हिवाळ्यातील आरोग्य

शिक्षण विवेक    02-Dec-2020
Total Views |
 
Hivayatil Arogya_1 &
थंडीचे दिवस म्हटलं म्हणजे थंडगार हवा. मनमुराद भटकंती, हिरवागार निसर्ग असे टवटवीत दिवस डोळ्यांसमोर येतात. या दिवसात भूकही भरपूर लागते. कित्येकजण व्यायामाचा श्रीगणेशा हिवाळ्यातच करतात. एकंदरीत वातावरण आरोग्याला पोषक असतं.
 
पण मुलांच्या बाबतीत हिवाळा निरोगी असतोच असं नाही. अगदी तान्ह्या बाळांना ‘रोगविषाणूं’चा संसर्ग होऊन उलट्या जुलाबांना सामोरं जावं लागतं किंवा आर.एस.व्ही.सारख्या विषाणूंमुळे ब्राँकीओलायटीस हा श्‍वसनमार्गाचा आजार होऊन धाप लागू शकते. थोड्या मोठ्या मुलांना हवामानातील बदलामुळे श्‍वसनाचे विकार होतात. तर कधी त्वचेच्या विकारांना तोंड द्यावं लागतं.
 
ज्यांना बालदम्याचा त्रास होतो. अशा मुलांनी शाळेत जाताना जवळ इन्हेल्हर बाळगावा. शारीरिक शिक्षणाच्या तासाला दमछाक होणार असेल. तर तास सुरू होण्यापूर्वी इन्हेलर वापरावा.
 
वनश्री कितीही हिरवीगार असली तरी काही फुलांमधल्या परागकणांमुळे ‘अ‍ॅलर्जी’ होऊन नाक गळायला लागतं. ही सर्दी अ‍ॅलर्जीमुळे असल्यामुळे या फुलांचा बहर ओसरेपर्यंत ती चालूच राहते.
 
काहींची त्वचा थंडीमुळे कोरडी पडते. त्वचेतील स्निग्धता टिकून राहण्यासाठी व्हॅसलीनचा वापर करता येतो.
 
पावसाळ्यानंतर अंगणातले टायर, पत्र्याचे डबे इ.मध्ये साचलेल्या पाण्यात ‘एडिस इजिप्ती’ नावाचे डास वाढतात. हे डास ‘डेंगीचा आजार’ पसरवायला कारणीभूत ठरतात.
 
डेंगीच्या आजारात खूप ताप येतो. डोकं दुखतं, डोक्याच्या मागच्या बाजूला दुखतं. अंग दुखतं. बहुतेकांचा ताप ५ दिवसात उतरतो. पण काहींना ताप उतरता उतरता त्रास होतो. रक्तातल्या ‘प्लेटलेट’ नावाच्या पेशींचं प्रमाण घटतं.
 
रक्तवाहिन्यांमधून ‘प्लाझमा’ अवयवांमध्ये पाझरतो न् फुफ्फुसाबाहेरील आवरणात, तसंच इतर काही अवयवात साठतो. साधारणत: अकरा दिवसात आजार बरा होतो.
 
नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे थंडीचे महिने म्हणजे आरोग्यवर्धकच म्हटले पाहिजेत. कदाचित हे जाणूनच आपल्या पूर्वजांनी दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणांचे आयोजन केले असावे. त्या पाठोपाठ नाताळ आणि नंतर जानेवारी महिन्यात संक्रात. हे तीनही सण म्हणजे खाण्यापिण्याची लयलूटच.
 
आल्हाददायक हवा, सुट्टीतील मनमुराद खेळणे, भटकणे यामुळे चविष्ट व पौष्टिक अन्न सहज पचते. दिवाळीच्या फराळातील खमंग चकली, खुसखुशीत अठरा धान्यांची कडबोळी, तूप-साखर-डाळ अशी त्रिसूत्री साधणारा बेसन लाडू, दाणे, खोबरे - काजूंनी सजलेला भरपूर उष्मांकयुक्त चिवडा, या सगळ्या पदार्थात सर्व अन्नघटकांचा समतोल विचार केलेला आहे. भाजणीमुळे धान्य पचायला सुलभ. हलके होते.
 
या दिवसात तिळाचे अनन्यसाधारण महत्त्व. म्हणून येतो संक्रातीचा सण. तिळगूळ, तीळवड्या, तीळ-लाडू, गुळाची पोळी-साजुक तूप, तसंच संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगीला बाजरीची भाकरी, मुगाची खिचडी, मिश्र भाजी, आपली लेकुरवाळी भाजी, गुजराथी लोकांचा उंदियो सगळ्या मागची कल्पना एकच. प्रांतानुसार नावं बदललेली.
 
खिचडीसुध्दा प्रांतानुसारच बदलते. महाराष्ट्रात आपण फक्त मुगाची खिचडी करतो. गुजराथमध्ये तुरीची डाळ, बंगाली लोक मसुर डाळ, तर राजस्थानात मटकी डाळ सुध्दा वापरतात.
 
खिचडीत निरनिराळ्या भाज्या घालून अधिक पौष्टिक करता येते.
 
मुलांना रोज एक-दोन फळे आवर्जून द्यावीत. महागडी फळेच पाहिजेत असे नाही. ॠतुमानानुसार मिळणारी सर्व फळे, अगदी चिंचा, आवळे, बोरे, पेरू, पपई, केळी ही तुलनेने स्वस्त फळे देखील जीवनसत्त्वांचा खजिनाच असतात.
 
लठ्ठपणा टाळण्यासाठी शाळकरी मुलांना दिवसाकाठी कमीत कमी एक तास व्यायाम करण्याची सवय लागली पाहिजे. शाळा सुटल्यानंतर मुलांनी मैदानावर खेळावं यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. गृहपाठ आणि शिकवणी इतकाच व्यायामही महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवावं.