कबीरची गोष्ट

शिक्षण विवेक    20-Nov-2021
Total Views |

kabirchi gosht_1 &nb 
 
ही गोष्ट आहे कबीरची. कबीर उंच आणि गोरा, टपोर्‍या व बोलक्या डोळ्यांचा एक मनस्वी मुलगा होता. त्याला प्राणी, पक्षी फार आवडायचे. ते त्याचे मित्र होते. दोन छोटी कासवे ‘चुन्नू’ व ‘मुन्नू’ आणि खूप सार्‍या गोगलगायी यांच्याशी त्याची विशेष मैत्री होती. तो खूप वेळ त्यांच्याशी खेळत असे. तळ्यातले मासे व रोज त्याच्या घराजवळच्या झाडावर येणारे पक्षी हेसुद्धा त्याचे मित्रच होते.
कबीरचे घर उंच डोंगरावर होते. तेथे हिवाळ्यात बर्फ पडत असे. त्यावेळी सगळा डोंगर बर्फाने झाकला जाई व पांढराशुभ्र दिसे. उन्हाळ्यात डोंगरावर गवत असे, त्यावेळी तो हिरवागार दिसे. कबीर त्या डोंगरावर, बर्फात व गवतावर खूप खेळायचा. वरून खाली घरंगळत जायचा. त्याला खूप गंमत वाटायची. डोंगराच्या पायथ्याशी एक तळे होते. उन्हाळ्यात तेथे बगळे येत आणि थंडी सुरू झाली की दूर उडून जात. कबीरला पाण्यातील बगळे बघायला खूप आवडे. तो आई-बाबांबरोबर तळ्याकाठी बसे आणि बगळे बघे.
एके दिवशी कबीर डोंगर उतरुन तळ्याकाठी गेला. कबीरला बगळ्याचे छोटेसे पिल्लू दिसले. एकटेच होते ते. बहुतेक बगळे निघून जाताना त्याला इथेच विसरून गेले होते. त्या पिल्लाने अजून डोळेसुद्धा उघडले नव्हते. ते खूपच पिटुकले होते.
कबीर म्हणाला, ‘‘आई, या पिल्लाची आई तर गेली उडून! आता पिल्लू कुठे जाईल? याला आपण घरी घेऊन जायचं का?’’
आई म्हणाली, ‘‘हो चालेल!’’ आणि मग ते पिल्लू कबीरने घरी आणले.
घरी आल्यावर कबीरने ते पिल्लू ठेवण्यासाठी एक टोपली घेतली. त्यात मऊ मऊ कापड ठेवले आणि त्यात हळूच पांढर्‍याशुभ्र पिल्लाला ठेवले. कबीरने त्याचे नाव ठेवले ‘कापूस’! खरंच ते कापूसच दिसत होते. कबीरने रात्री झोपताना ती टोपली बेडखाली ठेवली.
असेच काही दिवस गेले. कबीर दिवसभर टोपलीतल्या कापूसला बघत बसायचा; पण कापूसने डोळेच उघडले नव्हते. त्याला काहीच दिसत नव्हते; पण कबीर हळूच त्याच्या अंगावरून हात फिरवी. आई ‘कापूस’ला खायला देई. कबीर रोज बेडवर टोपली ठेऊन त्याच्याकडे एकटक बघत बसे. ‘कापूस डोळे कधी उघडणार?’ असे त्याला वाटे. बाबांनी त्याला सांगितले होते, ‘‘थोडे दिवसांनी कापूस डोळे उघडणार आणि मग कबीरबरोबर खेळणार!’’
आणि एके दिवशी गंमतच झाली! कबीर कापूसला जवळ घेऊन त्याच्याकडे बघत बसला होता आणि कापूसने हळूच डोळे उघडले! कबीरला खूप आनंद झाला! कापूस कबीरकडे बघत होता, कबीर कापूसकडे बघत होता! कापूस कबीरला चिकटला. कबीरने आई बाबांना बोलावले आणि कापूसने डोळे उघडले ते त्यांना दाखवले. तिघांना खूप आनंद झाला. त्यादिवशी कापूस बेडखालच्या टोपलीत झोपायलाच तयार नव्हता. सारखा कबीरला चिकटून बसत होता. शेवटी कबीरने त्याला जवळ घेतले व दोघे बेडवर झोपले. कबीरच्या कुशीत कापूस झोपला. कबीरला फार छान वाटले.
सकाळी कबीर उठला. कापूसही उठला. कबीर डायनिंग टेबलजवळ दूध पिण्यासाठी गेला तर कापूसही त्याच्या मागे मागे गेला. कबीर अंघोळीसाठी टबमध्ये बसला तर कापूसही टबमध्ये पोहू लागला. कबीर जेवायला बसला तर कापूस त्याच्या ताटात जेवू लागला. कबीर टी. व्ही. बघायला सोफ्यावर बसला तर कापूस त्याच्या शेजारी जाऊन बसला.
