मुलांशी सुसंवादाचा मार्ग...

शिक्षण विवेक    05-Oct-2021
Total Views |

mulanshi susanvadacha mar 
आमच्या मुलाच्या मुंजीच्या वेळचा प्रसंग. आडगावातल्या कुलदैवताला गेले असताना मुलालाच एक सोन्याची अंगठी सापडली. संध्याकाळपर्यंत तिथे होतो, पण वस्तू शोधायला कोणीच आलं नाही म्हटल्यावर आम्ही ती घरी आणली.
वडीलधार्‍यांनी ‘त्याच्याच नशिबात होती,’ ‘देवाचाच प्रसाद’ इ. मतं देऊन अंगठीची मुलालाच काही वस्तू बनवू या असे ठरले. अंगठी मिळाल्यावर खुश असलेली स्वारी ही चर्चा ऐकताना गप्पगपच होती. विचारल्यावर म्हणाला,‘‘ आई, तूच म्हणतेस ना दुसर्‍याची वस्तू घेऊ नये, मग ही अंगठी माझी कशी? मला काही नको ह्याचं.’’ त्याचं म्हणणं खरंच तर होतं.
पण हे ऐकल्यावर घरातली तरुणपिढी सरसावली, ‘ हे पैसे एखाद्या संस्थेला किंवा त्याच्या शाळेला देऊ’ पण गंमत म्हणजे मुलाला हे सुद्धा पटेना. त्याचं म्हणणं,‘‘ ती अंगठी आपली कुठाय- मग ती परस्पर दुसर्‍याला कशी द्यायची?(आणि फुकटच श्रेय घ्यायचं! हे म्हणायचं त्याचं वय नव्हतं.) आपल्याला बाप्पाने दिल्येय, आपण ती बाप्पालाच परत देऊ.’’
आम्ही संभ्रमात प्रत्येकाचे विचार त्यांच्यापरीने ठीकच. दोन्ही पिढ्यांच म्हणणं, ‘‘त्याच काय ऐकता? त्याला काय कळतं? पण आम्ही मुलांच ऐकलं. कौतुक म्हणून न्वहे - आपलं म्हणणं ऐकून घेणारं कोणीतरी आहे. ह्या त्याने आमच्यावर टाकलेल्या विश्‍वासामुळे. आपलं ऐकणारसुद्धा कोणी नाही.’ ह्याचं दु:ख आपण मोठ्ठे जाणतोच ना.
कधीकधी मुलांच्या बोलण्यातून हट्ट, संताप उर्मटपणा व्यक्त होतो पण त्याची कारणसुद्धा आपल्याला त्यांचं बोलणं नीट ऐकल तर मिळू शकतात. दुर्देवाने आपण पालकच कौतूक/वेळ नाही/ प्रेस्टीज पाईंट इ. कारणांनी त्यांच नको ते ऐकतो पण मुलांच्या स्वत:च्या विश्‍वासातल्या गोष्टी वेळ नाही/ काहीपण बोलतोस असे म्हणून दुर्लक्षित करतो हे भान सुजाण पालक-शिक्षक दोघांकडेही पाहिजे.
‘मुलांच ऐकणं’ म्हणजे त्यांच्याशी होणारा सुसंवाद आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीपुढे मान तुकवणं न्हवे. मुलांचं तुम्ही काय ऐकता ह्याबरोबरच कसं आणि किती ऐकता हे पण तेवढंच महत्त्वाच ना!
आमच्याबाबतीत म्हणाल तर आम्ही ती अंगठी एका समाधी मंदिरात ठेेवली जिथे त्यांच्या दानपेटी निधीतून पाठशाळा चालवली जाते.
- शिवानी सुबोध जोशी
शि.प्र. मंडळी मुलींची शिशुशाळा