स्वप्न

शिक्षण विवेक    16-Oct-2021
Total Views |

swapna_1  H x W 
आत्माराम अगदी स्वप्नवेडा तरुण. अगदी लहानपणापासून त्याला कशाची तरी ओढ लागलेली असायची. कशाची तरी म्हणजे ऐसी तैसी कशाचीही नाही बरं! आत्मरामची स्वप्न नेहमी भव्य दिव्य. अगदी मोठ्ठी. माझा विद्यार्थी म्हणून तो मला भेटला आणि त्याची स्वप्नं ऐकताना त्यानं ती पुरी केलेली बघताना मी देखील आनंदित होत गेले. मला आठवतंय, तेव्हा आत्माराम जेमतेम बारावीत होता आणि स्वप्नं मात्र संपूर्ण जगाला गवसणी घालण्याची.
खरंच, आत्मारामला पर्यटनाची विलक्षण आवड होती. अगदी वेड होतं म्हणा ना! पण घरची परिस्थिती मात्र त्याला अजिबात अनुकूल नव्हती. आत्मारामचे वडील त्याच्या अर्धवट वयातच गेले होते आणि भावंड, आजी, आई या सगळ्यांची जबाबदारी त्याच्या कोवळ्या खांद्यावर होती. पण एकामागून एक येणार्‍या अडचणींनी, खास करून पैशांच्या. आत्माराम डगमगला नाही की खचला नाही. त्यानं व त्याच्या मित्रानं भागीदारीत एक जुनी मोटारसायकल मिळवली व ते वेळ मिळेल त्याप्रमाणे आपला वेग बघायला बाहेर पडे.
जवळ अजिबात पैसे नाहीत. गाठीशी पैसा नाही. आधार केवळ असीम जिद्दीने या प्रवासात संकट येणार हे अभिप्रेतच होतं. तशी ती आली; पण मदतीचे हातही खूप उभे राहिले. प्रवास करता करता आत्माराम देशाच्या एका शेवटच्या टोकाला येऊन पोहोेचला. लेह-लडाखला. तिथल्या निसर्ग सौंदर्याने अक्षरशः भारावून गेला. तिथून परत येताना त्याचा पाय निघेना. मी या देवभूमीवर पुन्हा, पुन्हा येईन असा निश्चय करूनच तो तिथून निघाला. आपली ही प्रतिज्ञा आत्मारामनं तडीस नेली. एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर शेकडो वेळा.
लेख-लडाखला जाणं अजिबात सोपं नाही. खारतुंगला पास हे सर्वोच्च शिखर पार करणं तर आव्हानच. पण ज्याचं वेड लागतं ना, ते सर करताना कुठल्याही अडचणींची तमा भासतच नाही.
या प्रवासात आत्मारामला अनेक अवलिये भेटले. अगदी आत्मारामसारखेच. आत्माराम मला भेटला की या अवलियांच्या अनेक गमती-जमती मला सांगतो. अगदी भान हरपून जावं अशा या गोष्टी ऐकताना काय वाटतं ते शब्दात थोडंच सांगता येईल? पण तरीही आत्मारामनं सांगितलेला एक भन्नाट माणूस माझ्या पक्का लक्षात राहिला. आणि त्याला तुमच्यापर्यंत पोहोचवावा, असंही खूप आग्रहानं वाटलं.
आत्माराम ज्याच्या अगदी आकंठ प्रेमात बुडलाय त्याचं नाव आहे सत्येन दास. कलकत्याजवळच्या एका खेड्यात राहणारा हा मुलगा (चांगला चाळीशीच्या पुढचा आहे म्हणा!) तर या मुलाची घरची परिस्थिती अगदी गरिबीची. वडील सायकल रिक्षा चालवायचे. मुलगा सहावी-सातवीपर्यंत शिकल्यावर वडिलांनी आता ‘शिक्षण पुरे’ असं सांगितलं. हळूहळू सायकल रिक्षा (तीन चाकी) चालवण्याचं शिक्षण मात्र द्यायला सुरुवात केली.
