अभ्यासाची सप्तपदी

शिक्षण विवेक    23-Dec-2021
Total Views |

abhyasachi saptapadi_1 
विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांच्याच तणावाचा, जिव्हाळ्याचा विषय म्हणजे अभ्यास अभ्यास अभ्यास...
अभ्यास हा विषय असा आहे की, सारी मौजमजा, स्पर्धा, सराव हे सारे आटोपले, जानेवारी सुरू झाला की चोहोबाजूंनी एकच सूचना येते - ‘चला अभ्यासाला लागा’ परीक्षा दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत.
‘असाध्य ते साध्य, करिता सायास, कारण अभ्यास, तुका म्हणे !’
अभ्यासाचा शब्दशः अर्थ ‘सराव’ आहे. ‘अभ्यास’ हा शब्द हिंदी असेल तर त्याचा अर्थ ‘उजळणी’ किंवा ‘सराव’ असा होतो. परंतु ‘अभ्यास’ हा शब्द मराठी असेल तर त्याचा अर्थ ‘एखादा विषय, वस्तू, घटना यांचे सर्व अंगांनी व शास्त्रीय पद्धतीने केलेले चिंतन, मनन व विवेचन म्हणजे अभ्यास होय.’
सोप्या भाषेत अभ्यास म्हणजे जिज्ञासा, निरीक्षण, शिस्त, नियोजन, विचार, योग्य कृती, ध्यास, अनुभव, श्रवण, संभाषण, बुद्धी, हृदयापासून हातातून आविष्कृत होणारी सतर्कता या सर्वांचा परिपाक होय. तसेच अभ्यास म्हणजे का? कधी? कुणी? कोठून? कितीतरी प्रश्नांची ‘उत्तर’ क्रिया होय.
विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाचे टेन्शन न घेता खालील अभ्यासाच्या सप्तपदीच्या पायर्‍यांचे सातत्य राखून ती अंगीकारली तर फलश्रुती नक्की मिळते. करून तर पहा -
अभ्यासाची सप्तपदी
1. उपस्थिती - 100% शाळेत उपस्थिती असेल ही उज्ज्वल यशाची पहिली पायरी.
2. श्रवण - वर्गात शिक्षक शिकवीत असताना एकाग्र चित्ताने श्रवण करणे
3. मनन व चिंतन - जे पाहिले, ऐकले, ग्रहण केले ते सर्व मनात साठविणे व त्याचे सतत चिंतन करणे.
4. वाचन व पाठांतर - वाचन ही प्रमुख पायरी आहे. शाळेत वर्गात शिकवलेला भाग पुन्हा पुन्हा वाचून पक्का होतो.
5. लेखन - टिपणे काढणे, सुसंगत लिहिणे ही कला आहे, लेखनाने माणूस पक्का होतो.
6. आविष्कार - अभ्यास परिपूर्ण झाला की आत्मविश्वास वाढतो. नवीन नवीन कल्पना सुचतात. दुसर्‍याला मार्गदर्शन करता येते व आनंद मिळतो.
7. सातत्य - अभ्यासाचा अर्थच आहे सातत्य.
वरील सप्तपदीप्रमाणे अभ्यास हा मनापासून हवा, आवडीने हवा, स्वतःहून हवा, आयुष्यभरासाठी हवा, माणूसपणासाठी हवा. दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे
अखंड अभ्यासात राहावे, दिसामाजी नवनिर्माण करावे...
- रुपाली माळी, शिक्षक - समुपदेशक,
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड,पुणे.