प्रवास शतकाचा!

शिक्षण विवेक    15-Nov-2021
Total Views |

pravas shatakacha_1  
 
श्रावण महिना होता. पावसाची एक मोठी सर येऊन गेली. लगेच ऊनही पडलं. वडिलांनी आपल्या मुलांच्या हातात थोडे पैसे दिले. पिशवी दिली आणि सांगितलं की, बाबासाहेब आज आपल्याकडे श्री सत्यनारायणाची पूजा आहे तर, त्यासाठी लागणारं साहित्य मंडईतून घेऊन ये. त्या वेळी त्या मुलाचं म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांचं वय होतं आठ वर्षे. पिशवी आणि पैसे घेऊन ते मंडईत जायला निघाले खरे; पण ते मंडईत गेलेच नाहीत. इकडे पूजेची वेळ झाली तरी, त्यांचा पत्ताच नव्हता. मग शोधाशोध सुरू झाली, तेव्हा मुठीत पैसे आणि एका हातात पिशवी धरलेले बाबासाहेब भारत इतिहास संशोधक मंडळात कुठलंस एक मोठं पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत असताना सापडले.
वडिलांच्या लक्षात आपल्या मुलाचा कल कोठे आहे हे आलं आणि मनोमन त्यांना समाधान वाटलं. पुढे त्यांनी बाबासाहेब आणि त्यांच्या दोन भावांना अशा आपल्या तिन्ही मुलांना सिंहगड, तोरणा वगैरे किल्ले दाखवले आणि त्या वेळी बाबासाहेबांना किल्लयांबद्दल आणि त्या किल्ल्यांच्या ‘राजा’बद्दल म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो अभिमान वाटला, जे प्रेम दाटून आले, ते आजपर्यंत तसंच टिकून आहे.
वयाची गेली 92 वर्षे त्या एका विचाराने ते झपाटून गेले आहेत. शिवाजी महाराजांचं, त्यांच्या इतिहासाचं, त्यांच्या पराक्रमाचं, शौर्याचं, त्यांना जणू वेडच लागलं आणि वेड लागल्याशिवाय इतिहास निर्माण होत नाही. इतिहास हा अत्तराच्या थेंबातून आणि गुलाबजलातून निर्माण होत नाही. तो घामाच्या आणि रक्ताच्या थेंबांतून निर्माण होते. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा वेड्यांचा इतिहास आहे आणि ते वेड ज्यांनी मला लावलं त्या माझ्या आई-वडिलांबद्दल आणि शिक्षकांबद्दल मी अपरंपार कृतज्ञ आहे,’ अशी भावना आजही बाबासाहेब व्यक्त करतात.
पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, पुण्यभूषण अशा असंख्य पुरस्कारांनी गौरवांकित झालेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे आपल्या देशाला ललामभूत ठरले, परंतु या सगळ्या पुरस्कारांनी गौरव होण्यासाठी नव्हे तर, छत्रपतींचा गौरवशाली इतिहास सर्वसामान्यांना, आबालवृद्धांना नेमकेपणाने माहीत होण्यासाठी. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत.
शिवाजी महाराज ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या सर्व ठिकाणी स्वतः बाबासाहेबांना जाण्यात मोठी धन्यता वाटली. तिथे जाण्यासाठी त्यांनी लाखो मैल प्रवास केला. ते अनेकदा पायी चालत गेले, सायकलवरून गेले, उन्हा -तान्हात, पावसात भिजत गेले. जिथे जिथे काही पुरावे सापडतील ती सगळी ठिकाणे त्यांनी पालथी घातली.
बरेचसे पुरावे गोळा करता आले. असंख्य कागदपत्रे जमा झाली. त्यातली जवळपास सगळीच मोडी लिपीतील होती. बाबांनी ती समजावीत यासाठी मोडी लिपी अवगत केली. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी प्रा. त्र्यं. श शेजवलकर यांच्यासारख्या अनेक विद्वान संशोधकांच्या ग्रंथांचा अभ्यास केला. ग.ह. खरे यांना बाबा गुरूथानी मानतात आणि या सगळ्यातून त्यांनी स्वतः शिवचरित्र लेखनाला सुरवात केली.
