इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेमध्ये आषाढस्य प्रथम दिवस: म्हणजे कालिदास दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्गवाणीवरुन कालिदासांचे अजरामर काव्य मेघदूताविषयी माहिती सांगण्यात आली.
प्रशालेच्या पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर यांनी प्रास्ताविक केले.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी 'कालिदास:जने जने' हे गीतगायन केले. नाट्यरुपामध्ये कालिदासांविषयी दंतकथा नववीतील सृजन शिंदे, प्रतीक जेधे, रोहित कादबाने, श्रेयांस एडके यांनी सादर केली.
प्रमुख पाहुण्या संस्कृत अभ्यासक सौ.सविता दाणी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कालिदासांचा साहित्याचा अभ्यास करण्याचा संदेश दिला. आपली वेदपरंपरा, पाणिनीची शास्त्रशुद्ध व्याकरणशास्त्ररचना यामुळे संस्कृतभाषा संगणकासाठी
खूप उपयुक्त आहे म्हणून विद्यार्थ्यांनी या भाषेचा अभ्यास करावा असे सांगितले.
प्रशालेत घेतल्या जाणाऱ्या कविकुलगुरु कालिदास विद्यापीठ आयोजित संस्कृत प्रज्ञाशोध,मेधाशोध, प्रतिभाशोध, या परीक्षेमध्ये तसेच संस्कृतभारतीच्या सरला, सुगमा, सरसा,सुखदा या परीक्षांमध्ये राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर विशेष योग्यता प्राप्त केलेल्या ४५ विद्यार्थ्यांचा यावेळी बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत विभाग प्रमुख वर्षा गानू यांनी केले तर ऋणनिर्देश शितल चौधरी यांनी व्यक्त केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा माने, उपमुख्याध्यापक महेश जोशी, पर्यवेक्षक अंजली गोरे यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.