
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत श्रावणी शुक्रवार उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थी पारंपरिक व रंगीत वेशभूषेत नटून-थटून शाळेत आले होते. विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण शाळेचे वातावरण आनंदमय झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवी व जीवतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. माननीय मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व आरती करण्यात आली.शाला समिती अध्यक्ष डॉ . दिलीप शेठ व डॉ .मानसी भाटे यावेळी उपस्थित होते .
श्रावणी शुक्रवारनिमित्त शाळेत सत्यनारायण महापूजेचेही आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती, परंपरा व सणांचे महत्त्व समजावून देण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले .सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले . शाळेतील पदाधिकारी, शिक्षकवृंद व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.