निर्झरा

शिक्षण विवेक    23-Nov-2021
Total Views |

nirzara_1  H x
 
आटपाट नगर होत त्या नगरात निर्झरा राहायची. निर्झरा इयत्ता तिसरीत शिकणारी. वय वर्ष 8 आई-बाबांची एकुलती एक लेक, गोरी गोरी पान, घार्‍या डोळ्यांची, बारीक शरीरयष्टी, केसांची किंचित सोनेरी छटा पण नेहमी बॉयकट. आवडत नसे तिला तो बॉयकट. पण आईच्या आग्रहाखातर ठेवायची. कारण विचारलं तर दोन वेण्यांत मी खूप सुंदर दिसते ना! मग मला कुणाची दृष्ट लागली तर? म्हणून तिची आई सारखे तिचे केस कापी. निर्झरा नावाप्रमाणेच होती. सतत खळखळत हसणारी, आनंदी राहणारी, खेळणारी. आई-बाबांवर खूप प्रेम करणारी. आईसोबत उड्या मारत यायची शाळेत, कधीही शाळा चुकवायची नाही. तरीही अभ्यास राहीला तर आई तो लगेच दुसर्‍या दिवशी पूर्ण करून बाईंना दाखवायची. आईलाही तिच्या शिक्षणाबद्दल तळमळ होती. बाबांचा बिझनेस होता. त्यामुळे बाबांना फार वेळ तिच्याकडे लक्ष द्यायला जमत नव्हते. आईही जमेल तशी मदत करायची बाबांना. बाबाही वेळ मिळाला की निर्झराशी खूप खेळायचे, गोष्टी सांगायचे, तिची शाळेची तयारीही बर्‍याचदा करून द्यायचे. तिलाही बाबांबद्दल खूप आदर होता. एकूणच निर्झरा तिच्या जगात खूप खूश होती. अशातच आई-बाबांमधले तिने ऐकलेले पहिलेवहिले भांडण तिच्या कानावर आले. निर्झराचा आनंद एकदम मावळला. तिला एकदम आठवलं की परवा शाळेत जाताना आईची मैत्रीण आईला म्हणत होती, ‘काय गं, आता वादळ शांत आहे ना?’ त्याचा अर्थ तिला तेव्हा समजला नव्हता, कारण आईने तो विषय निघताच तिला वर्गात जायला सांगितले. पण एवढे काही असेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आई-बाबांच्या कुरबुरी तिच्या मागे व्हायच्या, आता त्या तिच्या समोरही व्हायला लागल्या. तिला कळेच ना की हे सगळं कशामुळे होतंय? का भांडतात आई-बाबा? या वादात बाबा खरे की आई खरी? मला का नाही सांगत कोणी नक्की काय झालं ते? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात घोळत होते. त्यामुळेच ती हल्ली शाळेत उदास राहत असे. अभ्यासातही मागे पडू लागली. बाई वर्गात काय शिकवतात याकडे तिचे लक्षच नसायचे. डबा खातानाही एकटी बसायची. फारशी कुणाशी बोलत नव्हती. एकटी कुठेतरी हरवल्यासारखी. शाळेत रजा राहण्याचे प्रमाणही वाढले होते. हे सगळं तिच्या बाईंच्या लक्षात यायला लागले. तसेच तिच्या मैत्रिणीच्याही लक्षात येत होत. कारण बर्‍याच दिवसांत निर्झरा तिच्याशी बोललीच नव्हती. बाईंनी तिच्या मैत्रिणीकडे निर्झराबद्दल चौकशी केली. पण तिलाही काहीच माहीत नव्हते. मग बाईंनी मात्र तिच्याशी प्रत्यक्ष बोलायचे ठरवले. त्याप्रमाणे मुलांना खेळायच्या तासाला पाठवून बाई निर्झराशी बोलल्या. पण निर्झराने कुठलाही संदर्भ बाईंना लागू दिला नाही. उलटं बाई मी खेळायला जाऊ? असे निरागसपणे विचारून खेळायला गेलीही. मैदानावर तिची मैत्रीण साऊ तिची वाटच बघत होती. तिने तिला अडवलं आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिलाही न सांगता निघणार होती निर्झरा, पण साऊनेच तिला अडवून ठेवलं आणि माझी मैत्री नको का तुला? असा प्रश्न विचारल्यावर मात्र निर्झरा गोंधळली हिला सांगू का नको माझ्या आई-बाबांबद्दल? हिला काय वाटेल? असा विचार करत असतानाच, साऊ म्हणाली, ‘घाबरू नको, काय झालंय? तू रोज शाळेत का येत नाहीस? बोल ना निर्झरा.’ असं ऐकताच निर्झरा रडायला लागली. तिने साऊला सगळी हकीकत सांगितली. तितक्यात खेळायचा तास संपल्याने मुले वर्गात जाऊ लागली. निर्झराही पटकन बाथरूममध्ये जाऊन तोंड धुवून वर्गात गेली. बाईंनी हे सगळं पाहिलं होत. साऊही आपण निर्झराला कशी मदत करू शकतो? या विचारात असताना, तिने बाईंकडे पाहिलं? बाईही तिच्याकडे पाहत होत्या. दोघीही जणू एकमेकींना काही सांगायचं मला तुला या नजरेने बघत होत्या. शाळा सुटल्यावर साऊ मुद्दामच उशिरा निघाली. तोपर्यंत निर्झरा आईसोबत शाळेतून निघाली होती. साऊने स्वत:हूनच बाईंना सगळं सांगितले. बाई काही करता येईल का? असा प्रश्न विचारून निघून गेली. बाईंच मन मात्र रात्रभर पर्याय शोधात होतं. दुसर्‍या दिवशी बाईंनी शाळेत गेल्याबरोबर निर्झराच्या आई-बाबांना बोलावून घेतले. बाई निर्झराबद्दल सगळं काही बोलल्या. तेव्हा आई-बाबांनाही आपली चूक समजली आणि इथून पुढे अशीच हसरी निर्झरा असेल असे बाईंना वचन देऊन गेले. दुसर्‍या दिवशी निर्झरा परत उड्या मारत, हसत शाळेत आली. कारणही तसेच होते. आई-बाबा दोघेही सोडवायला आले होते ना!
मुलांनो घरी जसे आई-बाबा आपल्या जवळचे असतात, तसेच शाळेतही आपल्या बाई, मित्र-मैत्रिणीही जवळचे असतात. त्यांच्याशी मन-मोकळेपणाने बोलता आले पाहिजे. मित्र-मैत्रिणीही जपता आले पाहिजे. संकटाच्या वेळी तेच तर उपयोगी पडतात आणि मदतीला येतात ना!
- गायत्री चे. वाणी
समुपदेशक
म.ए.सो. व्यक्तिमत्व विकास केंद्र, पुणे