अभिनयगीते कशासाठी?

शिक्षण विवेक    04-Oct-2021
Total Views |

abhinaygite kashasathi_1& 
 
आपली प्रत्येकाची आई ही आपल्यासाठी एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असते. खरं सांगायचं तर शिक्षक-अभिनेत्री-माता ऐशी त्रिगुणात्मक त्रैमूर्ती असते. ती खेळायला शिकवते, आपल्या प्रत्येक अवयवाची आपल्याला ओळख करून देते. त्या वेळी ती अभिनयाचा किती उत्तम उपयोग करून घेते. नाक कुठले, कान कशाला म्हणतात, डोळे कुठायत, आपले हात, पाय सारं काही आपल्याला तिच्यामुळे कळतं.
मग जगापुढे आपण कवायत करून दाखवतो. जग कौतुक करते.
‘‘दोन दोन हात माझे, दोन दोन पाय
आई म्हणते बाबूला, धावत धावत जाय
एकच नाक माझे, जीभ सुद्धा एक
एकच मान माझी, इंग्रजीत नेक
दोन दोन डोळ्यांनी, सारे जग बघतो
आई म्हणते, शाणा बाबू, आऽऽवडतो!’’
बाबूच्या घरात कोणीही पाहुणे आले की हात, पाय, जीभ, नाक, मान, डोळे दाखवीत बाबू नाचतो. अभिनयगीत गातो नि घरासकट घरात आलेले पाहुणे कौतुकच करतात.
अभिनयगीत मग बालवर्गात जाते. इंग्रजी शाळेतील मुले जॅक अँड जिल शिकतात. जॅक ङ्गेल डाऊन म्हणताना पडतात नि मराठी वर्गात आपण ‘ये रे ये रे पावसा’ हे अभिनय गीत गातो आणि ते गीत श्रावणात म्हटले तर आपण गीत म्हटल्यानेच पाऊस आला अशी गाढ श्रद्धाही असते.
‘अभिनयगीते जणू काढिती चित्रे सुंदर अवनीवरती
सजीव चित्रे, बोलू लागती, डोलती मोदे अवतीभोवती’
हेच खरे अभिनयगीतांचे सामर्थ्य. रडणे, हसणे, आनंदी होणे, क्रोधित होणे या सार्‍यांचा मुद्राभिनय आपण नृत्यात मोठेपणीही बघतो. तालबद्ध, गद्य किंवा सूरस्वरमंडित वलयांकित काव्य, अभिनयाशिवाय पूर्ण होत नाही.
अभिनय गीते कशासाठी? तर मनावर सारा काव्यार्थ ठसण्यासाठी, असा सारा साधा सरळ अर्थ आहे हो. गीतातील क्लिष्टता अभिनयाने कमी होते. कल्पना सुस्पष्ट होते.
मी पॅरिसच्या एका शाळेत ‘कान्हा वाजवी बासुरी’ हे चार ओळींचे मराठी गीत अभिनय करीत म्हटले. मुले सहावी या इयत्तेतील होती. आणि त्यांना ‘कान्हा’ परिचित नव्हता. मी त्यांना ‘कान्हा’ कोण ते मात्र इंग्रजीत सांगितले. डोक्यावर मोराचे पीस असतेच असे सांगितले कृष्णाच्या. आता गंमत ऐका मी म्हटले...अभिनय करीत...
‘कान्हा वाजवितो बासुरी’... ती म्हणाली ‘कान्हा प्लेज फ्लूट’. ‘दही-दुधाची चोरी’... पुन्हा अभिनय. चोरी दाखवणे जमले. पण दही-दूध...अभिनय? काय करू? मग दुधाचा कॅन दाखवला. दह्याचा पॅक दाखवला. अभिनय आणि वास्तव. ‘स्टीप्स मिल्क अँड कर्ड’. ‘कान्हा जातो गोपिकेघरी’...आता सार्‍याच स्कर्टवाल्या पोरी नि फ्रॉकवाली टीचर, साडीवाली फक्त मी...आणि मी! मी टीचर आहे हे त्यांना ठाऊक होते. मग त्यांचं भाषांतर ‘कान्हा गोज टू टीचर्स हाऊस’. ‘गोपिका नाचती ठेक्यावरती’... ‘मी नाचताच मुले उठली...’ ‘टीचर डान्सेस विथ कान्हा’
चला...टीचर तर टीचर! मग मी त्यांना चित्रे काढा म्हटलं तर सगळे कान्हा डोक्याला मोरपीस नि खाली शर्ट-पँटवाले ! नि गोपिका उर्फ टीचर गोलमटोल (माझ्यासारख्या) साडीवाल्या. ते शर्ट-पँटवाले कान्हा मी भारतात आणले नि माझ्या विद्यार्थ्यांना दाखवले तर कोण करमणूक झाली त्यांची!
