पाचवीतली रमा शाळेतून घरी आली, तेव्हा आजी जुने कपाट आवरत होती. आजीकडे एवढ्या जुन्या वस्तू होत्या की, रमा डोळे विस्फारून पाहतच राहिली. जुन्या साड्या, दागिने खूप काही गोष्टी होतं आजीकडे. एका छोट्या डब्यात होते सागरगोटे! रमाने तो डबा उघडला तशी आजी भलतीच खूश झाली. ‘माझ्या लहानपणीचा हा खेळ आहे, माझ्यासाठी खूप मौल्यवान, आठवणीतला खेळ आहे.’ आजी रमाला सांगत होती. ‘खेळ’ हा तर रमाच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे रमाला उत्सुकता वाटत होती. क्रिकेट, फुटबॉलमध्ये रमणार्या रमाला, हा खेळ काही वेगळाच वाटत होता.
आजी रमाला सांगू लागली, ‘मी तुझ्याएवढी होते तेव्हा मैत्रिणींसोबत सागरगोटे, काचापाणी, सारीपाट असे घरातले आणि संध्याकाळी अंगण सारवून ‘लगोरी’ खेळायचे. कोणतेही महाग क्रीडासाहित्य, कपडे विकत न घेता आम्ही हे खेळ खेळायचो. या पारंपरिक खेळांमुळे निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवता येत होता, मोकळ्या हवेत खेळल्यामुळे कधी सर्दी-खोकला झालाच नाही. परकर-पोलक्यातच आम्ही पोहायला जायचो. विहिरीत उड्या मारायचो. वडाच्या सावलीखाली ‘सुरपारंब्या खेळायचो.’ आजी भरभरून बोलत होती, आपले अनुभव सांगत होती. रमालासुद्धा सारे ऐकून मजा येत होती.
आजी रमाला म्हणाली, ‘जशा कपाटात आपण ठेवणीतल्या साड्या ठेवतो, तसेच या पारंपरिक खेळांचे महत्त्व आपण आपल्या ‘मन’ नावाच्या कपाटात जतन करून ठेवायचे असते. रमाने मग लगेचच आजीच्या बोलण्याला दुजोरा देत मान हलवली. आजीच्या आठवणींमुळेच आज रमाला या पारंपरिक खेळांचे महत्त्व समजले होते. रमाने आजीकडून ते सागरगोटे घेतले आणि मैत्रिणींना गंमत दाखवण्यासाठी रमा झुळकीसारखी निघूनही गेली. ती जाता जाता आजीच्या चेहेर्यावर छानसे हसू पसरले.
- श्रिया अभिजित बर्वे