आला रे आला गणपती बाप्पा आला,
आनंदाचा सोहळा बाशिमच्या दारी चालला,
सुपासारखे कान ,चंदेरी मस्तक,
विद्यार्थ्यांचा लाडका तो विघ्ननाशक.
विद्येची,बुद्धीची देवता म्हणजे आपला गणपती बाप्पा.
शाळेतील बालमित्र -मैत्रिणींना आरोग्य,स्वच्छता, पर्यावरण इत्यादी अनेक बाबतीत त्यांना माहीत असलेल्या गोष्टीत भर पडावी म्हणून यावर्षी शालेय गणेशोत्सवातील सजावट वैशिष्ट्यपूर्ण ठरली.
दुनिया जीवनसत्वांची
विद्यार्थ्यांना आरोग्याच्या दृष्टीने आहारातील फळभाज्या,फळे यांचे महत्त्व समजावे म्हणून सजावटीत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून थ्रीडी स्वरूपातील साहित्य बनवून सजावट करण्यात आली.
मंगळवार दि.15/09/2026 रोजी दुनिया जीवनसत्वांची या माध्यमातून फळभाज्या, फळे इत्यादींचे आकार,रंग, मराठीतील व इंग्रजीतील नावे इ. समजावेत म्हणून तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित आहारात ते खाणे का महत्वाचे आहे याविषयी अधिक माहिती मिळावी म्हणून फळे व फळभाज्यांची प्रत्यक्ष मांडणी करून त्यातून मिळणाऱ्या पोषक घटकांविषयी विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करण्यात आली. नाविन्यपूर्ण अशा सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळेतील विद्यार्थ्यांनी गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष पठण ,पर्यावरणावर आधारित गाणी ,सामाजिक संदेश देणारे नाटक इ.शाळेत तसेच शालेय परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळासमोर सादर केले.
यात पुढील मंडळांचा समावेश होता.
विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट, भांडारकर रोड.
या ठिकाणी शाळेतील पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या 350 विद्यार्थ्यांना नेण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून शाबासकी मिळविली. मंडळातर्फे व विद्यमान नगरसेवक शाळेचे माजी विद्यार्थी मा.श्री.सुनील पांडे यांच्या सहकार्याने शाळेतील पाच विद्यार्थ्यांच्या खर्च प्रतिपूर्तीसाठी श्री.नवल किशोर राम आयुक्त पुणे महानगरपालिका यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला.
सारस्वत बँक,डेक्कन जिमखाना शाखा
बँकेतर्फे विद्यार्थ्यांसाठी रंग भरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येक इयत्तेतून तीन विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. तसेच बँकेच्या मॅनेजर मा.रुपा जामखेडकर यांनी शाळेतील शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
श्रीकृष्ण मंडळ ट्रस्ट,खंडोजी बाबा चौक,डे.जि
चॉकलेटचा बंगला बघण्यासाठी क्षेत्रभेटीच्या माध्यमातून इयत्ता तिसरी ते चौथीच्या शंभर विद्यार्थ्यांना या ठिकाणी नेण्यात आले.
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी आम्हा बाशिमवासियांना
एकंदरीत नेहमीप्रमाणे मोठ्या आनंदात, उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.