सुरवातीला ते ‘एकता’ नावाच्या मासिकातून प्रसिद्ध होत होते. नंतर त्यांनी अधिक सोप्या भाषेत लिहायला सुरवात केली आणि पुढे ‘राजा शिवछत्रपती’ हा एक हजार पानांचा अतुलनीय ग्रंथ तयार झाला. त्या ग्रंथाला भरपूर पुरस्कार लाभले. साहित्यसम्राट आचार्य प्र.के.अत्रे आणि लोकोत्तर विनोदी लेखक पु.ल. देशपांडे यांच्यासारख्या दिग्गजांनी या ग्रंथाचं प्रचंड कौतुक केलं. आजतागायत या ग्रंथाच्या लाखो प्रती छापल्या गेल्या आणि विकल्या गेल्या आहेत. अजूनही या ग्रंथाला प्रचंड मागणी आहे!
बाबा केवळ पुस्तक लिहून थांबले नाहीत तर, त्यांनी महाराजांचा इतिहास आपल्या व्याख्यानांमधून श्रोत्यांना सांगितला आणि तो जिवंत केला.
लहानपणी त्यांनी खूप कीर्तने ऐकली आणि स्वतः केलीदेखील. त्यामुळे त्यांना व्याख्यान कसं द्यायचं याचा एक धडाच मिळाला. याशिवाय त्यांना एक सवय होती. ती म्हणजे नकला करण्याची. ते उत्तम नकला करतात. पूर्वी नाटक पाहून घरी आल्यावर त्यातील पात्रांच्या ते नकला करत. वडिलांनी एकदा ते पाहिलं आणि ते एकदम म्हणाले ‘बाबासाहेब, तुम्हाला नट व्हायचंय? तर, मग केशवराज दादांसारखं व्हा!’
बाबांनी एकदा तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची अगदी त्यांच्यासमोरच नक्कल केली. त्या वेळी सावरकर बाबांना जे म्हणाले त्यामुळे बाबांचं आयुष्य बदलूनच गेलं. सावरकरांना बाबांनी त्यांची केलेली नक्कल आवडली, पण ते म्हणाले ‘आयुष्यभर अशाच दुसर्‍यांच्या नकला करत राहणार आहेस का? स्वतः च काहीतरी कर.’ ते ऐकून बाबांनी मग नकला करणं सोडून दिलं.
बाबा व्याख्यानाच्या बाबतीत सावरकरांना गुरूस्थानी मानतात. बाबांनी आतापर्यंत सुमारे 12,000 व्याख्याने दिली आहेत. जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही (काही ठिकाणी हिंदीतून) त्यांची व्याख्याने झाली. एवढंच नव्हे तर, भारताबाहेर - परदेशात - इंग्लंड, अमेरिकेतही त्यांची व्याख्याने झाली आहेत.
‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाच्या छपाईसाठी लागणारे पैसे खूप होते. बाबांनी ते पैसे मिळवण्यासाठी इतर नामवंत लेखकांची पुस्तके गावोगावी जाऊन विकली अगदी हातात कोथिंबीरची गड्डी घेऊन रस्त्यावर उभ राहून ओरडून विकतात... तसे विकली ! कुठल्याही श्रमाला त्यांनी कमी लेखले नाही.
भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, परंतु गोवा, दीव-दमण मात्र पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. त्यासाठी गोवा मुक्तीसंग्रामात बाबांनी सुप्रसिद्ध गायक कै. सुधीर फडके यांच्याबरोबर भाग घेतला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 300 वर्षे पूर्ण झाली. त्या वेळी म्हणजे 1974 मध्ये बाबांनी दादरच्या शिवाजी पार्कवर ‘शिवसृष्टी’ निर्माण केली. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा लोकांना ‘याचि देही, याचि डोळा’ पाहायला मिळाला. ती ‘शिवसृष्टी’ पाहण्यासाठी देश-विदेशातील असंख्य रसिक आले होते .
याच सुमारास भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्वर-संगीताने नटलेली आणि नामवंत कवींच्या कवनांनी साकारलेली ‘शिवकल्याण राजा’ ही ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. त्यामध्ये बाबांनी केलेलं निवेदन प्रचंड गाजलं. ही ध्वनीमुद्रिका आज 47-48 वर्षे झाली तरी अजूनही लोकप्रिय आहे.