पण कान्हा प्लेज फ्लूट
स्टीप्स मिल्क अँड कर्ड
गोपिका टीचर सीज
बट डान्सेस विदाऊट अ वर्ड’ फारच पॉप्युलर झाले.
तुम्ही परदेशात जात तेव्हा तुम्हांला एकाच भाषेत तोडकामोडका आधार असतो. इंग्लिश. कारण फ्रेंच, रशियन, जर्मन, चायनीज, जापनीज... किती भाषा शिकणार? आणि जपान, जर्मनी इंग्रजी भाषेचा स्वीकार करीत नाहीत. मग तुमचा अभिनयच कामी येतो ना!
आम्ही लहानपणी, ‘या बाई या, बघा बघा कशी माझी बसली बया’ किंवा ‘पलीकडे ओढ्यावर, माझे गाव ते सुंदर’ किंवा ‘खबरदार जर हाच मारुती जाल पुढे, चिंधड्या उडवीन राईराईएवढ्या’ ही गीते चालीवर अभिनय करीत म्हणायचो तेव्हा इतकी मज्जा यायची म्हणून सांगू! अंगात, अगदी प्रत्येकाच्या, अभिनय संचारायचा.
पण बालवर्गातच ङ्गक्त अभिनय गीते असतात का?
नाही हो. मोठमोठे शाहीर ‘सुंदरा मनामधि भरली’ म्हणून गळ्यातला गांधार वाटताना अभिनयाची साखर वाटीत ना? चार पिढ्या मागचे पंडितराव नगरकर ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा...अरूणोदय झाला’ ही भूपाळी म्हणत तेव्हा जो अभिनय करीत तो बघताना मला ङ्गार ङ्गार आवडे. मी केवळ साडेपाच वर्षांची होते. ते आमच्या वरच्या मजल्यावर राहात असत. पंडितरावांच्या या गीताने - या भूपाळीने महाराष्ट्राला वेड लावले होते नि ते साभिनय गातांना मी पाहिले आहे. काही गोष्टी तुमच्या मेंदूत ङ्गिट बसतात ना? तसेच हेही माझ्या मेंदूत ङ्गिक्स झालेले गीत! अमर भूपाळी!
आपण नुसते हात खाली ठेवून कधी देशभक्तीपर गीते म्हणतो का? जयहिंद, भारतमाता की जय हा उद्घोष कधी उच्चारावा खेरीज नि बंदमूठ उगारल्याखेरीज होतो काय? का? हे कोणी शिकवावे लागत नाही. यात अभिनयही नाही. आहे तो अभिनिवेश! अंतरातील देशाबद्दलचा उचंबळ. देशभक्ती! श्रद्धा! प्रेम आणि अंतरीचा उमाळा!
अभिनयगीते नृत्यातही साकार होतात.
‘डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती?’
‘वल्हव रे नाखवा होऽऽ वल्हव रे रामा!’
‘अल्याड डोंगर, पल्याड डोंगर मधेच माझे गाव
मधे वाहते अंगाई नदी, ‘सुंदर’ त्याचे नाव’
अशी गीते गातांना केवढा सुरेख नि सामूहिक अभिनय करतात मुले. शेतावरल्या रानगाण्यांना चालीवर म्हणताना मोठमोठे कविसुद्धा साभिनय, खटकेबाज गात रमतात. बैठकीची लावणी तर अभिनय केल्याशिवाय रंगतच नाही. आणि त्यावर ङ्गेटे, शेमले उधळत वाहवा करणे हाही एक अभिनयाचा उस्ङ्गूर्त नजराणाच नाही का? म्हणजे गीत जितके साभिनय तितकीच साभिनय दादही मोलाची. खरं ना?
मी न्यूयॉर्कला गेले असता एअरपोर्टवर थांबावे लागले. खूप तहान लागली. आपल्यासारखे काही स्टॉल्स दिसले खाण्या-पिण्याचे. ‘आय वाँट वॉटर’ मी म्हटले. तर वेटर न उमजून म्हणाला, ‘अ‍ॅ?’
