साने गुरुजी

शिक्षण विवेक    11-Jun-2020
Total Views |


थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत आणि मराठी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने यांचा आज स्मृतिदिन. साने गुरुजींचे श्यामची आई, नवा प्रयोग, सुंदर पत्रे, हिमालयाची शिखरे, क्रांती, समाजधर्म, आपण सारे भाऊ यांसारखे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड गावी २४ डिसेंबर १८९९ रोजी साने गुरुजींचा जन्म झाला. साने गुरुजींच्या आजोबांच्या काळापर्यंत त्यांच्या घरी वैभवसंपन्नता होती मात्र, साने गुरुजींच्या जन्माच्या वेळी घराची आर्थिक स्थिती घसरत गेली. साने गुरुजींचे आपल्या आईवर जीवापाड प्रेम होते. आईने त्यांच्या बालमनावर केलेल्या संस्कारांमुळे साने गुरुजींचा जीवनविकास झाल्याचे, आपण साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातून वाचले आहे. इंग्रजी साहित्यातून एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर साने गुरुजींनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे ६ वर्षे शिक्षकाची नोकरी केली. या कालावधीत साने गुरुजींनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. येथील प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी पार पाडताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. यानिमित्ताने त्यांनी येथील विद्यार्थ्यांमध्ये सेवावृत्तीचे बीज रोवून, विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले. यादरम्यान अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे साने गुरुजींनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासदेखील केला.

साने गुरुजींवर महात्मा गांधींच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. ते स्वतःसुद्धा खादीचाच वापर करत. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून साने गुरुजींनी ग्राम स्वच्छतेची कामे केली. १९२८ साली साने गुरुजींनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यानंतर १९३० साली शिक्षकाची नोकरी सोडून साने गुरुजींनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. दुष्काळात शेतकऱ्यांना करमाफी मिळावी, यासाठी चळवळ, १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्यासाठी प्रचार, यांसारखी महत्त्वपूर्ण राजकीय कार्ये साने गुरुजींनी केली आहेत.
साने गुरुजींनी लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रांमधून त्यांच्यातील संवेदनशील लेखकाची ओळख आपल्याला होते. त्यांच्या साहित्यातून त्यांनी समाजामध्ये मानवतावाद, देशभक्ती, सामाजिक सुधारणा इत्यादी मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. साने गुरुजींनी बहुतांश लिखाण तुरुंगवासात असताना केले. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्यामुळे साने गुरुजींना तुरुंगवास भोगावा लागला. पण या काळाचा सदुपयोग करत त्यांनी लेखन केले. यामध्ये साने गुरुजी लिखित सुप्रसिद्ध ‘श्यामची आई’ ही कादंबरी त्यांनी नाशिक तुरुंगात असताना लिहिली. त्यानंतर १९३२ मध्ये धुळ्यातील तुरुंगात त्यांनी आचार्य विनोबा भावेंनी सांगितलेली गीता प्रवचने लिहून काढली.
लेखक, कवीमनाच्या साने गुरुजींचे मराठीप्रमाणेच इतर भाषांवरसुद्धा प्रेम होते. त्यामुळे साने गुरुजींनी भाषांतरित केलेली साहित्येसुद्धा खूप प्रसिद्ध झाली. यामध्ये ‘कुरल’ या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर, फ्रेंच भाषेतील ‘less miserable’ चा मराठी अनुवाद, तसेच जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ डॉ. हेन्री थॉमस यांच्या ’The story of human race’ चा साने गुरुजींनी ‘दुःखी’ या नावाने मराठी अनुवाद केला.

साने गुरुजींनी देशातील सांस्कृतिक, भाषिक ऐक्य जपण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळ सुरू केली. या चळवळीच्या माध्यमातून साने गुरुजींनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. देशातील प्रांतीयवाद देशाच्या एकात्मतेसाठी घातक असल्याचे साने गुरुजींनी जाणले. त्यामुळे साने गुरुजींनी आंतरभारती चळवळीच्या माध्यामातून देशातील जनतेला परस्परांच्या भाषा, चालीरिती, संस्कृती जाणून घेण्यास लोकांना सांगितले. ११ जून १९५० रोजी साने गुरुजींचे निधन झाले. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त साने गुरुजी लिखित ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या कवितेचे बोल आठवू आणि त्याप्रमाणे वागण्याची प्रतिज्ञा करू या. हीच साने गुरुजींना खरी आदरांजली ठरेल...

- स्वप्निल नंदकुमार गोंजारी. सहाय्यक शिक्षक, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे, कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती