भगवद्गीता प्रत्येक भारतीयाने दैनंदिन जीवनात अंगीकारावी, शिरीष भेडसगावकर यांचे आवाहन
पुणे, २७ ऑगस्ट : अमेरिकन शास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपेनहायमर आणि भारताचे माजी राष्ट्रपती व महान शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांना ज्या भगवद्गीतेने प्रेरित केले, त्या भगवद्गीतेचा आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार करावा, असे आवाहन रा. स्व. संघाच्या भगवद्गीता शिक्षण विभागाचे अखिल भारतीय प्रमुख श्री. शिरीषजी भेडसगावकर यांनी संस्कृत दिनानिमित्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, शनिवार पेठ, पुणे यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘संस्कृत श्रुती पुस्तकम्’ अर्थात संस्कृत ऑडिओ बुकचे आज श्रावण पौर्णिमा अर्थात संस्कृत दिनानिमित्त श्री. शिरीषजी भेडसगावकर यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.
संस्कृत भाषा विद्यार्थ्यांना अधिक सहजपणे ऐकता, समजता आणि शिकता यावी, तसेच संस्कृत शब्दांचे शुद्ध उच्चार त्यांच्या कानावर पडावेत आणि या समृद्ध भाषेची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने ‘संस्कृत श्रुती पुस्तकम्’ या अभिनव उपक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
‘ऐकणे – समजणे – शिकणे आणि संस्कृतशी मैत्री करणे’ या संकल्पनेवर आधारित या ऑडिओ बुकमध्ये बोधकथा, सुभाषितमञ्जरी, गीतामञ्जरी, शब्दमञ्जरी तसेच या उपक्रमाच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेणारा बी.टी.एस. विभाग समाविष्ट करण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आवाजातून विविध संस्कृत साहित्याचे ध्वनिमुद्रण केले असून, वाचन, उच्चार, ध्वनिमुद्रण, संपादन आणि सादरीकरण अशा विविध टप्प्यांतून या ऑडिओ बुकची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सहभागातून तयार झालेले हे श्रुती पुस्तक संस्कृत शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे अभिनव पाऊल ठरले आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेयस्तरावर शिष्यवृत्ती परिक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थांचे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, सी. ए. श्री. विवेक मठकरी
अध्यक्ष, वित्त समिती, डी. ई. एस.
सदस्य, परिषद व नियामक मंडळ तसेच विश्वस्त, डी. ई. एस., शाळेच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख, शिल्पा कुलकर्णी, आसावरी सिंगासने, सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. संस्कृत भाषेतूनच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीचे विद्यार्थी सृजन आगाशे ani स्वराली इंगवले यांनी केले तर आभार प्रदर्शन शंतनु शिंदे याने केले.