गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

शिक्षण विवेक    30-Jul-2026
Total Views |

mes
दि. २९ जुलै २०२६ (बुधवार): महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. संपूर्ण सभागृहात गुरुंबद्दलचा आदर, कृतज्ञता आणि संस्कारमय वातावरण अनुभवायला मिळाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री तिजारे सर यांच्या तबल्याच्या सुरेल साथीने व पोतदार सर यांच्या पेटीच्या मधुर स्वरांवर विद्यार्थ्यांनी गुरुस्तवन सादर केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीफळ, तुळशीची रोपे तसेच विविध फुलझाडांची रोपे भेट देऊन गुरुजनांचा सन्मान केला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही अभिनव भेट होती.
यावेळी प्रशालेच्या शिक्षिका सौ. केशर जाधव मॅडम यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. त्यांनी महर्षी वेदव्यास यांच्या महान कार्याचा उल्लेख करत भारतीय ज्ञानपरंपरेत गुरुचे स्थान सर्वोच्च असल्याचे स्पष्ट केले. आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, संगणक आणि इंटरनेट यांसारखी साधने उपयुक्त असली तरी विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे, संस्कार घडविणारे आणि व्यक्तिमत्त्व विकसित करणारे आई-वडील आणि शिक्षक हेच खरे पहिले गुरु आहेत, असे त्यांनी आपल्या मनोगतात अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करत गुरुजनांचा आदर राखावा, असा मोलाचा संदेशही त्यांनी दिला.
कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ सर, उपमुख्याध्यापिका सौ. सुनिता गायकवाड मॅडम, पर्यवेक्षिका सौ. जयश्री शिंदे मॅडम, ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख
श्री. योगेशचंद्र
देवळालकर सर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका सौ. स्वप्नाली देशपांडे मॅडम यांनी केले . उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक
शुभेच्छा