बालनाट्यातील प्रकाशयोजना

शिक्षण विवेक    25-Nov-2021
Total Views |

baalnatyatil prakashyojan 
नाटकाचा मुख्य घटक म्हणजे नाटकाची संहिता, त्यानंतर वर्णी लागते ती कलाकार आणि प्रेक्षकांची. साधारणत: नाटकासाठी हे तीन महत्त्वाचे घटक मानले जातात. नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, रंगभूषा, वेशभूषा यांचं स्थान तसं दुय्यम म्हणून गृहीत धरलं जातं. किंबहुना ते योग्यही असू शकेल. परंतु या दुय्यम घटकांना इतर सर्व घटकांची सांगड घालून एखादं नाटक उभं राहिलं, तर चांगलं नाटक उत्तम होण्यासाठी मदत होते.
प्रकाशयोजना हा दुय्यम घटक असला तरी त्यास नाटकात एक विशेष स्थान आहे. रंगमंचावरील घडणार्‍या घटना, कलाकारांच्या हालचाली, त्यांच्या चेहर्‍यावरील भाव स्पष्टपणे आणि ठाशीवणे प्रेक्षकांना दिसाव्यात आणि अनुभवता याव्यात म्हणून प्रकाशयोजना गरजेची आहे.
प्रकाशयोजना म्हणजे काय? : प्रकाशयोजना म्हणजे नाटकातील महत्त्वाचे प्रसंग प्रकाशाची योग्य साथ देऊन अर्थपूर्णरीत्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करणे. त्या दृष्टीने लाइटस डिझाइन करता येते. मोठ्यांचे नाटक असो किंवा बालनाट्य प्रकाशयोजनेची गरज तितकीच असते. संहिता, विषय, कलाकार यातच काय तो फरक असतो.
प्रकाशयोजनेचे साहित्य : प्रकाशयोजनेत सर्वप्रथम आवश्यक असते ते स्पॉट आणि पार. प्रखर आणि लख्ख प्रकाश निर्माण करण्यासाठी स्पॉट लाइट किंवा पार वापरतात. हे स्पॉट बॅटमला (अँगलच्या साहाय्याने लावलेले आडवे बांबू किंवा लोखंडी खांब) लावलेले असतात. साधारण तीन ते चार बॅटमची व्यवस्था असते. स्पॉट जमिनीवर किंवा स्टँडवरदेखील आपल्याला हव्या त्या उंचीवर लावता येतात. स्पॉटलाइट आपल्याला हव्या त्या प्रमाणात कमीजास्त करता येते. मात्र पारलाइटमध्ये तशी सोय नसते. प्रसंगानुसार प्रकाशाची तीव्रता आणि सौम्यता नियंत्रण करण्यासाठी डिमरचा वापर करता येतो. काळानुसार डिमर्समध्येही बदल होत गेले. लिव्हर, बरणी, स्लायडर आणि हल्ली ऑटोमॅटीक डिमर कन्ट्रोल उपलब्ध आहेत. संगणकाच्या साहाय्याने प्रकाशाची तीव्रता, वेग, वेळ नियंत्रित करता येतो.
प्रकाशयोजना ही मुख्यत: रंगमंचारवरील कलाकार दिसण्यासाठी आणि प्रसंगाला अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी असते. त्यामुळे त्याची रचना करताना कोणत्याही कलाकाराची सावली दुसर्‍या कलाकारावर पडणार नाही याची काळजी प्रकाश योजनाकाराने घ्यायला हवी. यासाठी प्रकाशाची दिशा म्हणजेच अँगल लक्षात घेणे महत्त्वाचे असते. कोणत्या स्पॉट कोणत्या बॅटमवर असावा, तो किती अंश कोनात असावा, त्याची तीव्रता किती असावी याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. उदा., संपूर्ण रंगमंच प्रकाशित करायचा असेल तर पाहिल्या बॅटमचा वापर करून डाव्या बाजूच्या स्पॉटने रंगमंचाची उजवी बाजू आणि उजव्या बाजूच्या स्पॅटने रंगमंचाची डावी बाजू प्रकाशित केल्यास रंगमंचाचा जास्तीत जास्त भाग प्रकाशित करता येतो. शिवाय कलाकारांवर एकमेकांची सावलीही पडत नाही. त्यामुळे अँगलच्या योग्य कोनाचा वापर करून कमीत कमी स्पॉटचा वापर करून प्रकाशयोजना करता येऊ शकते. वेळही वाचण्यास मदत होते.
