मी वाचलेले प्रभावी पुस्तक

शिक्षण विवेक    02-Dec-2020
Total Views |
 
books_1  H x W:
हल्ली सगळेच विसरलेत माझ्या मित्रांना...
कारण ते व्यस्त असतात..
बघण्यात मोबाईलमधल्या चित्रांना...
 
आजकाल लोकं पुस्तकं वाचणं विसरूनच गेले आहेत का असं वाटतं. हल्ली पुस्तकांवरची धूळ साफ करण्यासाठी सुद्धा बऱ्याचजणांना वेळ उरला नाहीये मग पुस्तकं वाचण्याचा विषय लांबच. जेव्हा केव्हा लोकांना वेळ मिळेल तेव्हा ते मोबाईलमध्येच गर्क असतात आणि मुलंही मोबाईलमधील गेम्स आणि वेगवेगळ्या एप्समध्ये मग्न असतात. रोज सकाळी मोबाईलवर सुप्रभातचा संदेश आणि रात्री शुभरात्रीचा संदेश पाठवला म्हणजे आपण रोज आपल्या नातेवाईकांशी, मित्रांशी संवाद साधतो असं लोकांना वाटू लागतं. आजकाल बसमध्ये, रेल्वेत बरेचजण मोबाईलमध्ये मग्न असताना बघून खूप वाईट वाटतं. एकेकाळी बसमध्ये, बाजूच्या सिटवर बसलेल्या माणसाशी हवा, पाणी आणि पिकाच्या गप्पा केल्याशिवाय प्रवास होत नव्हता. शहरात नोकरीच्या तक्रारी आणि एकमेकांच्या गावाची विचारपूस असायची; पण आता या मोबाईलमुळे माणसं एकमेकांशी बोलायची बंद झाली आहेत. संवाद ही आपली संस्कृती आहे. ती आपण जपायला हवी. हल्ली मात्र मी आणि माझा मोबाईल हे त्यांचं विश्व होत चाललंय. बरं, मोबाईलमधून ज्या जगाशी संवाद साधायचा आहे तो कृत्रिम आहे. सोशल मिडीयावर निषेध नोंदवला म्हणजे आपली जबाबदारी संपली, असं लोकांना वाटतं.
 
पुस्तकातून आपल्याला ज्ञान प्राप्ती होते. अनेक तज्ञ लोकांचे अनुभव कळतात. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी केलेले कष्ट, एखादी गोष्ट मिळवण्यासाठीची तळमळ, त्यांचे काही संदेश या सर्व गोष्टी आपल्याला पुस्तकातून वाचायला मिळतात. अशाच एका पुस्तकाने माझ्या मनावर प्रभाव पडला. ते पुस्तक म्हणजे अरविंद जगताप लिखित, ‘पत्रास कारण की.’
 
ई-मेल आणि संदेशाच्या जमान्यात आपण पत्र लिहिणं विसरलोय. एस.एम.एस.च्या दुनियेत हरवत चाललेला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पत्ररूप संवाद. आपण आपल्या जवळच्या व्यक्तींसह सर्वांना पत्र लिहिले पाहिजे. मोबाईलमधल्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या नादात आपण खूप काही विसरून गेलो आहोत हा या पुस्तकाचा विषय आहे. खरं तर हे पुस्तक सर्वांनीच वाचावं. आपल्या काय चुका होत आहेत, आपल्याकडून काही राहून तर जात नाही ना? अशा प्रश्नांची उत्तरं त्यातून मिळतात. हे पुस्तक वाचताना मला अनेक हृदयस्पर्शी शब्द सापडले.
 
पत्र ही आधीच्या काळी खूप जिवाभावाची गोष्ट असायची आणि अरविंद जगताप यांनी आता पत्राची जबाबदारी घेतली आहे.
अनेक हृदयस्पर्शी पत्रं अरविंद जगताप यांनी लिहिली आहेत. शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांनी पुस्तकाची सुरुवात केली केली आहे. म्हणजेच सर्वात प्रथम लेखकाने शिवाजी महाराजांनी हे राज्य काय म्हणून उभं केलं होतं आणि आज त्या राज्याचे काय झाले आहे, हे विचार लेखकांनी त्या पत्रात मांडले आहेत. त्यानंतरचे पत्र हुतात्म्यांना लिहिले आहे. ज्यांनी आपल्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा त्याग केला आहे, अशा या थोर हुतात्म्यांना हे पत्र लिहिलं आहे. नंतरचं पत्र एका मुलीनं आपल्या आईला लिहिलं आहे. त्यामध्ये मुलगी आईकडे मुक्त जगण्याचा हक्क मागत आहे. कल्पना चावला अवकाशात जाऊ शकते तर मी माडीवर का जाऊ शकत नाही? असा प्रश्न मुलीने आईस विचारला आहे. त्यानंतरचे पत्र बाबांच्या आदरार्थ लिहिले आहे. ते देखील आईच्या सारखेच आहे. त्यापुढील पत्र आपल्या शूर रणरागिणींना लिहिले आहे. रणरागिणी किती शूर असतात ना! हे त्यामधून दर्शविले आहे. कधीतरी मूर्खपणाचा कळस गाठणारा आणि कधीतरी खूप माहिती देणाऱ्या टी.व्ही.ला देखील लेखकाने पत्र लिहिले आहे. कधीतरी काही चुकीच्या आणि काही महत्त्वाच्या बातम्या सांगणाऱ्या सोशल मिडीयाला योग्य गोष्टी सांगणारे पत्र यात आहे. या पृथ्वीतलावर जगणाऱ्या मनुष्यप्राण्याला आपल्या कितीतरी चुकांची जाणीव करणारे पत्र यात आहे. सिनेमामध्ये काम करणाऱ्या अभिनेता आणि अभिनेत्रीला देखील पत्र लिहिले आहे. आपल्या भारत देशात सर्वात जास्त तरुणाई आहे. त्या तरुण मित्रांसाठीही एक पत्र लिहिले आहे.
 
खरंच पुस्तक वाचल्यावर खूप आनंद होतो. त्यातून अनेक अनुभव, ज्ञान, चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात.
 
वेगवेगळी पुस्तके वाचू या!
उज्ज्वल समाज घडवू या!!
 
- कॅडेट ज्ञानेश्वरी आनंद देशमाने, इ.10 वी
राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा.