बुधवार दि. 9 सप्टेंबर 2026
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग,
प्रशालेचे माजी विद्यार्थी १३वे लष्कर प्रमुख दिवंगत जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या जन्मशताब्दी निमित्त, साकारण्यात आलेल्या स्मृतिशिल्पाचे अनावरण, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत यांच्या आज हस्ते करण्यात आले.
या अनावरण समारंभाला अरुणकुमार वैद्य यांच्या कन्या पारिजात बेलीअप्पा आणि नीता कोचर यांच्यासह जावई ब्रिगेडियर अरुण कोचर उपस्थित होते.
जनरल अरुणकुमार वैद्य यांच्यासारखे सुपुत्र आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी असून 1965 आणि 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात जनरल त्यांनी प्रत्यक्षात रणांगणावर लढा दिला, ते प्रसंग या स्मृतिशिल्पात कोरण्यात आले आहेत. त्यातून सध्याच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा हेतू आहे.
ऑलिव्ह ग्रीन व्हेंचर्स फाउंडेशन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून हे स्मृतिशिल्प तयार केले गेले आहे. प्रशालेचे माझी उपमुख्याध्यापक जयंत टोले यांनी फायबर ग्लासच्या माध्यमातून हे स्मृतिशिल्प तयार केले असून शाळेच्या दर्शनी भागात ते लावण्यात आले आहे.
आजच्या अध्यक्षीय समारंभापूर्वी प्रशालेतील छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी एनसीसी विभागप्रमुख राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रेरणा गीत आणि पोवाडा गायन झाले. शाहीर हेमंत मावळे आणि सहकाऱ्यांनी जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या जीवनावर आधारित पोवाडा यावेळी सादर केला.
प्रशालेचे माजी विद्यार्थी कर्नल रामचंद्र देशपांडे यांनी यावेळी युद्धकथा सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कित्येक दशकांपूर्वी शाळेतून बाहेर पडलेला एक विद्यार्थी देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचला, यासाठी आपण अभ्यासावर तर लक्ष केंद्रित केलेच पाहिजे, शिस्तही पाळली पाहिजे असे सांगून कृष्णनीतीचा अवलंब आवश्यक असल्याचे रावत यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा माने यांनी केले तर मान्यवरांचा परिचय दिपाली चौघुले यांनी करुन दिला. कर्नल अवधूत ढमढेरे यांनी स्मृतिशिल्प उभारण्यामागची भूमिका स्पष्ट करताना दर महिन्यातील एका शनिवारी विद्यार्थ्यांसाठी युद्ध कथांचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.
या स्मृतिशिल्पाजवळच प्रशालेच्या 1992 च्या विद्यार्थ्यांनी मैत्री कट्टा उभारला असून माजी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष अशोक पलांडे, कार्यवाह दीपक काळे, शाळा समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे आजीव सदस्य डॉ.शरद अगरखेडकर, उपमुख्याध्यापक महेश जोशी, पर्यवेक्षक मंजुषा शेलूकर, माजी विद्यार्थी जयप्रकाश भट, नितीन शास्त्री, श्रीकांत पेंडसे यावेळी उपस्थित होते.पर्यवेक्षक अंजली गोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली, तर सुहास देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड प्रशालेच्या छात्रसेना विभागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना घेऊन शिक्षक भरत महाजन, प्रविणराज रांगोळे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. प्रशालेचे माजी मुख्याध्यापक, शिक्षक,अनेक मान्यवर माजी विद्यार्थी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.