उदगीर, दि. १७ सप्टेंबर २०२६ : येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लाल बहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त डॉ.मोहिनी आचोले यांच्या हस्ते प्रमुख ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे होते.प्रमुख वक्ते चंद्रचकोर कारखाने होते.यावेळी भा.शि.प्र. संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समिती कार्यवाह शंकरराव लासुणे,संस्था सभासद चंद्रकांतजी धनबा, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
मराठवाडा मुक्ती दिनाचे महत्त्व विशद करताना प्रमुख वक्ते चंद्रचकोर कारखाने यांनी मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, त्याग व संघर्ष यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवून विद्यार्थ्यांनी देशभक्ती, सामाजिक बांधिलकी, शिस्त व राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कलोपासक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील तसेच शिक्षण विवेक आयोजित काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील सहशिक्षक बाळाराम निवृत्ती बानापुरे यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे इयत्ता तिसरी ते पाचवीच्या इंग्रजी विषयाच्या नवीन अभ्यासक्रम निर्मितीत अभ्यासक्रम निर्मिती समिती सदस्य म्हणून केलेल्या योगदानाबद्दल तसेच तालुकास्तरीय सुलभक म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल भा.शि.प्र. संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समिती कार्यवाह शंकरराव लासुणे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय समारोप करताना व्यंकटराव गुरमे यांनी मराठवाडा मुक्ती दिन हा केवळ इतिहासाचे स्मरण करण्याचा दिवस नसून स्वातंत्र्य, लोकशाही आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव दृढ करण्याचा दिवस असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा व समाजाचा विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. शाळेतील विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी केले. सूत्रसंचलन श्याम गौंडगावे यांनी केले, तर आभार श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.