पेरुवाल्याची हुशारी

शिक्षण विवेक    15-Dec-2021
Total Views |

peruvalyachi hushari_1&nb 
शैलेश बेचैन होता. शाळेला उशीर झाला होता. आज शाळेत सरांनी वडिलांना घेऊन यायला सांगितले होते. कारण शैलेशने शेवटची तारीख उलटून गेली तरी शाळेची फी भरलेली नव्हती. शिवाय त्याने सरांना अनेकदा उद्धटपणे उलट उत्तरे दिलेली होती. एकदा त्याने वर्गाचा शिस्तप्रिय मॉनिटर, सौरभच्या दप्तरातून पैसे चोरले असल्याचा सौरभला संशय होता. सौरभने ही गोष्ट सरांना सांगितली होती. या सगळ्या कारणांसाठी शैलेशला वडिलांना किंवा आईला घेऊन यायला सांगण्यात आलेले होते. त्याच्या वडिलांनी त्याला फीसाठी 10 दिवसांपूर्वीच पैसे दिलेले होते; पण त्याने ते शाळेत जमाच केले नव्हते.
वडिलांचा तयार कपड्यांचा छोटासा व्यवसाय होता. ते सायकलला कपड्यांच्या पिशव्या बांधून बाजारातल्या चौकात उभे राहून कपडे विकत. त्यात टी-शर्ट, बर्म्युडा, केप्री, कुर्ती वगैरे कपडे असतात. कधी चांगला धंदा होतो तर कधी एकसुद्धा कपडा विकला जात नाही; पण ओढगस्तीचा संसार असूनही त्याच्या वडिलांनी त्याला चांगल्या शाळेत घातले होते. मोठ्या कष्टाने मिळवलेले पैसे त्यांनी शैलेशच्या हातात फी भरण्यासाठी दिले होते. शैलेशची आई साडीला फॉल-पिको करून देण्याची कामे करते. पाचवी-सहावी शिकलेली ती माऊली साधी-भोळी आहे. तिला शाळेत आणले तर तिला सरांशी काय बोलावे, हे मुळीच सुधरणार नाही आणि इतरांचे मात्र मनोरंजन होईल त्यामुळे त्यातल्या त्यात बाबा आले तर ठीक असे शैलेशला वाटले.
हल्ली शैलेशला आपल्या आईबापाची लाज वाटू लागली होती. बापाने शाळेच्या फीसाठी दिलेल्या पैशातले काही पैसे त्याने मित्रांच्या नादाने उडवले होते. त्याच्या एका मित्राने गोड गोड बोलून त्याला आधी वश केले. त्याचा विश्वास संपादन केला. मग पैसे लावून पत्ते खेळायला बोलावले. ‘अरे, लाव पुढचं पान. ते जर जिंकलास तर तुझ्या बापाने दिलेल्या पैशाच्या दुप्पट रक्कम मिळेल!’ खंडू म्हणाला. शैलेशलाही मग नाही म्हणता आले नाही. म्हणतात ना, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी!’ झालं! त्या डावातही शैलेश हरला आणि आणखी एक दोनशेची नोट गमावून बसला. धटिंगणांकडून मार आणि शिव्या खात कसाबसा तो तिथून निसटला.
विचार करून करून शैलेश थकला होता. शाळेच्या अलिकडच्या चौकात पोचल्यावर एका पिंपळाच्या झाडाच्या पारावर बसलेला पेरूवाला त्याला दिसला. त्याच्याकडून त्याने एक पेरू विकत घेतला. तिथेच पलिकडे असलेल्या एका बाकड्यावर तो मटकन बसला. पेरूवर लावलेल्या लाल तिखटामुळे त्याच्या तोंडाला पाणी सुटले होते. त्यानं कचाकच पेरू खाल्ला, तेव्हा कुठं त्याला बरं वाटलं. शाळा भरून अर्धा तास झाला होता. सगळीकडे सामसूम झाली होती. सगळे विद्यार्थी आपापल्या वर्गात बसून तालासुरात प्रार्थना म्हणत होते, ‘आता विश्वात्मके देवे।’ शैलेशला प्रार्थनेचा तो सुपरिचित सूर ऐकून तंद्रीच लागली. पेरूवाला त्याची घालमेल बघत होता. चार-पाचच पेरू उरले होते. ते विकले की घरी जायचं असं तो मनाशी म्हणत होता.