सत्येन सायकल रिक्षा चालवू लागला. चालवू लागला नव्हे ओढू लागला. प्रवाशांच्या ने-आणीत काही गप्पा कानांवर पडायच्या. गावातले लोक जगन्नाथपुरीला जायचा बेत करत होते. ऐकलं आणि सत्येनच्या मनानं उचल खाल्ली. गरीब असलो. रिक्षा चालवणारे असलो म्हणून काय झालं? माझा देश मला बघावासा वाटतोय, हे पुरेसं नाही? त्यानं निश्चय केला. गावातल्या लोकांना सत्येन जाऊन भेटला. खर्चाची चौकशी केली. लोकांनी रु. 600 चा आकडा सांगितला. (ही साधारण 30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे) सहाशे रुपयांचा आकडा ऐकताच सत्येनच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्यापाशी एवढे पैसे नाहीत, याची त्याला जाणीव झाली. पण म्हणून हरेल, गप्प बसेल तर तो सत्येन कसला?
विचार करताना सत्येनला एकदम आठवलं, आपल्या मामाजवळ एक जुनी सायकल आहे. स्वारी ताबडतोब मामाकडे पोहोचली. मामानं आपली जुनाट सायकल तर दिली भाच्याला; पण हा वीर त्या सायकलवरून सहाशे मैलांचा पल्ला पार करणार आहे याचा अंदाज त्या बिचार्‍याला आला नाही.
सत्येनच्या गावातले लोक बसगाड्यातून कधीच पुढे निघून गेले होते. हे महाराज खिशात पैसे नसताना, त्या सायकलवरून ‘एकला चलो रे’ म्हणत निघाले. मजल, दरमजल करून अडीच दिवसात सत्येननं 600 मैलांचा पल्ला पार केला.
सत्येन पुरीला पोहोचला. तेव्हा त्याच्या गावातले लोक मजेत इकडे-तिकडे हिंडत होते. सत्येनला पाहून त्यांनी तर तोंडात बोटंच घातली. त्या पहिल्या-वहिल्या अनुभवाविषयी बोलताना, सत्येन म्हणतो, माझ्या या मोहिमेच गावकर्‍यांनी खूप कौतुक केलं. ज्याच्या त्याच्या तोंडी माझंच नाव होतं. त्यांनी मला खाऊ पिऊ घातलं, माझी काळजी घेतली. गावात आल्यावर माझं नाव सर्वांच्या तोंडी झालं.’
हे म्हटल्यावर आपल्या मिश्कील शैलीत सत्येन म्हणतो, त्या कौतुकाची, शाबासकीची मला जणू नशाच चढली. त्यानंतर माझं जीवन म्हणजे न थांबणारी एक आनंदयात्रा झाली.’
मुलांनो, तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण खरंच, सत्येन दास नावाच्या एका ध्येयवेड्या माणसानं हा आगळावेगळा पराक्रम केला आहे. सत्येन गेली अनेक वर्ष कलकत्त्यात सायकल रिक्षा चालवून आपला चरितार्थ चालवतो. याच सत्येननं एकदा, नव्हे तर दोनदा कलकत्ता ते लडाखमधील खारतुंगला पास, जो जगातील सर्वोच्च मोटरेबल रस्ता असा कठीण प्रवास पार पडला आहे. कसलंही पाठबळ नाही. कोणतंही प्रशिक्षण नाही की किमान पैसे देखील नाहीत. सोबत होती तो फक्त सायकल रिक्षा.
याशिवाय सलग 405 दिवस संपूर्ण भारत दर्शन सत्येननं सायकलवर पूर्ण केलं आहे. स्वतःच्या बायकोला आणि अडीच वर्षाच्या मुलीला घेऊन कलकत्ता ते मनालीमधील रोहतांग पास असा प्रवास सुद्धा केला आहे. त्यासाठी सत्येन दास यांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंदवले गेले आहे.
मुलांनो, आवडली का रे सत्येन दास यांची ही जगावेगळी सफर? आपल्याला सत्येन दास यांच्याशी संपर्क साधावा असे वाटल्यास जरूर करावा.