स... संविधान नाट्यप्रयोग उत्साहात संपन्न...

शिक्षण विवेक    08-Sep-2026
Total Views |
mes
दिनांक ७ सप्टेंबर २०२६, सोमवार रोजी म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पुणे येथे ‘शिक्षण विवेक’ यांच्या वतीने 'स-संविधानाचा' या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची ओळख व्हावी, संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये, नियम आणि लोकशाही मूल्ये सहज व सोप्या भाषेत समजावीत, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
‘स... संविधान’ या नाटकाचे लेखक रमेश पतंगे, नाट्यरूपांतर ज्ञानेश वैद्य, दिग्दर्शन देवेंद्र भिडे यांनी केले. चित्रधार अर्चना कुडतरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नाट्यप्रयोगात अनुपमा जोशी, अश्विनी थोरात, अर्जित थत्ते, रमणी देशपांडे आणि देवेंद्र भिडे यांनी प्रभावी भूमिका साकारल्या.
कलाकारांनी अतिशय साध्या, सहज आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत संविधानातील विविध संकल्पना मांडल्या. मूलभूत हक्क, नागरिकांची कर्तव्ये, समानता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता आणि संविधानातील नियम यांविषयी नाट्याच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती न राहता संविधानातील मूल्ये प्रत्यक्ष प्रसंगांमधून समजून घेता आली.
नाट्यप्रयोगातील संवाद, अभिनय आणि प्रसंगरचना यामुळे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संविधान हा केवळ कायद्याचा दस्तऐवज नसून प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी जोडलेला महत्त्वाचा आधार आहे, हा संदेश या प्रयोगातून प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.
या कार्यक्रमास
शिक्षकविवेकच्या सायली मॅडम, प्रशालेचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, उपमुख्याध्यापिका
सौ . सुनीता गायकवाड, पर्यवेक्षिका सौ .जयश्री शिंदे, तसेच प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना संविधान समजून घेण्यासाठी आणि संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी हा नाट्यप्रयोग अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरला .