खेळीयाड

शिक्षण विवेक    17-Dec-2021
Total Views |

kheliyaad_1  H  
खेळ खेळत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. जवळपास सर्वांनीच किती जास्त खेळतेय/खेळतोस आणि अभ्यास किती कमी करताय म्हणून मार खाल्लेला असतोच. नाहीतर शाब्दिक फटकारे तरी खाल्लेले असतातच. तर खेळाचं नाव जरी ऐकलं किंवा विषय जरी निघाला, तरी डोळ्यांपुढे खेळाचं मैदान, खेळाडू, पंच, खेळाचे नियम, प्रेक्षक, तिथं वाजत असलेली वाद्ये इ. चित्रं उभी राहतात. खेळ आहेत तरी किती? अगणित असावेत आणि जगातील सर्व खेळाची माहिती एका व्यक्तीला माहिती असणंही अशक्यच. मानवी संस्कृतीला उत्क्रांतीत सुरुवातीला करमणूक, विरंगुळा किंवा फावल्या वेळात मनोरंजन म्हणून खेळल्या जाणार्‍या गोष्टीने आयुष्यच व्यापून टाकलं ते कळलंच नाही. खेळाची करियर आणि स्पर्धात्मक म्हणून सुरुवात बहुतेक ग्रीक राजवटीच्या काळात झाली असावी असा ज्ञात इतिहासातल्या नोंदीवरून दिसते. आपल्या भारतात खेळाच्या नोंदी पुराणापासून आढळून येतात. त्यात घोड्यांच्या शर्यती, तलवारबाजी, कुस्त्या, मल्लयुद्ध इत्यादी खेळ प्रामुख्याने दिसतात. खेळाची उत्क्रांती ही त्या त्या देशातील नैसर्गिक स्थिती, तेथील वातावरण, तिथल्या लोकांची शरीरयष्टी, उपलब्ध संसाधने या गोष्टींच्या आधारावर अनेक स्थानिक खेळ विकसित होत गेले. त्यातील बर्‍याच खेळांचे स्वरूप व नियम हे तर गावागणिक बदललेले दिसून येतात. या खेळांना जागतिक स्तरावर स्पर्धेच्या स्वरूपात आणलं ते ऑलिंपिकने! ही स्पर्धा कित्येक शतकांपूर्वी सुरू झाली असली तरी या स्पर्धेने काळानुसार बदलत जाऊन आजच भव्यदिव्य व खर्‍या अर्थाने जागतिक स्वरूप प्राप्त केले आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेबरोबरच विविध जागतिक, आंतरखंडीय, राष्ट्रकुल, राष्ट्रीय, राज्य व जिल्हा शालेय, हौशी इ. स्तरावर स्पर्धा आयोजित केल्या जातात.
हे झालं मैदानी खेळाबद्दल.... खेळ म्हणजे केवळ ताकदवान, धष्टपुष्ट व हट्ट्याकट्ट्या लोकांचा खेळ असतो असं नाही. मैदानी खेळ खेळतानाही प्रतिस्पर्धी खेळाडूंवर शारीरिकदृष्टीने मात करण्याबरोबरच मानसिक विजय मिळवण्यासाठी मनानेही कणखर असावे लागते. जे खेळ इनडोअर असतात, त्यासाठी मग्नताच नाही तर मन, मेंदूचा दमसास पणाला लावला जातो....त्यात जुन्या द्यूत, शतरंज, सोंगट्या, गंजिफा इ. जवळपास काळाच्या पडद्याआड गेलेले खेळ व अलीकडचे बुद्धीबळ, कॅरम, पत्ते, ते सापशिडीसारख्या खेळांचा समावेश होतो... साधारणतः वयानुसार खेळांचं स्वरूप बदलत जातं. लहानपणी बाहुला-बाहुलीच्या खेळापासून याची सुरुवात होऊन चिखलाची खेळणी बनवणे, शिवणापाणी, लपाछपी, गोट्या, भिंगरी इत्यादी बिल्डींगच्या आवारातल्या खेळापासून युवक गटात मैदानी खेळावर केंद्रीकरण होतं. तर जसजसं शरीर वार्धक्याकडे झुकत जातं तसं खेळ बदलत जातात.
बदलत्या काळानुसार व राहणीमनामुळे बरेच खेळ कालबाह्य झालेत. काँक्रीटच्या जंगलात व डांबरीकरणाच्या रस्त्यांमध्ये बरेच खेळ हरवून गेलेत. त्यात सुरपारंब्या, चिरवांग, सुरफाट्या, आंब्याच्या कोयांचं/गोट्यांचं चिल, गोट्या (टणक जागेवर खेळू शकत नाही) गजगे, लेझीम या आपल्याकडील काही खेळांचा दुर्दैवाने समावेश करावा लागतो. शहरांमधून हे खेळ हद्दपार झालेत. काही खेळांनी परिस्थितीनुसार बदलत रूप स्वीकारलं. उदा., चिखल खेळणं (पूर्वी चिखल कुठल्या मातीचा निवडायचा....