डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे च्या नवीन मराठी शाळा,सातारा येथे गुरुपौर्णिमेचा पवित्र आणि प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. शालाप्रमुख सौ. तनुजा तिकोने मॅडम यांनी उपस्थितांचे स्वागत करून गुरुपौर्णिमेचे महत्त्व आपल्या प्रास्ताविकातून विशद केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व गुरुपौर्णिमेविषयीची माहिती सौ. मनिषा मोरे यांनी दिली.
यानंतर श्री. मिलिंद पवार यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तिरसपूर्ण गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध गुरु-शिष्य जोड्यांवरील लघुनाट्यप्रसंग होय. यामध्ये श्रीकृष्ण–सांदीपनी ऋषी, अर्जुन–द्रोणाचार्य, धौम्य ऋषी- अरुणी, छत्रपती शिवाजी महाराज–राजमाता जिजाऊ, संत ज्ञानेश्वर–मुक्ताई, रामकृष्ण परमहंस–स्वामी विवेकानंद, महात्मा ज्योतिराव फुले–सावित्रीबाई फुले , सचिन तेंडुलकर- रमाकांत आचरेकर, श्याम–श्यामची आई ,आई -मुलगा शिक्षक- विद्यार्थी अशा प्रेरणादायी गुरु-शिष्य जोड्यांचे प्रभावी सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. प्रत्येक नाट्यप्रसंगातून गुरुंचे मार्गदर्शन, संस्कार, ज्ञान, कर्तव्यनिष्ठा आणि जीवनमूल्यांचे महत्त्व प्रभावीपणे उलगडून दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अभिनयाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती मनिषा चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.
शालासमितीचे अध्यक्ष मा. श्री. सारंग कोल्हापुरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. गुरुपौर्णिमेच्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांप्रती आदर, कृतज्ञता आणि संस्कारांची जपणूक करण्याची प्रेरणा निर्माण झाली.