पुणे : कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक (नागपूर) यांच्या विस्तार सेवा मंडळांतर्गत रवीकीर्ती संस्कृत अध्ययन केंद्र, सांगली यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय संस्कृत स्पर्धा परीक्षेत डी.ई.एस. न्यू इंग्लिश मीडियम स्कूल (एन.ई.एम.एस.), शनिवार पेठ, पुणे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या परीक्षेत प्रशालेतील आठ विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पारितोषिके, १५ विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय यश, तर सात विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरील पारितोषिके प्राप्त झाली.
राज्यस्तरावर पारितोषिक प्राप्त विद्यार्थी : श्रेया चिंतामणी वाळवेकर, सृष्टी सुयश कुलकर्णी, स्वरदा केदार राजगुरू, स्वरूप पियुष तिवारी, नीरजा रोहित गांधिले, सार्थक सुयश कुलकर्णी, रेयांश ऋषिकेश नाणेकर आणि अवनी सागर लांजेकर यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने शाळेचा गौरव वाढविला.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल प्रशालेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख तसेच माध्यमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका आसावरी सिंगासने यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे सहकार्य आणि प्रशालेतील संस्कृत शिक्षिका नीरजा बेलसरे, अनघा पोळेकर आणि अक्षदा इनामदार यांचे सातत्यपूर्ण व मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संस्कृत विषयाविषयी विद्यार्थ्यांमध्ये अधिक प्रेरणा निर्माण झाली आहे.