म.ए.सो. कै. दा. रेणावीकर विद्या मंदिरात 'इको फ्रेंडली फॅशन शो' उत्साहात संपन्न

शिक्षण विवेक    08-Sep-2026
Total Views |
mes
 
अहिल्यानगर:
म.ए.सो. कै. दा. रेणावीकर विद्या मंदिर, सावेडी येथे आज इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘इको फ्रेंडली फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षकांच्या नवनवीन कल्पनांमधून हा अनोखा उपक्रम साकारण्यात आला.
या फॅशन शोमध्ये विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तू, जुने कपडे, वर्तमानपत्रे, पुठ्ठे, झाडांची पाने, कापूस आणि विविध फुलांचा कल्पकतेने वापर करून आकर्षक वेशभूषा तयार केली होती. पर्यावरणातील प्राणी, पक्षी, झाडे, ढग आणि इंद्रधनुष्य अशा विविध घटकांचे रूप घेतलेल्या लहानग्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्वक मंचावर सादरीकरण केले.
या कार्यक्रमासाठी पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा कुलकर्णी आणि संगणक विभागाच्या शिक्षिका सौ. जैन मॅडम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. याप्रसंगी सौ. जैन मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत सहभागी विद्यार्थ्यांचे व या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शकुंतला आहेरकर यांनी केले, तर श्री. सारसर यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी विशेष मेहनत घेतली.