पालखी सोहळ्यानिमित्त 'टाळ मृदुंगाच्या गजरात 'आमची शाळा आनंदी पंढरी' असे म्हणत रमणबागेतील छोट्या वारकऱ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
शुक्रवार दि.24 जुलै रोजी संत परंपरेचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत आणि वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत वारी सोहळ्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापक आशा माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर मंजुषा नागपुरे तर अध्यक्षस्थानी शालासमिती अध्यक्ष मिलिंद कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध संत व वारकरी, विठ्ठल, रुक्मिणी वेशभूषा साकारत टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडी काढली. अभंग, भजन, अश्वरिंगण अशा भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण शालेय परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. शेवटी प्रत्यक्ष विठ्ठल
प्रशालेमध्ये अवतरले.
प्रमुख पाहुण्या मंजुषा नागपुरे यांनी आपल्या मनोगतात, विद्यार्थ्यांनी संतांचे विचार आचरणात आणून समाजात सद्भावना, समता आणि सेवाभाव जोपासावा, असे आवाहन केले. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून सेवावारी अंतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती, त्यामध्ये उत्कृष्ट चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
या संपूर्ण देखण्या वारीसोहळ्याचे सादरीकरण नाट्यछंदविभागप्रमुख रवींद्र सातपुते यांच्या मार्गदर्शनानाने तीनशे विद्यार्थ्यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन उपमुख्याध्यापक महेश जोशी, पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर यांनी केले.
यावेळी शिक्षक प्रतिनिधी सुधा लांडे या उपस्थित होत्या.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय वर्षा गानू यांनी करुन दिला, तर ऋचा कुलकर्णी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास देशपांडे यांनी केले.कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.