रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा उत्साहात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी

शिक्षण विवेक    01-Sep-2026
Total Views |

des
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, शनिवार पेठ, पुणे येथे दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा हा सण उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
प्रेम, बंधुभाव, कृतज्ञता आणि निसर्गसंवर्धनाचा सुंदर संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेचे महत्त्व सांगून या सणामागील प्रेम, आपुलकी, संरक्षण आणि कृतज्ञतेची भावना उलगडून सांगितली. इयत्ता तिसरीच्या दोन्ही सत्रांतील विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करून आपल्या कलागुणांना सुंदर व्यासपीठ मिळवून दिले. नृत्य, निवेदन तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मकतेची व उत्स्फूर्त सहभागाची सुंदर झलक दाखवली.
द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांच्या स्नेहबंधाची कथा
सकाळ विभागात शिक्षिका ज्योती पवार  व दुपारच्या विभागातील कार्यक्रमात शेखर दादा यांनी महाभारतातील द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांच्या स्नेहबंधाची कथा विद्यार्थ्यांना सांगितली. या कथेतून प्रेम, विश्वास, मैत्री, आपुलकी आणि परस्पर संरक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजले.
या कथेशी संबंधित “चिंधी बांधते द्रौपदी...”
हे भावपूर्ण मराठी गीत वैदेही मावशी यांनी सादर केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना कथा आणि त्या कथेवर आधारित गीत यांचा सुंदर आणि प्रभावी अनुभव घेता आला. कथाकथन आणि संगीताच्या माध्यमातून पौराणिक प्रसंग विद्यार्थ्यांपर्यंत अधिक परिणामकारकपणे पोहोचविण्याचा हा सुंदर प्रयत्न ठरला.
कार्यक्रमातील विशेष क्षण म्हणजे शाळेतील प्रमोद सर, देविदास सर, शेखर दादा व आदित्य दादा यांना व्यासपीठावर आमंत्रित करून विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधली तसेच जे आपले सामाजिक मदतनीस आहेत त्याची वेशभूषा करून आलेल्या इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना देखील राखी बांधली आणि त्यांच्याप्रती प्रेम, आदर व कृतज्ञता व्यक्त केली.
निसर्गाशी बांधली प्रेमाची राखी
रक्षाबंधनाचा संदेश केवळ मानवी नात्यांपुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनी तो निसर्गाशीही जोडला. शाळेच्या परिसरातील झाडांना तसेच काही औषधी वनस्पतींना राखी बांधून त्यांच्या संरक्षण व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.
“निसर्ग आपल्याला भरभरून देतो, म्हणून त्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.”
हा सुंदर संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
औषधी वनस्पती : पारंपरिक ज्ञानाचे जतन
इयत्ता चौथीच्या शिक्षिका नॅन्सी गवारे यांनी “आपल्या पारंपरिक औषधी ज्ञानासाठी एक राखी”
या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींचे महत्त्व समजावून सांगितले. विविध औषधी वनस्पतींच्या छायाचित्रांच्या माध्यमातून त्यांची माहिती देण्यात आली. तसेच या वनस्पतींचे जतन, संवर्धन आणि संरक्षण का आवश्यक आहे, याचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देण्यात आले.
या उपक्रमातून आपल्या पूर्वजांनी जपलेले पारंपरिक औषधी ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच निसर्गातील मौल्यवान वनसंपत्तीचे रक्षण करण्याचा संदेश देण्यात आला.
पर्यावरणपूरक बांबू राखी निर्मिती
शाळेत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सणांविषयी जनजागृती करण्यासाठी *‘बांबू राखी मेकिंग’** कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता सहावीच्या सकाळ व दुपार सत्रातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उस्फुर्तपणे सहभाग घेतला. भारतीय संस्कृती आणि पर्यावरणसंवर्धन यांचा सुरेख संगम या उपक्रमातून साधण्यात आला.
प्लास्टिक व सिंथेटिक साहित्याला निसर्गात सहज विघटन होणारा पर्याय उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांच्या हस्तकला व कलात्मक कौशल्यांना वाव देणे आणि लहान वयापासूनच पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणे, ही या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे होती.
व्यक्तिमत्त्व विकासाची संदेश देणारी आगळीवेगळी राखी
शाळेच्या कला शिक्षिका अपूर्वा आरगे आणि रुपाली कनोजे यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध घटकांवर आधारित एक आकर्षक आणि नाविन्यपूर्ण मोठी राखी तयार केली.
या राखीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध घटकांची माहिती  सकाळ विभागात "चित्रकलेच्या शिक्षिका श्रीमती अपूर्वा व दूपार विभागात क्रीडा शिक्षक देविदास सर यांनी विद्यार्थ्यांना सोप्या व समजण्यासारख्या भाषेत समजावून सांगितली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध गुणांचे महत्त्व समजले.
या आगळ्यावेगळ्या राखीमागील संकल्पना, तिचे महत्त्व आणि त्यातील नावीन्य त्यामुळे रक्षाबंधन, व्यक्तिमत्त्व विकास, कला आणि मूल्यशिक्षण यांची सुंदर सांगड घालण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती हेमांगी देशमुख मिस यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या विविध कलागुणांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमास इयत्ता तिसरीच्या शिक्षिका मनिषा पेठकर व सुवर्णा पवार यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, विविध कलागुणांचे सादरीकरण, कथाकथन व गीत, पर्यावरणपूरक बांबू राखी निर्मिती, औषधी वनस्पतींचे जतन व संवर्धन तसेच व्यक्तिमत्त्व विकासाचा संदेश देणारी नाविन्यपूर्ण राखी यामुळे रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेचा हा सोहळा आनंददायी, नाविन्यपूर्ण आणि सामाजिक व पर्यावरणीय जाणीव निर्माण करणारा ठरला.