न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबर रोजी ऋषिपंचमीनिमित्त ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचे पूजन करण्यात आले.
यावेळी ह. भ. प. मोरेश्वरबुवा जोशी , पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि श्री. राजेंद्र नहार या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचे विद्यार्थ्यांनी मंत्रघोषात पाद्यपूजन करुन स्वागत केले. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील ऋषि-परंपरा, गुरुंचे महत्त्व आणि समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आदर्श यांची ओळख व्हावी, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आपल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक आशा माने यांनी सांगितला. अवनीश जवळेकर या विद्यार्थ्याने वैदिक ब्रह्मणस्पती सूक्त म्हटले. शालासमितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.यावर्षीच्या ग्रंथ गणेशोत्सवाच्या कार्याध्यक्षा ऋचा कुलकर्णी यांनी मान्यवरांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना ह. भ. प. मोरेश्वरबुवा जोशी यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधताना “ऋषींनी समाजावर संस्कार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा,” असा संदेश दिला.
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी ऋषिपंचमी का साजरी करावी, यामागील सांस्कृतिक व सामाजिक भूमिका स्पष्ट केली. “जे जवळ राहून ज्ञान देतात कुठलाही भेदभाव करत नाहीत, ते ऋषी,” अशी ऋषींची व्यापक संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली. ऋषिंचे कुळ न विचारता त्यांच्या कार्याकडे डोळसपणे पाहावे आणि विद्यार्थ्यांनी भविष्यात असे कार्य करावे की ज्यातून समाजात आपले नाव निर्माण होईल, असे आवाहन त्यांनी केले.
प्रशालेचे माजी विद्यार्थी राजेंद्र नहार यांनी आपल्या मनोगतात, “ रमणबाग प्रशालेतील शिक्षकांमुळे मी घडलो. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणतेही कार्यक्षेत्र निवडा परंतु एक चांगला माणूस म्हणून घडा असा मौलिक संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा जक्का यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सुहास देशपांडे व हेमंत पाठक यांनी करून दिला. गणेशोत्सवाच्या उपकार्याध्यक्षा सुधा लांडे यांनी उपस्थितांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपमुख्याध्यापक महेश जोशी, पर्यवेक्षक अंजली गोरे व मंजुषा शेलुकर यांनी मार्गदर्शन केले.