मेतकूट

शिक्षण विवेक    16-Nov-2021
Total Views |

metkut_1  H x W 
 
छोट्या दोस्तांनो,
कशी झाली दिवाळी? खूप मज्जा केलीत की नाही? मित्र-मैत्रिणींना भेटलात का? तर आजचा आपला शब्द ’मैत्री’शीच निगडीत आहे.
मेतकूट जमणे म्हणजे अतिशय घट्ट मैत्री असणे, हे तुम्हाला माहितीच आहे; पण ’मेतकूट’ हा शब्द आला कुठून? लहानपणी आजी तुम्हाला तूप, मीठ, भात आणि मेतकूट कालवून खायला घालायची आणि विचारायची की बघ, खमंग लागतोय की नाही? त्यातलेच हे मेतकूट की काय?
तर मेतकूट हा एक तोंडी लावण्याचा प्रकार आहे. तांदूळ, मेथ्या, मोहरी आणि डाळी विशिष्ट प्रमाणात एकत्र करून मेतकूट तयार होते. शब्दशः सांगायचे तर मेथ्यांचे कूट म्हणून मेतकूट; पण गंमत म्हणजे खाण्यातले मेतकूट आणि मैत्रीसंदर्भात वापरले जाणारे मेतकूट यांचा एकमेकांशी संबंध नाही.
संस्कृतमधल्या ’मित्र’ शब्दावरून प्राकृत भाषेत ’मित्त’ शब्द आला आणि त्यालाच पुढे ’कूट’ जोडल्यावर तयार झाला ’मित्तकूट’ आणि त्याचेच झाले मेतकूट. कूट म्हणजे समूह, एकत्रीकरण. मित्र गोळा होणे, एकत्र येणे, स्नेह जुळणे या प्रक्रियेला मेतकूट जमणे असे म्हणतात.
आता यात आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की काही वेळा कूट शब्दाचा अर्थ कोडे असाही लावला जातो. त्या अर्थाने मेतकूट जमण्याला जरा गूढ छटा येते. म्हणजे अगदीच वेगळ्या स्वभावाची किंवा वेगवेगळ्या आवडीनिवडी असलेली माणसे जरा एकत्र आली तर यांचं कस काय मेतकूट जुळलं बुवा?’ असा प्रश्न येतो त्यात, अशा मैत्रीबद्दल अविश्वास व्यक्त केलेला असतो, त्यात काहीतरी न सुटलेलं कोडं आहे, असा अर्थ सूचित होतो.
मग आता, तुमचं ज्यांच्याशी मेतकूट जमतं त्यांनाही याचा अर्थ नक्की समजावून सांगा! आणि हो! न विसरता आजीच्या हातचा गरमागरम तूप-मेतकूट-भात नक्की खा, थंडीत मस्त लागतो! 
तुमची,
नेहाताई