
गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत कृतज्ञता निधी संकलन उपक्रमाचा शुभारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करून शैक्षणिक कार्याला हातभार लावण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाला समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा व माजी विद्यार्थिनी डॉ. मानसी भाटे आणि मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे ,माननीय उपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांच्या हस्ते आद्य गुरु महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांनी प्रास्ताविकातून कृतज्ञता निधी संकलन उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. शिक्षणसंस्थेने समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव करत संस्थेच्या विकासासाठी सर्वांनी स्वयंस्फूर्तीने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
या समारंभास शाळेचे माजी विद्यार्थी, माजी पालक, शिक्षक - पालक संघाचे प्रतिनिधी तसेच पालक उपस्थित होते. संस्थेविषयीची आत्मीयता आणि कृतज्ञता व्यक्त करत अनेक माजी विद्यार्थी तसेच शिक्षक-पालक संघाच्या प्रतिनिधींनी कृतज्ञता निधीसाठी धनादेश सुपूर्द केले .
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे माजी विद्यार्थी, पालक आणि शाळा यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षणसंस्थेच्या उन्नतीसाठी आपल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.
कृतज्ञतेची भावना दृढ करणारा आणि शिक्षणसेवेला बळ देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वीरीत्या संपन्न झाला