निसर्ग, संस्कार आणि ज्ञानाचा संगम : गुरु अद्वैता उमराणीकर यांचे मार्गदर्शन

शिक्षण विवेक    30-Jul-2026
Total Views |

des

शनिवार पेठेतील
एन.ई.एम.एस शाळेत निसर्ग संवर्धन दिवस आणि गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून,इयत्ता ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात निवृत्त शिक्षिका आणि लेखिका सौ.अद्वैता उमराणीकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. महर्षी व्यास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, तुळशीच्या छोट्या रोपट्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेबद्दल माहिती, गुरु शिष्य आधारित कथा सांगितल्या .*निसर्ग हा देखील गुरु*आहे ,यावर आधारित ग.दि माडगूळकर यांच्या कवितेचे अभिवाचन करण्यात आले. पक्षी हरवत चालले आहेत यावर शाळेतील एका विद्यार्थिनीने स्वरचित कविता देखील सादर केली.
निसर्गातील झाडे, नद्या, सूर्य, पक्षी या प्रत्येक घटकांकडून आपण कोणते गुण घ्यावे हा संदेश विद्यार्थ्यांनी घोषणा फलकाद्वारे दिला.
त्यानंतर अद्वैता उमराणीकर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीच त्यांची मुलाखत घेतली व त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेतले.बदललेल्या अभ्यासक्रमानुसार
इयत्ता ६वी च्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना त्यांनी लिहिलेला चिमणीचं घरटं हा पाठ समाविष्ट करण्यात आला आहे, विद्यार्थ्यांना त्यांना शाळेत भेटून आनंद झाला.
योगायोग म्हणजे शाळेतील शिक्षिका शिवानी फडके आणि अक्षदा इनामदार ह्या दोघी प्रमुख अतिथींच्या शिष्या असल्याने त्यांनी गुरु अद्वैता उमराणीकर यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले.
प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना पुस्तके वाचा, कथा ऐका, निसर्गाचे संवर्धन करा असा संदेश दिला.
"गुरूंचा मान राखू, ज्ञानाचा दीप तेवत ठेवू,संस्कार जपू आणि निसर्गाचे रक्षण करू" अशी शपथ सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित घेतली.
विशेष कौतुकाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांनीच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. हेमांगी देशमुख यांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सर्वांचे कौतुक केले.