धडा

शिक्षण विवेक    02-Dec-2020
Total Views |
 
Dhada_1  H x W:
आमच्या शाळेला जाणारा रस्ता म्हणजे तंतोतंत रस्ताच आहे झालं. तुम्ही जर त्या रस्त्यावरून जाल तर म्हणाल की रस्ता आहे की सोंग? म्हणजे घरातून निघा, उजवीकडे वळा आणि सरळ चालू लागा, तिथे तुम्हाला एक मोठ्ठा खड्डा दिसेल, शेजारी ढीगभर माती उपसून ठेवली असेल. मग तुम्ही त्या मातीच्या ढिगाशेजारून सावकाश चालत जाल तर समोर एका मोठ्या घराशी दोन अल्सेशियन कुत्री बांधून दिसतात. ती घरातच बंदिस्त असली तरी सतत भुंकत असल्यामुळे आपल्याला घाबरावंच लागतं. दोनदा भुंकल्यावर आपण घाबरलो नाही, तर ती दोघं चिडून अधिक भुंकू लागतात. त्यामुळे ठरवून पहिल्या भो भोलाच मी घाबरून जाते. तिथून घाबरून पुढचा प्रवास सुरू केला की एक दुकान आहे डेली नीड्सचं! तिथं सगळी नवी चोकोलेट्स दिसतात. ती न घेता आणि आपल्या मनाला ‘दात किडतात बरं ..’ हे समजावता समजावता एक दिवस माझे हेही दात पडून जातील याची मला नीटच खात्री पटली आहे. मग तिथून पुढे गेल्यावर माझ्या मैत्रिणींची घरं सुरू होतात. एकेकीला हाक मारमारून माझा घसा सुकतो तरी त्यांची तयारी व्हायचीच असते. पलक, निधी, तनू, मिष्टी आणि सर्वांत शेवटी आर्याचं घर येतं आणि आर्याला हाक मारली तर ती खांद्यावर दप्तर घेत बाहेर येते आणि ‘अरे यार, मी हिंदीचं टेक्स्टबुक विसरली’, असं म्हणून पुन्हा घरात शिरते ती एक सबंध युग संपल्यावर बाहेर येते. मला हे अजिबात आवडत नाही तरी मी मैत्रीखातर ते सहन करते. मला वाटू लागतं की शाळा जशीच्या तशी माझ्या घरापाशी आणून ठेवावी आणि मग आर्याला समजेल की सर्वांत आधी तयार होऊन प्रत्येकीला हाका मारत फिरायला कसा म्याडपणा करावा लागतो ते, पण देव काही आमचं ऐकणार नाही. त्यामुळे आता हे असंच सुरू राहणार .
 
तशा माझ्या मैत्रिणी खूप चांगल्या आहेत. त्यामुळे या गोष्टींकडे मी जास्त लक्ष देत नाही हे खरंच आहे म्हणा. आता तुम्हाला पण माझी गोष्ट पटेलच. नाही का? आपलं फ्रेंडसर्कल चांगलं असलं की काही सवयी, स्वभावांकडे दुर्लक्ष करावं असं मोठी माणसं घरात सांगतातच ना! तसंच आहे.
 
वर्गात आम्ही सगळ्या अगदी जवळजवळ बसतो. म्हणजे मी आणि आर्या पहिल्या बाकावर, आमच्या मागे पलक आणि मिष्टी, तर आमच्या अगदी बाजूच्या रांगेत पहिल्याच बाकावर निधी, तनू बसतात. आमचे वर्गशिक्षक आम्हाला टोळी म्हणतात, पण तसा आमचा साधा ग्रुप आहे. ‘टोळी दरोडेखोरांची असते हे आम्हाला कळतं म्हटलं सर..!’ असं त्यादिवशी तनू सरांना म्हणालीच. तरी आपले सर म्हणजेही त्यांच्या घरात कोणाकोणाचे बाबा आणि अहो वगैरे असतातच त्यामुळे वर्गात ते ‘हं...’ असं मोठ्याने म्हणून गप बसतात.
 
तास ऑफ असेल तर आम्ही राजा-राणी-चोर-शिपाई खेळतो किंवा नुसत्या गप्पा करतो. एकमेकींच्या वह्या घेऊन गृहपाठ पाहून करतो. पण काल मात्र गंमत झाली. मराठीचा तास सुरू होता. कुलकर्णी मॅडमनी धडा संपवला आणि स्वाध्याय सोडवून घेत होत्या. त्यादिवशी सगळी उत्तरं मला येत होती. मॅडमनी प्रश्न विचारला की, आपण हात वर करायचा आणि मग त्या उत्तर विचारतील. वर्गात जोवर अचूक उत्तर येत नाही, तोवर त्या प्रश्न विचारतातच. त्यांनी आर्याला प्रश्न विचारला, पण तिला काही उत्तर आलं नाही. मग तिला मी पुस्तकात खूण करून दिली, तर तिने लगेच उत्तर दिलं. असं त्या तासाला तीन-चारदा झालं. तिला प्रश्न विचारला की, मीच आर्याला पुस्तकात उत्तर दाखवत असे. मला त्यात आनंद वाटत होता. आपण आपल्या मैत्रिणीच्या मदतीला धावून गेलो म्हणजे आपण खर्‍या मैत्रीण आहोत असं मला नीटच समजलं. कारण की, संकटकाळी जो धावून येतो तोच खरा मित्र असतो अशी एक गोष्ट मी छान छान गोष्टी पुस्तकात वाचली होती. तर तास संपला आणि मॅडम स्टाफरूममध्ये गेल्या. थोड्यावेळाने त्यांनी मला लायब्ररीत बोलावलं.
मी उत्साहात गेले. तर त्या मला म्हटल्या, ‘बाळा, तुम्ही मैत्रिणी आहात हे मला माहितेय. आपल्या मैत्रिणीला मदत करणं ही चांगली गोष्ट आहे, पण तिला प्रयत्न करू न देता सरळसरळ आपणच उत्तर सांगून देणं हे चूक आहे. तू अशाने तिचं नुकसान करशील. तिलाही वाचू दे, शोधू दे आणि तरीही नाही आलं तर मदत कर. कारण परीक्षेत तिचं तिला एकटीलाच लिहायचं आहे नं? मैत्रीचा अर्थ स्वावलंबी करणं असतं... तिला तुझ्यावर अवलंबून राहायला लावू नकोस, कळलं का?’
 
मॅडमचं बोलणं ऐकून माझ्या डोक्यात प्रकाश पडला आहे. मदत करणं आणि परावलंबी करणं यातला फरक माझ्या नीटच लक्षात आला. त्यामुळे वर्गात शिकवलेला धडा संपला असला तरी हा धडा माझ्या मनात आता कायमचा फिट्ट बसला आहे हे खरंच!
- माधवी भट