पुणे: शनिवार दिनांक १/०८/२०२६ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने बालसभेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सूचना काढण्यापासून ते फलक लेखन,कार्यक्रमपत्रिका तयार करणे,रांगोळी , सूत्रसंचालन, चहापान तयारी, माईक व्यवस्था, प्रास्ताविक,आभार इत्यादी सर्व गोष्टी इयत्ता तिसरी चौथीत शिकणाऱ्या छोट्या मुलांनीच केली होती. इयत्ता चौथीमध्ये शिकणारा चिरंजीव राघव घाटणेकर हा विद्यार्थी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होता तर कृष्णाराज खाकुर्डीकर हा विद्यार्थी लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत,नील पुराणिक हा विद्यार्थी अण्णाभाऊ साठे यांच्या वेशभूषेत आला होता.
आनंदी भरते या विद्यार्थिनीने पोवाडा सादर केला आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेतील कृष्णराजने विद्यार्थी मित्रांना "खूप शिका ,मोठे व्हा, कला जोपासा." असा संदेश दिला. अण्णाभाऊ साठे यांच्या वेशभूषेतील नील ने , "गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करा."असा संदेश दिला.अमेय गुरव आणि कल्याण मोने या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.
भैरवी चांदोरकर या विद्यार्थिनीने आभार मानले . कार्यक्रमाचे अध्यक्ष राघव घाटणेकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांची व अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन त्यांच्या प्रमाणे निडर व संयमी बना असा संदेश दिला.
मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी या बालसभेच्या उत्तम आयोजनाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता३री व ४थीतील प्रत्येक वर्गातून एका विद्यार्थ्याने लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांची माहिती,गोष्ट, पोवाडा व काव्य सादर केले. ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे, योगिता भावकर यावेळी उपस्थित होते. शिक्षिका भाग्यश्री हजारे, रूपाली सावंत, अर्चना देव, स्वप्ना वाबळे यांनी आयोजन सहाय्य केले.