पण झालं काय? ‘वॅाटर’ हा उच्चार पल्ले पडला नाही. मग मी गळा सुकल्याचा अभिनय केला. ‘ओ वॅाटर’ तो हसला. मी ही आनंदित! प्रोत्साहीत! म्हणाले, ‘येस वाटर!’...‘ गो देअर’... त्याने एका फाऊंटनकडे अंगुलीनिर्देश केला. अभिनय, घसा सुकल्याचा कामी आला.
टोक्योला मी उतरले, तेव्हा नेमकी माझी बस चुकली. एकासही इंग्लिश येत नाही? आणि माझी जपानी भाषेवर केवढी कमांड! एक्कही शब्द येत नाही. शेवटी बसचे चित्र काढले नि ती गेली, चुकली हे अभिनयाने सांगितले तेव्हा मदत मिळाली. अज्ञात स्थळी जाताना भाषा ज्ञात नसेल तर अभिनयच उपयोगी पडतो हे 14 देश हिंडून आल्यावर मला चांगलेच कळून चुकलेय. जपानी हॉटेल पंचतारांकित होते. मला हिंदुस्थानात फोन करायचा होता. मी सुखरूप पोहोचले म्हणून. मी हॉटेलच्या रिसेप्शनिस्टकडे गले. तिने सांगितले.. ‘मनी’ हात एवढे मोठे पसरले. म्हणजे मनी खूप लागेल. मग नकाशा दाखवून एका ठिकाणावर लाल ठिपका केला. ‘बूथ! मनी...’ चुटकी.. म्हणजे कमी! मी लगेच समजले.
पंचतारांकित हॉटेलातून फोन केल्यास अवाढव्य पैसे जातील भारतात फोन करायला. सार्वजनिक बूथवर जा. रिझनेबल मनी वापरून फोन होईल. ‘ये हृदयीचे ते हृदयी’ अभिनयातून पोहोचले. मी खरंच सांगते,
कुठल्याही देशी असा तुम्ही पण हृदयी असते प्रीत
तुमच्यासाठी अनोळखी कुणी गातो अभिनय गीत
खिसा ‘आपुला’ जपतो कोणी, स्नेहाच्या हृदयाने
अभिनय करितो, रस्ता दावित, मदत करी प्रेमाने!
अशी ही कोणतीही ‘चाल’ नसलेली माणसामाणसांची प्रेमळ हृदय-वीणा नि स्नेहल अभिनय गीते.
शाळा कॅालेजात आपण जेव्हा कुठल्या गीत-स्पर्धेत भाग घेतो तेव्हा जोडीने अभिनय आलाच. गीत आणि गीतास अनुरूप असा अभिनय जो जोडगोळी आहे, सदा एकमेकांसोबत असणारी नि कधीही न तुटणारी.
तर अभिनय गीतांचे महत्त्व अधोरेखित करताना म्हणावेसे वाटते,
* अभिनय गीते गीतात जान आणतात, जोश आणतात.
* चुस्ती-स्फूर्ती का इंधन म्हणजे अभिनयगीत
* अभिनय गीतांनी बालकांना शब्दांची नवी ओळख होते.
* अभिनय आणि गीत ही जोडगोळी गीताचे वैभव वाढवते.
* अकृत्रिम अभिनय गीतांचा अलंकार आहे.
* अभिनय गीत बघताना प्रेक्षकांना अधिक आनंद मिळतो.
* अभिनय गीत भाषेचा अडसर दूर करण्यास मदत करते.
तर एका सुरेल, सुंदर अभिनय गीताने आपला निरोप घेते. गोलाकार उभ्या, सर्व सदस्यांनी हातात हात घ्यावयाचे नि म्हणायचे हे गीत. जे एकात्मता, देशावरली आणि माणसांवरली प्रीत अधोरेखित करेल.
हातात घेउनी हात गाऊ या, सुरेल सुंदर गीत
दावू या जगाला सारे मिळूनी, हृदयामधली प्रीत
माणूस माणसा प्रेमे दावी, प्रेमभरी ही रीत
हातात घेऊनी हात गाऊ या, सुरेल सुंदर गीत!
हा प्रिय भारत देश आमुचा, अनेक इथल्या जाती
हिंदू, मुस्लीम, सिख्ख, इसाई, करिती अजोड प्रीती
भिन्न भिन्न जरी वेश आमुचे भारतावरी भक्ती
संकटसमयी एकच सारे ‘आम्ही भारतीय’ नीती
दावू जगाला, कसे जगावे, प्रेमभाव आळवीत
हातात घेउनी हात गाऊ या, सुरेल सुंदर गीत
जयहिंद!
- डॉ. विजया वाड
9820316697