'सकारात्मक दृष्टिकोन' - यशाची गुरुकिल्ली

शिक्षण विवेक    05-May-2020
Total Views |


पेला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा या उदाहरणावरून एखाद्या गोष्टीकडे आपण सकारात्मक दृष्टीने कसे बघू शकतो, याचे बाळकडू आपणास शालेय, तसेच कौटुंबिक पातळीवर दिले जाते, पण यामुळे खरेच सकारात्मक दृष्टिकोन वाढतो का? संकट समयी किंवा एखादी आपत्ती ओढवली की आपण त्यातून सकारात्मक विचार करून मार्ग काढू शकतो, यावर एक मत होऊ शकते. सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यासाठी आवश्यक ती विज्ञानवादीदृष्टी आणि दूरदृष्टी आपल्यात विकसित होणे गरजेचे आहे. आपत्ती व्यवस्थापन हा सकारात्मक दृष्टिकोनाचाच भाग असला तरी आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापन ना शालेय पातळीवर शिकविले जाते ना नागरी पातळीवर त्यामुळेच कदाचित अचानक एखादी आपत्ती ओढवली तर आपण आणि आपला समाज हवालदिल होऊन सैरभैर होतो. ‘आहे ना हरि...’ ही भावना देखील सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारण्यामागील महत्त्वाची धोंड आहे. कारण सकारात्मकता केवळ तसा दृष्टिकोन बाळगण्याने रूजत नसते. घटनेमागील कार्यकारणभाव समजून घेणेदेखील तेवढेच गरजेचे असते. सकारात्मकता बाळगताना प्राधान्यक्रमाचे देखील तेवढेच महत्त्व आहे. अत्यावश्यक, आवश्यक आणि अनावश्यक तसेच सदुपयोग, उपयोग आणि दुरूपयोग यांतील फरक प्राधान्यक्रम ठरवताना जाणून घेणे गरजेचे आहे. हा फरक एकदा जाणून घेतला की सकारात्मकतेला प्राधान्यक्रमाची जोड मिळून मनाची द्विधा अवस्था जाऊन कार्य तडीस जाऊ शकते. कष्टाची आणि झोकून द्यायची मानसिक तयारी आणि शारीरिक ताकद आपसूकच निर्माण होते. नुसता सकारात्मक दृष्टिकोन बाळगून फलनिष्पत्ती अथवा कार्यसिद्धी होणे शक्य नाही.
वास्तविक सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचा घोशा सतत केला जातो. आजकाल तर अशी दृष्टी निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळी चर्चासत्रेदेखील आयोजित केली जातात. दिशादर्शक म्हणून असा प्रयत्न एकवेळ ठिक, पण प्रत्यक्षात सकारात्मकता निर्माण होण्यासाठी मनालाच तसे वळण, प्रयत्नपूर्वक लावावे लागेल. अन्यथा सकारात्मकता ऐन समयी नकारात्मकतेत परावर्तित होण्याची शक्यता असते. उदाहरण द्यायचे तर एखाद्या व्यक्तीबाबत आपली काही मते असतात. यात पूर्वग्रहदूषित भाग सोडा पण त्या व्यक्तीने आपल्या मताविरोधात काही करून दाखवले तर आपण अशा व्यक्तीस शाबासकी देण्याबरोबरच अचंबित देखील होतो. चमत्काराला नमस्कार करून मोकळे होतो. कारण ती व्यक्ती तसे काही भव्यदिव्य करेल याबाबत आपल्या मनात काही शंकाकुशंका असतात. मात्र जेव्हा तसे काही भव्य दिव्य करण्याचा प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारे देखील हवालदिल होतात. म्हणूनच आपण प्रसंगाला प्रत्यक्षात कसे सामोरे जातो, कसा प्रतिसाद देतो, यावर सकारात्मकता ठरत असते. आता यात समयसूचकेचा देखील अंतर्भाव करावा लागेल. सकारात्मक दृष्टिकोन, प्राधान्यक्रम, झोकून देऊन काम करण्याची तयारी आणि समयसूचकता या समीकरणातूनच सकारामत्क दृष्टिकोन आत्मसात करण्यासाठी प्रयत्न असावेत.

- बाळकृष्ण शिंदे