बनण्याचा संकल्प करावा, प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, आई-वडील, शाळा आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रशाला विविध शैक्षणिक, स्वच्छता, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये सातत्याने यश संपादन करत असल्याबद्दल त्यांनी शाळेचे विशेष कौतुक केले.
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा संयमित व मर्यादित वापर करावा, वेळेचे योग्य नियोजन करून ध्येयपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न करावेत, मनाचा दृढ निश्चय ठेवावा आणि कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता योग्य मार्गाचा स्वीकार करावा, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचेआभार प्रदर्शन प्रशालेच्या शिक्षिका सौ. मेघना देशपांडे मॅडम यांनी केले.
पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने हार्दिक अभिनंदन💐💐💐