काळी, लाल की शाडू इत्यादी. खेळणी बनवताना लक्षात यायचं की लाल माती एवढी चिकटून राहात नाही. काळ्या मातीपासून चांगली खेळणी बनतात, पण ती वाळली की चिरतात. शाडूमाती सर्वांत बेस्ट. पण ती सगळीकडे उपलब्ध होत नाही. त्यामुळे आहे त्यावर भागवून घ्यावं लागायचं. चिखल घरी आणल्यावर त्यातून लहानमोठे खडे बाजूला काढायचे. मग त्यापासून बैल-गाडी, ट्रक, माणसांचे पुतळे इ बनवलं जायचे. याची जागा आता रेडीमेड क्ले नि घेतलीय, अन् त्याचे आयते साचे. खेळ तोच फक्त त्याने कात टाकली. नवीन खेळात हात बरबटायची भानगडच उरली नाही. तसचं काहीसं बुद्धिबळ, शतरंज या खेळाबाबत. हे खेळ खेळायला 2-4 जणांची गरज लागत नाही. संगणक किंवा मोबाईलमध्ये डोकं खुपसलं की तोच खेळतो आपल्याबरोबर (बुद्धिबळाच्या विविध गेम्स व ल्युडो ही अलीकडची प्रसिद्ध गेम)... त्यामुळं बदलत्या रहाटगाडग्यांमध्ये सगळेच जुने खेळ कालबाह्य झाले नसले तरी काहींनी आपलं अस्तित्व असं रूपडं पालटून का होईना टिकवून ठेवलं आहे.
पूर्वी खेळांना राजाश्रय दिला जायचा. उदा., शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बांधलेल्या तालमी, खासबाग मैदान! त्यातून अनेक नामांकित मल्ल तयार झाले, ज्यांनी महाराष्ट्राची लाल मातीच नव्हे तर प्रदेशातील मॅटचीही मैदाने गाजवली. आपल्या महाराष्ट्रालाही गुणी व दिग्गज खेळाडूंची परंपरा लाभली आहे. मग ते पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी वा क्रिकेटमधले गावसकर-तेंडूलकर असो. कबड्डी व बुद्धिबळ या खेळातही स्व. शंकरबुवा साळवी व इतरांनी भरपूर योगदान दिले आहे. योग्य संधीच्या अभावी मुख्य प्रवाहात न आलेल्या खेळाडूंची यादी खूप मोठी असेल. अलीकडे शालेय व महाविद्यालयीन जीवनातील टक्क्यांच्या आकडेवारीच्या धबडग्यात खेळ खेळणार्‍यांची संख्या रोडावत चाललेली दिसतेय. याबरोबरच जे खेळ टी.व्ही.वर दिसतात, ज्यांना प्रसिद्धी जास्त मिळत असते, तेच खेळ खेळण्याकडे पालकांचा व पर्यायाने पाल्याचाही कल वाढलेला दिसतो. मग तो खेळ महागडा व आपल्याला न परवडणारा असला तरी. असे खेळ केवळ जिंकण्यासाठी व पदके मिळवण्यासाठीच खेळायचे अशा भावनेमुळे खेळ खेळण्याच्या मूळ भावनेकडे, खेळातून मिळणार्‍या आनंदाकडे, समाधानाकडे मात्र दुर्लक्ष होतं चाललं आहे हे मात्र नक्की! खेळांमुळे आपण शारीरिकदृष्ट्या बलवान राहतोच, पण त्याचबरोबर खेळ आपल्याला सामुहिक, सांघिक जीवन जगायला, दुसर्‍याबद्दल सहकार्याची भावना बळावण्यास, अपयश स्वीकारायला, अडीअडचणी-दु:खे खिलाडूवृत्तीने अंगावर घ्यायला शिकवतात. याचबरोबर खेळ आपल्यामध्ये नेतृत्व, संयम, धाडस, प्रसंगावधानपणा इ. गुण विकसित करतात. शासनही खेळभावना वाढीस लागावी यासाठी प्रयत्नशील दिसते. त्यातूनच बालेवाडीला श्री शिवछत्रपती क्रीडानगरी/क्रीडा संकुल उभारले आहे. तसेच खेळाडूंसाठी नोकरीत 5% आरक्षण मान्य केले आहे. उगवत्या खेळाडूंना विविध शिष्यवृत्त्या, बक्षिसे वितरित केली जात आहेत. त्यामुळे खेळ हे मानवी जीवनातील मोठे गुरू ठरतात. पण या सगळ्याचा अर्थ असा नाही की, खेळ म्हणजे संपूर्ण जीवन आहे. मात्र खेळ इतर घटकांप्रमाणेच जीवनाचा अविभाज्य भाग असावा. केवळ खेळ खेळत आहे म्हणून अभ्यास दुर्लक्षून चालणार नाही. आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या युगात शरीराने व मनाने सक्षम असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपल्यात वाढत चाललेला एकलकोंडेपणा घालवण्यासाठी अशा खेळासारख्या गुरूंना केवळ मोबाईल अन् टीव्हीच्या फ्रेममध्ये मर्यादित ठेवायचं की स्वतःच्या आयुष्याच्या कॅनव्हासवर उतरवायचं हे तुम्हीच ठरवा!!!
 
- सुधीर अडसूळ (पालक)
मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय