डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शनिवार पेठेतील एन. ई. एम.एस. शाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
स्व-रूपवर्धिनीच्या सहकार्यवाह, बाल व महिला विभाग प्रमुख श्रीमती. पुष्पाताई नडे या सन्माननीय अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आलेली इयत्ता दहावीच्या वर्ष २०२५-२६ च्या परीक्षेत प्रथम आलेल्या नीरजा राजगुरू हिने संयम व शिस्त पाळून देशाचे नाव अजून ऊंच नेऊया असे सर्वांना आवाहन केले. श्रीमती. पुष्पाताई नडे यांनी भारतीय सणांचे महत्त्व सांगून मुलींनी, महिलांनी सक्षम व आत्मनिर्भर होऊन आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभं रहावं असा मोलाचा संदेश दिला.
ध्वजारोहणानंतर एन. ई. एम. एस. व नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत, तसेच राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि समूहगीत सादर केले. या देशभक्तिपर गीतांनी संपूर्ण शाळेचे वातावरण देशभक्तीने भारून गेले.
कार्यक्रमाच्या वेळी एन.ई.एम.एस. प्रशालेचे अध्यक्ष श्री. अमित कुलकर्णी, रानडे बालक प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.अमिता दाते, नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. हेमा जाधव तसेच एन. ई. एम. एस. शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती. शिल्पा कुलकर्णी, श्रीमती. हेमांगी देशमुख, श्री. प्रीतम जोशी आणि श्रीमती. आसावरी सिंगासने , सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन एन.ई.एम.एस. शाळेचे क्रीडा शिक्षक, कला शिक्षक यांनी केले व सूत्रसंचालन शिक्षिका अक्षता इनामदार यांनी केले.