आजीचा डोळस दृष्टीकोन!

01 Oct 2021 11:37:16

Aajicha dolas drushtikon_
 
मीनाचे बरेच दिवस माझे डोळे दुखतात, डोके दुखते सारखी भूणभूण आईच्या मागे चालली होती. आई म्हणाली, ठीक आहे. मी संध्याकाळी डॉक्टरांकडे घेवून जाते. आता तू आराम कर. आई घाईगडबडीत कामाला निघून गेली.
आजीने मायलेकींचे बोलणे ऐकले होते. आजी आत खोलीत गेली तर काय मीना मोबाईलवर गेम खेळत होती. आजी खोलीत आली ह्याचे भानही मीनाला न्हवते. ती खेळात रमून गेली होती. मधूनच स्वताचे डोके दाबत होती पण मोबाईल हातात!
आजीने मीनाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिला विचारले, ‘‘काय झाले मीना? नक्की काय होतय तुला?’’ मीना म्हणाली, ‘‘अगं आजी सारखे डोळे आणि डोकं दुखतंय.’’ आजी म्हणाली, ‘‘अग बाळा तू संध्याकाळी डॉक्टरांकडे जाशीलच आणि जायलाच पाहिजे. पण याचा इलाज तुझ्याकडेच आहे.’’ मीना म्हणाली, ‘‘काय पण आजी. मी काय डॉक्टर आहे?’’
आजी म्हणाली, ‘‘हो.’’ ‘‘कसे काय?’’ मीना. आजी म्हणाली, ‘‘हे बघ बाळा तू सतत त्या मोबाईलवर, संगणकावर सर्व भान विसरून खेळत असते, काय ते लहरींळपस करत असतेच. त्यामुळे डोळे खराब होतात आणि डोक्यात नको ते विचार. सतत मान खाली घालून दुखणी येईपर्यत भान नसते.’’ ‘‘अगं पण आजी मला नेटवरून माहितीही मिळते. तुझा जमाना वेगळा होता.’’
‘‘हो मीना, खरंच माझा जमाना वेगळा होता. आम्हाला नेटबेट नाही कळत. पण आम्ही प्रत्यक्ष स्नेही नातलगांना भेटायचो, विचारपूस करायचो, आतासारखी साधनेही नव्हती. पण पत्र प्रत्यक्ष लिहून, भेटून आनंद वाढवायचो. तू दिवाळी सुट्टीत सर्वांना मोबाईलवर संदेश पाठवलेस. जवळच्या नातलगांकडेही प्रत्यक्ष गेली नाहीस.’’
‘‘अगं आजी कुणाला आहे एवढा वेळ?’’ ‘‘अगं बाळा वेळ कधीच नसतो तो आपणहून आपल्या माणसासाठी काढायचा असतो. जरा बाहेर हवेत फिरावं, चालावं झाला व्यायाम. कशाला जिम खर्चिक हवे. तू पण मोबाईल गरजेपुरताच वापर आणि गाजर, पपई, हिरव्या पालेभाज्या खा. माहिती काय फक्त नेटवरच मिळते? अग पुस्तके वाचावी, आपला संपर्क वाढवावा, आपले ज्ञान अद्यावत ठेवावे. काळानुरूप आम्ही पण बदललो पण जुन्यातील चांगले ते नक्की घ्या तुम्हा नवीन पिढीने!’’
आजीचे म्हणणे मीनाला पटले. संध्याकाळी डॉक्टरांनीही तिला आजीप्रमाणेच सांगितले. काही औषधे मात्र दिली. मीनाने आजीला घट्ट मिठी मारली तूच माझी डॉक्टर! मीनाने आता मोबाईलचा वापर गरजेपुरताच केला. आजीसोबत बागेत जाऊ लागली. स्नेही, नातलगांना पालकांसोबत भेटू लागली. सणासुदीला शुभेच्छा कार्ड पाठवू लागली. तिचे दुखणे आजीच्या डोळस दृष्टीकोनामुळे दूर झाले.
आपणही आजीचा डोळस दृष्टीकोन स्वीकारू या!
- ऋतुजा गवस, सहशिक्षिका
माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा
Powered By Sangraha 9.0