सरांसमोर कुठला बाबा उभा करावा, जो माझी बाजू घेईल? हा मोठाच प्रश्न होता त्याच्यापुढे! ‘आपल्या खर्‍या बापाला आणणं तर शक्यच नाही. एक तर त्याने आपल्याकडे पैसे दिलेले होते आणि आपण त्यातले काही पैसे पत्त्यांवर उडवले, हे जर त्याला कळले तर तो आपल्याला मार देईल!’ शैलेश मनाशीच पुटपुटला. त्यानं खिशात हात घातला आणि खिशातल्या नोटा तपासून पाहिल्या. मगाशी खंडूशी झालेल्या झटापटीत त्यातल्या दोन नोटा खंडूने हातोहात मारल्या होत्या. शिवाय शैलेशला बदडले होते. पहिल्यांदा खंडूने त्याच्या मुस्काटात लगावली, तेव्हा त्याच्या डोळ्यांपुढे विजांचा लखलखाट झाला होता. कितीतरी वेळ त्याला अवघडलेली मान सरळच करता येत नव्हती. कंबरेत कळा मारत होत्या.
कसाबसा सायकल हाकत तो शाळेपाशी पोचला होता. ‘‘सरांनाही नेमका आजच बाप हवा आहे. कुठून आणू बाप?’’ तो म्हणाला. पेरूवाल्याने दचकून त्याच्याकडे पाहिले. त्याच्या कानावर त्यातले काही शब्द गेले; पण त्याला नीट समजले नाही. पेरूवाला म्हणाला, ‘‘काय रं, काय म्हनालास?’’ शैलेशने चमकून पेरूवाल्याकडे पाहिले आणि त्याच्या डोक्यात कल्पनेची घंटा वाजू लागली. ‘पेरूवाल्यालाच आपला बाप म्हणून उभे केले तर? हा शाळेच्या अलिकडच्या चौकात पेरू विकतो. हा काही आपल्या शाळेबाहेर बसणारा नेहमीचा पेरूवाला नाहीये. त्यामुळे सरांच्या लक्षात येणार नाही. बाकी कुणाच्याही लक्षात येणार नाही. आपले आई-बाप फारसे कुणाला माहितही नाहीत. आपला बाप इतक्या वर्षांत एक-दोनदाच शाळेत आलाय. तो ना कधी पालकसभेला आला, ना कधी स्नेहसंमेलनाला. कामधंदा सोडून शाळेत आला तर कमाई जाते, मग खायचे काय? असं म्हणतो! आई तर फारच लाजाळू. तीसुद्धा एकदाच आली होती. बहुदा मी पहिलीत होतो तेव्हा. आता मी आठवीत आहे. कुणाच्या लक्षातही येणार नाही!’ त्याच्या मनाची खात्री पटली.
‘‘पेरूवाले काका, माझं एक काम कराल?’’
‘‘कंचं काम?’’
‘‘एक दिवसासाठी माझा बाप बनाल का?’’
‘‘काय? येक दिसाचा बाप?’’
‘‘होय. मी तुमच्या पाया पडतो, व्हा ना माझा बाप’’ शैलेशने पेरूवाल्याचे पाय धरले. मग शैलेशने त्याला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा कुठे तो पेरूवाला कसाबसा तयार झाला!
शैलेश म्हणाला, ‘‘तुम्ही म्हणा की, पोराच्या हातून चुकून हरवल्या काही नोटा. मी पुढल्या महिन्यात फीचे पैसे भरीन. आत्ता आहेत तेवढे पैसे घ्या आणि पोराला वर्गात बसू द्या’’
पेरूवाल्याने मान डोलावली. म्हणाला, ‘‘हे बग पोरा, तुजा येक दिसाचा बाप व्हायला तयार हाय म्या. पन शपथ घे, वंगाळ पोरांच्या संगतीनं पत्ते खेळणार नाय, वंगाळ काम करनार नाय, घे शपथ.’’ पेरूवाल्याने त्याला दमात घेतले. शैलेशचा नाइलाज झाला. त्याने शपथ घेतली.
तेवढ्यात पेरूवाला म्हणाला, ‘‘आरं पोरा, येक सांग. ह्ये तुज्या बापाचं सोंग केल्याबद्दल तू मला काय देणार?’’ शैलेशच्या तोंडाचा एकदम आ झाला. काय उत्तर द्यावे त्याला कळेनासे झाले. त्याच्या डोक्यातला विचारांचा भुंगा त्याचा मेंदू पोखरू लागला. त्याचा चेहरा फिकुटला नि तो मटकन बाकड्यावर बसला. ते पाहून पेरूवाला गडगडाटी हसला. म्हणाला, ‘‘चल, काई नगं देऊस मला. चल जाऊ तुज्या साळंत.’’
