चहाचा भरलेला कप

शिक्षण विवेक    15-Dec-2021
Total Views |

chahacha bharlela cup_1&n 
 हसू आले ना वाचून? पण खरंच चहाचा भरलेला कप हा माझा मित्रच! मी बोलते खूप, तो ऐकून घेतो. मी सांगते मनातले, तो हुंकार भरतो. मधेच चटका देऊन शांत मंथन करायला लावतो. मी असं का वागले हे समजावणं जिथे गरजेचं नसतं; पण गरज समजलेली असते. असं नातं म्हणजे मैत्री. पाठलाग दिसला नाही तरी असतो, जिव्हाळा दिसला नाही तरी असतो. असं नातं म्हणजे मैत्री.
असाच आहे माझा मित्र. काही खुट्ट झाले, मनासारखे घडले बिघडले तरी त्याला समजतेच. नुसते त्याला हातात घेतले तरी त्याच्या उबदार स्पर्शाने तो आश्‍वस्त करतो मी आहे अगदी शेवटपर्यंत. दिवस कितीही धकाधकीचा असला तरी त्याच्याशी बोलल्याशिवाय रहावतच नाही. माझ्या कित्येक कविता, लेख हे त्याच्याबरोबर असतानाच सुचले आहेत; किंबहुना त्यानेच ते सुचवले आहे असे म्हणणे जास्त योग्य ठरेल.
मन अशांत असताना त्यानेच तर मन:शांती आणली आहे. तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा असतो. सर्वांसमोर असतो तेव्हा त्याची सोबत असते वेगळी, एकटे असताना कानउघडणी करतो, मनसोक्त रडावेसे वाटले की फक्त उबदार स्पर्श, हसावेसे वाटले तर माझेच प्रतिबिंब दाखवतो. मैत्री हक्काने घेते. मैत्री अधिकार देते, मैत्रीत खात्री असते. मैत्री गमवण्याची भीती नाही देत, कारण मैत्रीमागे कारण नसतं, असाच तो कायम असतो माझ्यासोबत. रंगरुपाची अट नसणार्‍या मैत्रीचं रूप देखणं असतं, त्यामुळे तो मला जास्त भावतो तो परीक्षा घेत नाही फक्त मार्ग दाखवतो.
मैत्री कधी आवरत नाही, ती सावरते; म्हणूनच मैत्री कधी बोचरी वाटत नाही असाच सावरण्यासाठी तो असतो त्यामुळे मी निर्धास्त असते. आयुष्यात प्रत्येक पाऊल सांभाळून विचारपूर्वक टाकण्याचा मंत्र देतो. सकाळ, संध्याकाळ रोजचीच असते, मात्र त्याचे वेगळे अर्थ ही मैत्री सांगते.
चुकल्यावर बोलावं, बोलल्यावर ऐकूण घ्यावं. एकांतात बसल्यावर अंतरंगात डोकवावं या कपाने शिकवले मला. जिथे काही न गमावता, फक्त कमावता येते अशी आमची मैत्री. निखळ मैत्रीतली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर त्यातली सहजता, त्या सहजतेमधूनच सुरक्षितपणाची भावना कायम मनात असते. चहाचा कप हातात घेतल्यावरच ती सुरक्षितता जाणवायला लागते. मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कर्षबिंदू ठरला आहे माझ्या बाबतीत आणि तो असाच कायम राहो.
- अश्‍विनी वैद्य, पालक,
माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी विद्यालय