नवीन मराठी शाळेत डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संस्थापक दिन, ऑगस्ट क्रांतीदिन व ‘शिक्षण विवेक’ मासिकाचा वर्धापन दिन उत्साहात

शिक्षण विवेक    11-Aug-2026
Total Views |
des
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संस्थापक दिन, ऑगस्ट क्रांतीदिन तसेच ‘शिक्षण विवेक’ या शैक्षणिक मासिकाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाला समितीचे अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन आणि संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. ‘शिक्षण विवेक’च्या वर्धापन दिनानिमित्त ऑगस्ट महिन्याच्या विशेष अंकाचे प्रकाशन मुख्याध्यापिका हेमा जाधव, ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे, शिक्षिका योगिता भावकर तसेच संस्थापकांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.
“देशभक्त क्रांतिकारकांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन डेक्कन एज्युकेशन सोसायटीने जपलेला राष्ट्रीय शिक्षणाचा वसा विद्यार्थ्यांनी पुढे न्यावा आणि राष्ट्रसेवेसाठी योगदान द्यावे,” असे प्रतिपादन मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी प्रास्ताविकातून केले.
शिक्षिका अर्चना देव यांनी ऑगस्ट क्रांतीदिनाचे महत्त्व सांगत शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या शौर्याची प्रेरणादायी कथा विद्यार्थ्यांना सांगितली. शिक्षिका स्वप्ना वाबळे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक दिनाची माहिती देत संस्थापकांच्या शैक्षणिक व राष्ट्रनिर्माणाच्या कार्याचा परिचय करून दिला.
संस्थापक दिनानिमित्त नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला. बँकॉक येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत आंतरराष्ट्रीय रौप्यपदक मिळविणारा निमिष करडे, तसेच राष्ट्रीय पातळीवरील तायक्वांदो स्पर्धेत यश संपादन करणारे कृष्णराज खाकुर्डीकर व राघव घाटणेकर या नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘शिक्षण विवेक’ आयोजित ‘शिक्षण माझा वसा’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या शिक्षिका मनीषा कदम यांचाही डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, वामन शिवराम आपटे आणि महादेव बल्लाळ नामजोशी या संस्थापकांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संस्थापकांच्या विचारांचा आणि राष्ट्रकार्याचा संदेश दिला.
नागरिक सोशल फाउंडेशन आयोजित ‘संपूर्ण वंदे मातरम् गायन स्पर्धेत’ एकूण ३० संघांमध्ये नवीन मराठी शाळेने तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल गायन शिक्षिका वैशाली पाटील, सुषमा घडशी तसेच सहभागी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
क्रांतिकारकांचा इतिहास, संस्थापकांचे कार्य आणि विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी सादरीकरण यामुळे संपूर्ण वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून गेले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, त्याग, देशसेवा आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजविण्याचे शाळेचे कार्य कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना देव व स्वप्ना वाबळे यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी योगिता भावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी गायत्री बेलसरे व शीतल जाधव यांनी सहकार्य केले.