संदेशात्मक पालखी व ग्रंथदिंडीतून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण, वाचन आणि जलसंवर्धनाचा संदेश

शिक्षण विवेक    23-Jul-2026
Total Views |
des
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडीयम प्रायमरी स्कूल, शनिवार पेठ, पुणे येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने "संदेशात्मक पालखी" आणि "ग्रंथदिंडी" उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी संतपरंपरा, पर्यावरण संवर्धन, भारतीय ज्ञानप्रणाली, पाणी संवर्धन, वाचन संस्कृती, शिस्त, एकता आणि सामाजिक जबाबदारी यांचा प्रभावी संदेश दिला.
शाळेतील दोन्ही सत्रांतील विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेत वारकरी परंपरेचा आनंद अनुभवला. संतपरंपरेअंतर्गत विद्यार्थ्यांना संतांचे जीवनकार्य, विचार आणि शिकवणीची माहिती देण्यात आली. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी कागदी भगवे झेंडे तयार करून वारकरी परंपरेप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.
पर्यावरण संवर्धनासाठी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी झाडांच्या फळांपासून गोळा केलेल्या बियांपासून बीजमृद्गोल (बीजगोळे) तयार केले. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी हे बीजमृद्गोल टेकडी व मैदान परिसरात रोवून वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक बीजफूल तयार केले, तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रापासून कागदी पिशव्या तयार करून प्लास्टिकचा वापर टाळावा व दैनंदिन जीवनात कागदी पिशव्यांचा वापर करावा, असा पर्यावरणपूरक संदेश दिला.
भारतीय ज्ञानप्रणाली या विषयाअंतर्गत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा, संस्कार, सेवा आणि ज्ञानपरंपरेचे महत्त्व पटवून दिले. पाणी संवर्धनासाठी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी "गरज जलसंवर्धनाची" या विषयावर आकर्षक पोस्टर्स तयार करून जनजागृती केली.
ग्रंथदिंडी हा उपक्रमही विशेष आकर्षण ठरला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी "ज्ञानाची पालखी, ज्ञानाचा प्रकाश – वाचूया ग्रंथ, करूया विकास" तसेच "पुस्तकों से पाएँ ज्ञान, जानें भाषाएँ, विज्ञान" या घोषवाक्यांद्वारे वाचन संस्कृतीचे महत्त्व प्रभावीपणे मांडले आणि सर्वांना नियमित वाचनाचा संदेश दिला.
शिस्त व एकता या संकल्पनेवर आधारित उपक्रमात इयत्ता पहिली व चौथीच्या विद्यार्थ्यांनी पालखीचे प्रात्यक्षिक सादर केले. आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावरील प्रमुख गावांचे मैलाचे दगड तयार करून वारकरी संप्रदायातील शिस्त, एकोपा आणि सामूहिक भावनेची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली.
या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. हेमांगी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक करून भारतीय संस्कृती, पर्यावरण संरक्षण, वाचनाची आवड आणि सामाजिक मूल्ये जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या समारोपास सर्व विद्यार्थी, शिक्षक व उपस्थितांनी जलसंवर्धनाची शपथ घेऊन पाणी वाचविण्याचा आणि जलसंवर्धनासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा दृढ संकल्प केला.