उमलती कळी

28 Mar 2020 18:13:00


सायली... वयवर्ष ४-५, अत्यंत गोड आणि लाघवी मुलगी आहे. परंतु अतिशय अबोल, चेहऱ्यावर कायम एक स्थितप्रज्ञता, भीती, सगळ्यालाच कुरकुर, शाळेत जाताना, शाळेच्या वॅनमध्ये सोडताना कायम रडारड! जरा सुधारेल म्हणून गरवारे बालभवनमध्ये घातलं तर परिस्थिती अजूनच बिघडली. काय करावं घरातल्या कुणालाच समजेना! रडकी सायली असं तीच नामकरण झालं. थोडं घराच्या आत डोकावलं तर उच्चभ्रू घर, आजी- आजोबा, आई- बाबा आणि सायली असं पंचकोनी सुखवस्तू कुटुंब. घरात सगळेच कमावते म्हणून कामाला तीन तीन हेल्पर. सगळेच बाहेर गेल्यावर घरात कामवाल्या बायकांकडे आणि नातीकडे लक्ष द्यायला कोणीतरी हवे म्हणून आजोबांनी ऐच्छिक निवृत्ती घेतलेली होती. परंतु त्यांचा आवाज एका घटनेनंतर गेला होता, त्यामुळे ओठांच्या हालचालींवरूनच त्यांचं बोललेलं लक्षात येत आणि वयपरत्वे त्याना ऐकूही कमी येत होत. त्यामुळे नात दुपारी शाळेतून आली की तिला खरं तर तिच्या विश्वातलं बरंच काही सांगायचं असायचं, कुणाच्या तरी मांडीवर बसून व्यक्त व्हायचं असायचं, पण शाळेतून आल्यावर एवढ्या मोठ्या घरात फक्त सजवलेल्या भिंती तिचं मूकपणे स्वागत करायच्या आणि कामावरच्या मावशा तिच्या आईने दिलेल्या तक्त्याप्रमाणे ताट भरून तिच्यासमोर मांडायच्या. घरातच तिची मोठीशी खेळण्याची खोली करून घेतलेली, तिथेच ती एकटी बसून खेळायची. कारण बाहेर खेळायला सोडलं तर धुळीचा त्रास होईल शिवाय धडपडली कुठेतरी तर लक्ष द्यायला कुणी नव्हतं. त्यामुळे सगळं होतं आणि नव्हतंही.
संक्रातीच्या हळदीकुंकू समारंभात तिच्या आईची नि माझी भेट झाली. सायलीही तिच्यासोबत होती. तिला इतके दिवस मी पाहतच होते. त्यांना बोलत करायची ही चांगली संधी होती. मी सहजच विषयाला हात घातला. माझ्या मुलाचं तिच्या आईने तोंडभरून कौतुक केलं, स्वतःच्या मुलीला सांगितलं बघ तो कसा गुड बॉय आहे, शाळेत नियमित आहे आणि तू बघ कशी रडकी, सगळ्यांना त्रास देते. मी काय करू काहीच कळत नाही, मला सतत एक गिल्टी फीलिंग येत की तिला आपण वेळ देऊ शकत नाही. पण तिचं वागणं आता हाताबाहेर चाललंय, मला खरचं कळत नाही तिला कसं सुधरवावं ते!
तिची आई एकूणच बरीच वैतागली होती. तिला म्हटलं मी तुझी थोडी मदत करू का? चालत असेल तर माझं थोडं ऐकशील? ती हो म्हणाली, प्लिज मदत कर. तू तुझ्या मुलाला फार चांगलं सांभाळतेस असं सगळी सोसायटी म्हणते मला काही टिप्स दिल्यास तर फार बरं होईल.
तिच्या आईलाच थोडं समजावणं आणि ब्रेन वॉश करणं गरजेचं आहे हे थोडक्यात लक्षात आलं.
एकूणच मुलगी लहान होती तर आईने थोडंफार लक्ष देणं गरजेचं होत. शिवाय घरच्या सगळ्यांनी तिच्यासमोर सकारात्मक बोलणं अत्यंत आवश्यक होत. सगळेच नकारार्थी आणि नकोशा अर्थाने तिच्यासमोर बोलत आणि वागत होते. सायली रडकी आहे, सगळ्यांना त्रासच देते हे कुठेतरी तिच्या बालमनावर खूप वाईट परिणाम करत होत. तिच्या आईच्या बोलण्यातून जाणवलं की, एकत्र कुटुंब असल्याने सासू सुनेचं बिलकूलही पटायचं नाही, त्या शीत युद्धाचा परिणामही त्या चिमुकलीच्या मनावर होत होता. आजी-आजोबा चांगले नाहीत हे ती सतत म्हणायची त्याच मूळ तिच्या आईच्या मनात होत तर! त्यावरही समजावून सांगितलं की मुलांना त्यांची नाती आणि त्यावरचे अनुभव हे त्यांना स्वतःला ठरवूद्यात, तुमचा दृष्टिकोन तिच्यावर लादू नका. आर्थिक परिस्थिती उत्तम असेल तर मुलगी लहान आहे तोवर जमल्यास अर्ध वेळ नोकरीचा पर्याय निवडू शकतेस. जेणेकरून ती शाळेतून येईपर्यंत तुही थोड्या फरकाने घरी येऊ शकशील आणि