कबीर जे करी तेच कापूस करी. कबीर चालायला लागला की कापूस मागून चाले, कबीर थांबला की कापूस थांबे, कबीरने उड्या मारल्या की कापूस उड्या मारे, कबीर झोपला की कापूस झोपायचा.
आईने कबीरला सांगितले, ‘‘कबीर, बगळ्याच्या पिल्लाने डोळे उघडल्यावर तुला पहिल्यांदा पाहिले ना त्यामुळे तूच कापूसला त्याची ‘आई’ आहेस असे वाटले. आता तू करशील तेच कापूस करणार!’
कबीरला खूप मज्जा वाटली. ‘‘किती गंमत!’’ तो म्हणाला आणि उड्या मारू लागला. कापूसही उड्या मारू लागला.
आता कापूस थोडा मोठा झाला. त्याला पंखही फुटले. डोंगरावर आता बर्फ पडू लागले होते. कबीर त्याला घेऊन दुपारी डोंगरावर जाई. दोघे बर्फात खेळत, उड्या मारीत, पळत, बर्फात लोळत, मज्जा येई! खूप गंमत वाटे दोघांना! कधीकधी ते तळ्याकाठी फिरायला जात. पुढे कबीर मागे कापूस. त्यांची जोडी फार मजेशीर दिसे!
आता कापूस मोठा झाला होता व त्याला पंखही आले होते; पण तो उडतच नव्हता. फक्त चालायचा आणि उड्या मारायचा. एके दिवशी बाबा कबीरला म्हणाले,
‘‘कबीर, आपण कापूसला उडायला शिकवू! तू करशील तसंच कापूस करतो ना?’’
‘‘हो बाबा!’’ कबीर म्हणाला.
‘‘मग चल बाहेर. तू शिकव त्याला.’’ कबीरला खूप मज्जा वाटली. कापूसला उडायला शिकवायचे! कित्ती छान!’’
कापूसला घेऊन कबीर आणि बाबा डोंगरावर गेले. बाबा म्हणाले, ‘‘कबीर, हात लांब कर, हलव, आणि पळ!’’ कबीरने तसे केले. कापूसही पंख पसरून कबीरमागे धावू लागला; पण छे! कापूस काही उडेना! आता काय करायचे?
बाबा म्हणाले, ‘‘कबीर थिंक थिंक कर!’’
कबीर म्हणाला, ‘‘बाबा, आयडिया! मी उडालो की कापूस उडेल; पण बाबा मी कसा उडणार?’’
बाबा म्हणाले, ‘‘मी तुझ्यासाठी विमान बनवतो. तू त्यात बसून उड. म्हणजे कापूसपण उडेल.’’
‘‘मीपण तुम्हाला विमान बनवण्यासाठी मदत करणार!’’ उड्या मारत कबीर म्हणाला. कापूसही उड्या मारू लागला. मग बाबांनी छोटेसे विमान तयार केले. आई व कबीरने बाबांना मदत केली.
विमान तयार झाले. सर्वजण डोंगर उतारावर गेले. कबीर विमानात बसला. बाबापण बसले. कापूस मागे उभा राहून बघत होता. विमान जोरात पळाले व थोडेसे वर उडले. कापूसही मागे पळाला व थोडासा वर उडला. कबीरने टाळ्या पिटल्या. त्याला खूप मज्जा वाटत होती. हळूहळू कापूस उडायला लागला. विमान पुढे कापूस मागे असे ते उडत असत. ते तळ्यावर उडत, डोंगरावर उडत. खूप मज्जा येई!
हिवाळा संपला. थंडी पळून गेली. उन्हाळा आला. तळ्यात पुन्हा खूप बगळे आले. कबीर कापूसला घेऊन एकदा तळ्याकाठी गेला. बगळे बघून कापूसला खूप आनंद झाला व बगळ्यांबरोबर पाण्यात खेळू लागला.
असे खूप दिवस गेले. पुन्हा हिवाळा आला. सर्व बगळे एके दिवशी उडून गेले. कापूसही त्यांच्याबरोबर उडून गेला. कबीरने कापूसला ‘टाटाऽऽऽ’ केले. कबीरला खूप वाईट वाटले; पण बाबा म्हणाले, ‘‘कबीर, उन्हाळ्यात कापूस मोठा होऊन पुन्हा तुला भेटायला येईल!’’
- प्रतिमा दुरुगकर