जन्माष्टमी व राष्ट्रीय पोषण सप्ताहाचा सुरेख संगम

शिक्षण विवेक    07-Sep-2026
Total Views |
des
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, शनिवार पेठ, पुणे* येथे ४ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता पहिली ते चौथीच्या दोन्ही विभागांतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी जन्माष्टमी आणि राष्ट्रीय पोषण सप्ताहाचा सुरेख संगम साधत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा उत्सव केवळ धार्मिक स्वरूपाचा न राहता अत्यंत उत्साहवर्धक, आनंददायी आणि बालस्नेही वातावरणात साजरा करण्यात आला. इयत्ता तिसरी व चौथीच्या शिक्षकांनी श्रीकृष्णाच्या विविध लीला, बालरूपातील मधुर गोष्टी आणि सुरेल गाण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंगांची माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
यासोबतच इयत्ता पहिली व दुसरीच्या शिक्षकांनी मुलांमध्ये लहानपणापासूनच सुदृढ आरोग्य आणि सकस आहाराच्या सवयी रुजवण्यासाठी ‘गोपाळकाला उपक्रम’ राबविला. दही, पोहे, लाह्या, शेंगदाणे, फुटाणे आणि डाळिंब यांसारख्या पौष्टिक घटकांपासून तयार केलेल्या गोपाळकाल्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. या उपक्रमातून विविध पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा, प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थ मिळण्यास मदत होते, हा आरोग्यदायी संदेश देण्यात आला.
या प्रसंगी पहिली व दुसरीच्या सकाळ विभागातील विद्यार्थ्यांनी ‘श्रीकृष्णाची नावे’ या उपक्रमात पानांवर श्रीकृष्णाची विविध नावे लिहून आपली सर्जनशीलता दाखवली. तसेच जंक फूडचे दुष्परिणाम समजून घेत विद्यार्थ्यांनी ‘नेहमी पौष्टिक व निरोगी आहार घेण्याची’ शपथ घेतली.
श्रीमती नुपूर कुरुलकर आणि श्रीमती विभा ललवाणी यांच्या आयोजनातून साकारलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी गाणी, गोष्टी, भारतीय संस्कृती आणि आरोग्यविषयक संदेश यांचा सुंदर मिलाफ ठरला. जन्माष्टमीच्या आनंदासोबतच पौष्टिक आहार, निरोगी जीवनशैली आणि आरोग्याची जपणूक यांचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, शैक्षणिक आणि संस्मरणीय ठरला.