मग दोघे त्याच्या सायकलवर डबल सीटने शाळेच्या गेटजवळ पोहोचले. पहारा देणार्‍या शिपायाने अडवले, तेव्हा पेरूवाला ठसक्यात म्हणाला, ‘‘बाप हाय मी त्येचा. मास्तरान्ला भेटायला आलोय.’’ त्याचा जरबेतला आवाज ऐकून शिपाई आणि साक्षात शैलेशसुद्धा चाट पडला. त्याने आपल्या तोतया बापाकडे अभिमानाने पाहिले. आता आपले हे नाटक व्यवस्थित पार पडणार, याची शैलेशला खात्री पटली. शिपायाने आत जायला परवानगी दिली. दोघेजण वर्गाजवळ आले. काळे सर फळ्यावर काहीतरी लिहीत होते.
‘‘आत येऊ का सर? मी माझ्या वडिलांना घेऊन आलोय.’’ शैलेश अदबीने म्हणाला. सरांनी वळून पाहिले. आत यायची खूण केली. दुसर्‍या बाकावर बसणारी सुजाता शैलेशकडे आणि बापाकडे बघतच राहिली. ते पाहून शैलेशच्या तोंडाला कोरड पडली. सुजाता आपल्या घराजवळच राहते. ती आपल्या खर्‍या आईबापाला ओळखते.
तेवढ्यात तोतया बाप खड्या आवाजात सुरूच झाला! ‘‘मास्तरसाहेब, एक डाव माफी करा लेकराला. म्या कष्ट करून त्येला फीची रोकड दिल्ती; पण...पण...पण...’’ बापाला पुढचे काही सुचेना! तो नुसतेच हातवारे करू लागला. शैलेशला बापाचे नाटक बेहद्द आवडले. त्याला मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. काळे सर आणि सगळा वर्ग बापाकडं ‘आ’ वासून बघतच राहिला.
तेवढ्यात बाप शैलेशच्या जवळ आला. आता हा आपल्याला कुरवाळणार आणि नाटक पार पाडणार, असे शैलेशला वाटले. बापाने आपल्या सदर्‍याच्या बाह्या मागे सारल्या आणि आणि एकाएकी शैलेशला एक जोरात कानाखाली लगावली. सुजाताला हसूच आले.
बाप लेकाचा कान पिरगाळत म्हणाला, ‘‘हे बघ शैल्या, तू येकवेळ नापास झालास तरी चालंल, पन तू चोर, जुगारी, लफंगा झालास तर याद राख. आमच्या समद्या कष्टावर बोळा फिरवू नगंस, समजलं काय?’’ असं म्हणून बापाने त्याचा दुसरा गालही लाल केला. सगळा वर्ग अवाक् झाला. सरसुद्धा. बापाच्या अनपेक्षित पवित्र्याने रडवेला झालेला शैलेश थरथरू लागला. बाप ठरवल्यासारखे न बोलता भलतेच बोलला. वर्गात सर्वांसमोर थोबाड फोडून आपला अपमानही केला म्हणून शैलेश चिडला; पण गप्प राहिला. शेवटी सर म्हणाले, ‘‘काका, शांत व्हा. पुढच्या महिन्यात उरलेली फी भरा. पोराला उगाच मारू नका.’’ मग बापाचा चेहरा खुलला. तो सरांच्या पाया पडला.
‘‘देवमानूस हैत तुमी. येतो म्या.’’ असे म्हणत वर्गाबाहेर पडला. शैलेश खालीमानेने बेंचवर बसला. सर शिकवू लागले.
शाळा सुटल्यावर सुजाताने शैलेशला एकट्याला गाठले. म्हणाली, ‘‘नाटक आवडलं. काहीही म्हण, त्या एक दिवसाच्या बापानं तुला जबरी मार दिला, म्हणूनच कुणाला संशय आला नाही. जबरदस्त अभिनय!’’ शैलेशनं मान डोलावली. एकाच दिवसात तो वर्गाबाहेरचे आणि वर्गातले अनेक धडे शिकला.
- आश्लेषा महाजन