
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या संकल्पनेतून साकार झालेला 'पर्यावरणपूरक पंढरीची वारी ' हा अभिनव उपक्रम म .ए .सो.भावे प्राथमिक शाळा येथे उत्साहात संपन्न झाला . शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे , डॉ. उमेश बिबवे (संचालक, क्रीडा विभाग, म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शाळेचे माजी विद्यार्थी, प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापिका ललिता कारंडे तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या आवारात गुलाब, कोरफड, कडुलिंब, गवती चहा, ओवा, लिंबू, शतावरी आणि बेल या औषधी व उपयुक्त वनस्पतींची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनीही या रोपांचे संगोपन करून पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घेण्याची प्रतिज्ञा केली.
संस्थेने माजी विद्यार्थ्यांना पंढरीच्या वारीच्या मार्गावर किंवा ज्या ठिकाणी त्यांना शक्य होईल त्या ठिकाणी एक भारतीय वंशाचे झाड लावण्याचे आवाहन केले . या उपक्रमामुळे शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे शाळेशी असलेले भावनिक नाते अधिक दृढ होण्यास मदत झाली. हरित वारी घडवूया .... निसर्ग जपूया.....आणि आपल्या शाळेशी व संस्थेशी पुन्हा एकदा नातं दृढ करूया !हा संदेश माजी विद्यार्थ्यांना देण्यात आला .माजी विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमास भरघोस प्रतिसाद दिला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारी प्रभावी भाषणे सादर केली तसेच वृक्षारोपणावर आधारित गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
माननीय मुख्याध्यापिका ललिता कारंडे व माननीय उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनापासून कौतुक करत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होण्यास मदत झाली. तसेच वृक्षारोपणाच्या माध्यमातून निसर्गप्रेम, पर्यावरणाबद्दलची सामाजिक जबाबदारी अधिक दृढ करण्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला