डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत मंगळवार दिनांक एक सप्टेंबर रोजी अखिल भारतीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, उपशिक्षणाधिकारी विराज खराटे यांच्या प्रेरणेने करण्यात आले. हा मेळावा जिल्हा परिषद, पुणे, माध्यमिक शिक्षण विभाग व राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कार्यकारण भाव समजून घेऊन विश्लेषणात्मक विचारांची जागृती करणे,स्पर्धात्मक वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करुन भावी वैज्ञानिकांना विचारांच्या आदान प्रदानाची संधी उपलब्ध करून देणे, देशात विखुरलेल्या प्रज्ञावान युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणे ही उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद कोलकता दरवर्षी अखिल भारतीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करत असते. यावर्षीच्या विज्ञान मेळाव्याचा विषय 'भारतीय ऊर्जा क्षेत्र - 2047 भवितव्य संधी आणि आव्हाने'असा होता. यामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी तालुकास्तर, जिल्हास्तर, विभाग स्तर, आणि राज्यस्तर असे विजेते होऊन पुढे जाणार आहेत. मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानी असलेले
शालासमिती अध्यक्ष श्री. मिलिंद कांबळे यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजेत तरच ते नवनिर्मितीचा ध्यास घेतील असे विचार मांडले.
आपल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापिका आशा माने यांनी ऊर्जेच्या क्षेत्रात भारताला प्रगत करण्यासाठी डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी या विज्ञान मेळाव्यातून शालेय शिक्षण विभागाने तुमच्यावर सोपवली आहे, ती तुम्ही समर्थपणे पेलाल यात शंका नाही, असा विश्वास व्यक्त केला.
या स्पर्धेविषयीच्या सूचना, नियम व अटी नू.म.वि.प्रशालेच्या शिक्षिका आरती टोके यांनी सांगितले. सर्व परीक्षक तसेच मान्यवरांचा परिचय हेमंत पाठक यांनी करून दिला. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन दीप्ती डोळे यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक महेश जोशी यांनी मानले.
या विज्ञान मेळाव्याच्या सादरीकरणामध्ये पूर्व व पश्चिम विभागाच्या एकूण 75 शाळांनी सहभाग नोंदवला होता. त्यांच्या सादरीकरणाचे परीक्षण तुषार करमाळकर, आरती टोके, प्रसाद शिंदे, डॉ. किशोर जगताप कविता देशपांडे, प्रांजली दीक्षित यांनी केले. त्यातून पूर्व व पश्चिम विभागातील प्रथम दोन क्रमांकाची निवड करण्यात आली. विज्ञान मेळाव्याच्या समारोप कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त उत्कर्षा नंदुरकर, सृष्टी जठार, द्वितीय क्रमांक प्राप्त देवयानी मते, सानिका रासकर तसेच उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त करणाऱ्यांना बक्षिसे देऊन प्रोत्साहित करण्यात आले. प्रथम दोन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची निवड पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली.
यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षिका अंजली गोरे, रोहित डांबरे, अनिल स्कॉट , कल्याणी म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा वडनेरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक मंजुषा शेलूकर यांनी केले. या विज्ञान मेळाव्याचे समन्वय संयोजन प्रतिभा वडनेरकर व विज्ञान विभाग प्रमुख प्रतिभा जक्का यांनी केले. प्रशालेतील सर्व विज्ञान शिक्षकांच्या सहकार्याने हा विज्ञान मेळावा यशस्वी झाला.