तिच्या गोडगप्पा ऐकण्याची तुला छान संधी मिळेल. शनिवार, रविवार कुठे एकत्र जाता का तुम्ही? तर हो म्हणाली आम्ही तिघे कंपलसरी मॉल आणि मुवीसला तिला नेतो, सुट्टीच्या दिवशी तिला जराही एकटं सोडत नाही. तिला वेळ देत आहेत हेही थोडके नसे असं वाटलं मला. पण हे पुरेसं नाही असं तिला सांगितलं, घरातले सगळे मिळून कधीतरी बाहेर पिकनिक काढा. घरात चार गाड्या आहेत तर त्यातल्या एकातून सगळे एकत्र मिळून नक्कीच जाऊ शकता. आपण सगळे एका कुटुंबातले आहोत हे तिला जाणवू द्या. कधीतरी मॉल आणि मुवीसला न जाता एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी किंवा गडकिल्ल्यावर जा. चांगली खेळणी घेऊन बागेत जा, तिच्यासोबत वय विसरून मोकळं खेळलं तर तीही मोकळी होईल. कधीतरी एकेकटे आईसोबत एकदा आणि बाबासोबत एकदा असंही तिला घेऊन फिरायला जा. मुलं आईबाबांसोबत जितकं मोकळं होत नाहीत तितकी आई किंवा बाबा एकटे सापडल्यावर मोकळं होतात. तिला नेमकं कशाची भीती वाटते हे नकळत समजून येईल कुणी सांगावं? शेवटी महत्त्वाचं म्हणजे खाणं... कोणत्याही व्यक्तीच्या मनाचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो असं म्हणतात. तेव्हा तिला काय आवडतं हे जाणून घेऊन आणि तिच्यासाठी या वयात पौष्टिक काय आहार असेल हे बघून एक समतोल आहार तक्ता बनवा. आपल्याला काय योग्य वाटतं हे न ठरवता तिच्याही कलाने थोडं घेऊन बघुयात. रोजच्या गडबडीत काऊचिऊचा घास करून भरवायला वेळ नसला तरी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कधीतरी गोडीने जवळ घेऊन नक्कीच खाऊ घालू शकतो आणि आवडत नसलेल्या पालेभाज्या किंवा कोशिंबिरी का खाणं आवश्यक आहे याच महत्त्व पटवून देऊ शकतो.
तिच्या आईला कुठेतरी हे पटल्यासारखं वाटलं, पण मग सगळेच प्रयत्न मी एकटी का करू सासू सासऱ्यांनीही करायला हवेतच ना! मी म्हटलं ठीक आहे आपण त्यांच्याशीही बोलू हरकत नाही, जमेल तसं सांगता येईल.
या गोष्टीला एक महिनाभर उलटला. दरम्यान एकदा पार्किंगमध्ये तिच्या आजीचीही गाठ पडली. त्यांनाही हेच म्हटलं थोडं आपण सकारात्मक होऊयात आणि आपल्या नात्यातले हेवेदावे नातीच्या भविष्यासाठी थोडं बाजूला ठेवूयात. त्यांनी हसत हसत काही बदल करण्याची तयारी दर्शवली. एका रात्रीत होणारे हे बदल खचितच नाहीत, पण हळूहळू हे चित्र नक्कीच बदलेल.
आज दोन महिने होत आले या गोष्टीला आणि सांगायला आनंद होतो आमचे थोडे फार प्रयत्न फलद्रुप झाले असं म्हणायला हरकत नाही. आजची सायली पाहिलीत का? किती हसरी झालीय, न कुरकुरता शाळेत जाते, बालभवनला जाते. मोकळ्या वेळेत गार्डनमध्ये तिच्या वयाच्या इतर मुलींसोबत खेळायला येते. कुणीही तिला वाईट म्हणत नाही नि ती कुणाला वाईट म्हणत नाही.
आज सहजच मी खाली बसले होते जरा घरातलं आवरून तर शाळेतून आली आणि स्वारी एकदम खुशीत होती आज! शाळेत कुणाचा तरी बर्थडे झाला तर त्याच गिफ्ट मिळालेलं याचा कोण आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आलेच मी काकू, थांब हा जाऊ नको असं म्हणून धूम घरात पळाली. कपडे बदलून कंगवा आणि रबर घेऊन आली माझ्याकडे आणि म्हणाली, "काकू माझे केस विंचरून दे न गं, तू खूप छान विंचरतेस! हेच ते आजच हसरं फूल या फोटोतलं! कारण कळी बाहेरून ओढून ताणून फुलवली तर तिचं फूल होत नाही तिला आतूनच स्वप्रयत्नाने आणि स्वयंप्रेरणेने फुलावे लागते, तेव्हाच एक सुंगंधी आणि सुंदर फुल बहरून येते नाही का, फक्त त्याच्यासाठी पोषक वातावरण आणि वेळच्या वेळीस खतपाणी घालणं गरजेचं आहे.


- वर्षा कदम

Powered By Sangraha 9.0