‘राजा शिवछत्रपती’ हा एक मोठा ग्रंथ तर त्यांनी लिहिलाच, पण त्याबरोबर आणखीही काही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांची एकूण संख्या 25 आहे. त्यातली काही पेशवाईत घडलेल्या घटनांच्या वर्णनाची पुस्तके आहेत. ‘महाराज’ हे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करणारे पुस्तक खूप गाजले. त्या पुस्तकात अर्ध्या पानात मोठे चित्र आहे व त्याखाली त्या चित्रातील प्रसंग बाबांनी त्यांच्या सुंदर शब्दांत वर्णन केला आहे. त्याचबरोबर ‘शेलारखिंड’ ही शिवकालावर आधारित कादंबरीही खूप लोकप्रिय ठरली. त्यावर ‘सर्जा’ या नावाचा चित्रपटही निघाला.
बाबा आपल्या या सर्व काळात लेखन, व्याख्यान यामध्ये सतत व्यग्र असत. आम्हा घरच्यांनाही ते फारसे भेटायचे नाहीत. सारखा त्यांचा प्रवास सुरू असे. एकदा ते रोमला गेले असताना त्यांनी एक प्रयोग नाटकाचा प्रयोग पहिला. आणि त्यांच्या मनात विचार सुरू झाला की, असा प्रयोग आपल्याला भारतात करायला हवा. ते त्या विचाराने अगदी झपाटूनच गेले आणि त्यातून ‘जाणता राजा’ हे महानाट्य निर्माण झालं. एका वेळी 200 कलाकार रंगमंचावर हे नाट्य सादर करतात, याशिवाय हत्ती, घोडे, उंट यांसारखे प्राणीही यात काम करतात.
या नाटकाचा हिंदी, इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आणि त्यांचे प्रयोग सबंध भारतभर इतकेच नव्हे तर, अमेरिकेतही झाले. प्रयोगांची संख्या 1200 एवढी झाली असेल. बाबा असे कीर्तिमान होत गेले तरी, वडीलमाणसांबद्दल, भावे स्कूल या त्यांच्या शाळेतील शिक्षकांबद्दल असलेला त्यांचा आदर किंचितही कमी झालेला नाही.
आज वयाच्या 100 व्या वर्षांत त्यांनी पदार्पण केले आहे; तरीही आपल्या तल्लख स्मरणशक्तीमुळे त्या सर्वांची, त्यंानी दिलेल्या शिकवणुकीची बाबांना आठवण आहे, हे विशेष!
बाबांच्या आयुष्याच्या प्रवासाची ही घोडदौड या वयातही थांबलेली नाही. पूर्वी घोड्यावर बसून ते प्रवास करत होते. ते थकल्याचे कधीच जाणवले नाही. ते कधीच निराश होत नाहीत. याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा हे त्यांच्या जगण्याचं कारण आहे. छत्रपतींच्या इतिहासाचा ध्यास त्यांनी घेतला आणि आयुष्यभर तो त्यांचा श्वासच झाला. शिवशाहीर ‘बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे’ म्हणजे आमचे बाबा आमच्या घराण्याचा इतिहास आहे, वर्तमान आहे आणि पिढ्यान्पिढ्यांसाठी कमावून ठेवलेलं नाव आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
पुण्यातील कात्रज रस्त्यावर 13 एकर जागेमध्ये ‘शिवसृष्टी’ उभारण्याचं काम त्यांच्या कल्पनेतून साकार होत आहे. त्यासाठी खूप धन आणि वेळेची आवशक्यता आहे. त्यासाठी बाबांना आणखी काही वर्षांचं आयुष्य लाभायलाच हवं. त्यांच्या ग्रंथविक्रीतून, व्याख्यानातून जे धन त्यांना समाजाकडून मिळालं, ते सगळं त्यांनी निरनिराळ्या शैक्षणिक, आरोग्य अशा विविध प्रकारच्या संस्थांना उदारहस्ते देऊन टाकलं.
शेवटी एकच म्हणावसं वाटतं की, बाबांनी शिवचरित्र नुसतं लिहलं, नुसती व्याख्यानं दिली असं नव्हे तर, ते शिवचरित्र जगले आहेत. त्यांचाबद्दल कितीही लिहिलं तरी, अपुरं वाटावं असं त्यांचं कर्तुत्व आहे. ते आदर्श आहे, अनुकरणीय आहे, त्यांच्या कार्यातून ते अजरामर झालेले आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास,
‘तृप्त मी शिवशक्तीच्या गानात झालो शारदे,
मागणे काहीच नाही, एवढे वरदान दे,
रक्त दे, मज खेद दे,
तुज अर्घ्य देण्या अश्रू दे !
- डॉ. चित्रलेखा पुरंदरे