दरवर्षीप्रमाणे यंदाही म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आनंदाने बाप्पाचे स्वागत केले.
मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी गणपतीची विविध नावे सांगितली व लिहिली. तसेच क्ले मातीपासून गणपतीच्या मूर्ती तयार केल्या. विद्यार्थ्यांनी शाडूच्या गणपतीच्या मूर्ती सुंदर रंगांनी रंगवल्या. गणपतीची सुंदर चित्रे काढून ती रंगविण्यात आली.
*गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी ग्राहक पेठ येथे जाऊन स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर केले. या पथनाट्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तसेच विद्यार्थ्यांनी मंडई येथील शारदा गणपतीसमोर अथर्वशीर्षाचे सुस्वरात पठण केले.*
मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचे सुस्वरात पठण केले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणपतीची गोष्ट सांगितली, तर विद्यार्थ्यांनी या गोष्टीचे नाट्यरूपांतर करून सादरीकरण केले आणि सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण शाळेत गणेशोत्सवाचा उत्साह, भक्तिभाव आणि आनंदी वातावरण अनुभवायला मिळाले.
शाला समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ आणि महामात्रा डॉ. मानसी भाटे यांनीही गणपती बाप्पाच्या आरतीस उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.