राष्ट्रीय विचारांशी बांधिलकी मानून गेली ७५ वर्षे सातत्यपूर्ण वाटचाल करत, ‘राष्ट्रनिर्माणात अग्रेसर’ या विवेक समूहाच्या ब्रीद वाक्याला अनुसरून शिक्षणविवेक गेली १३ वर्षे शिक्षणक्षेत्रात अग्रेसर आहे. महाराष्ट्रभर जाणारा छापील अंक आणि त्यासोबतच उपक्रमशीतला हा शिक्षणविवेकचा युएसपी आहे. खरं तर विद्यार्थी-पालक आणि शिक्षक यांच्यात मैत्रभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने २०१२ साली शिक्षणविवेकची निर्मिती झाली आणि आता २०२५ मध्ये शिक्षणविवेक शिक्षणक्षेत्रात उभारलेली चळवळ म्हणून नावारूपाला आलेली आहे. मुलांच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून त्या विषयांसंदर्भात चर्चा घडवून आणत प्रबोधन करत शिक्षणविवेकच्या माध्यमातून अनेक सामाजिक तसेच शैक्षणिक विषय हाताळले जातात. एकीकडे शिक्षण, दुसरीकडे समाज आणि तिसरीकडे व्यक्तिमत्त्व विकास यांच्यावर भर देत त्यानुसार विविध स्पर्धा-उपक्रमांचे आयोजन करत शिक्षणविवेक एक एक पाऊल पुढे टाकत आहे. शैक्षणिक विकास घडवून आणत स्व-विकास आणि सामाजिक विकासातील आपली भूमिका स्पष्ट करत विद्यार्थ्यांना एका दिशेने नेण्यासाठी शिक्षणविवेक सतत कार्यरत असतं. विद्यार्थ्यांना लिहितं करण्याबारोबारीनेच काव्य अभिवाचन, पपेट सादरीकरण, नाट्यछटा सादरीकरण, सांगू का गोष्ट या कलेला प्राधान्य देणाऱ्या स्पर्धांबरोबरीनेच, अनेक बौद्धिक विकास करणाऱ्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन असेल किंवा सगळ्या मुलांच्या कारक कौशल्य विकासाचे उपक्रमही आपण जाणीवपूर्वक आयोजित करत असतो. गंमतघरसारखा मुलांच्यातले कुतूहल जागं करून, त्यांना निरीक्षण करायला लावणे आणि विचार प्रवृत्त करायला लावणारा उपक्रम हा त्याचाच एक भाग आहे.
राष्ट्रीय विचारांशी बांधिलकी मानत, सातत्यपूर्ण काम करत शिक्षणक्षेत्रात सकारात्मकता आणण्याच्या उद्देशाने निर्माण झालेली शिक्षणविवेक ही चळवळ या पुढेही अशी वाटचाल करत राहील आणि या चळवळीत आपण सगळे सुज्ञ वाचक सहभागी व्हाल असा विश्वास वाटतो आहे.