प्रकाशयोजना आणि नाटकाचे इतर दुय्यम घटक :
प्रकाशयोजना करताना इतर दुय्यम घटकांचाही तितकीच मदत होते. नाटकाची प्रकाशयोजना बहुतेक प्रसंगी नेपथ्यावर अवलंबून असते. नेपथ्यावरून प्रसंग घडण्याचे ठिकाण दर्शवण्यास मदत होते. त्यानुसार प्रकाशाची रचना करता येते. उदा., एखाद्या प्रसंगात भांडण किंवा एखाद्या प्राण्याने केलेला हल्ला दाखवायचा असल्यास संगीत आणि प्रकाशाच्या एकत्रित वापराने तो प्रसंग अधिक उठावदार होतो. रंगभूषा आणि वेशभूषा यांमुळे कलाकारांच्या हालचाली, चेहर्‍यावरील हावभाव स्पष्ट होण्यास मदत होते.
रंगाचे महत्त्व : प्रकाशयोजनेतील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे रंग, रंगमंचावर पडणार्‍या प्रकाशाचा रंग नाटकाला अधिक उठवदार आणि अर्थपूर्ण करतो. प्रत्येक रंगाची एक वेगळी ओळख, व्याख्या असते. त्यानुसार घडणारा प्रसंग त्यातील तीव्रता लक्षात घेऊन त्याला अनुसरून योग्य तो रंग निवडण्यात येतो. त्या रंगीत प्रकाशामुळे त्या प्रसंगाला अर्थ आणि वजन प्राप्त होते. उदाहरण द्यायचे झाले तर एखादा रात्रीचा प्रसंग असेल तर साधारण अंधुक प्रकाशात निळा रंग वापरून रात्र दाखवता येते. निळ्या रंगाऐवजी जांभळा किंवा इतर कोणताही रंग वापरल्यास तो प्रसंग रात्री घडतोय हे सिद्धच होणार नाही. प्रत्येक रंगाची एक वेगळी ओळख असल्याने रंगाचा योग्य वापर होणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. लाल म्हणजे धोका, निळा म्हणजे स्वप्न किंवा रात्र अंबर म्हणजे रात्री बाहेर असलेला दिव्याचा प्रकाश वगैरे वगैरे.
रंगमंचाच्या मागील बाजूस पांढर्‍या रंगाचा पडदा लावलेला असतो त्याला साइक किंवा साइक्लॉन म्हणतात. या पांढर्‍या रंगाच्या पडद्याचा वापर करून सावल्यांचा खेळ किंवा विशिष्ट ठिकाण दाखवता येते.
या सगळ्या साहित्यांचा, विचारांचा योग्य तो आणि योग्य त्या प्रमाणात वापर करून नाटकाला साजेशा प्रकाशयोजनेतून नाटकाचा अर्थ लक्षात घेऊन त्यानुसार घडणारे प्रसंग, दृश्य सुंदर आणि ठाशीव दिसणे महत्त्वाचे आहे. फक्त दृश्य सुंदर दिसणे हा हेतू नसावा. नाटकाला अनुसरून त्याच्या अर्थानिशी दृश्य सुंदर दाखवण्याची जबाबदारी प्रकाशयोजनाकाराची असते.
तांत्रिक बाजूंचा भडिमार नाटकावर होऊ देऊ नये. त्याने नाटकाचा विषय, आशयाला धोका पोहोचण्याचीच शक्यता असते. संपूर्ण नाटकाचा अर्थ लक्षात घेऊन प्रत्येक प्रसंग, दृश्य सुंदर करण्यात यावेत. या अशा प्रत्येक सुंदर दृश्यामुळे पूर्ण नाटक अर्थपूर्ण सुंदर होण्यास मदत होते.
 
- हृषिकेश वायदंडे