लातूर : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाईच्या श्री केशवराज शैक्षणिक संस्था, लातूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘राष्ट्रचेतना सप्ताह’ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. सात दिवसांच्या मुलां-मुलींसाठीच्या या विशेष शिबिराचे औपचारिक उद्घाटन 22 डिसेंबर 2021 रोजी झाले. त्यानंतर नावनोंदणी होऊन शिबिरास सुरुवात झाली.
शिबिराअंतर्गत रोज सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांकडून योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार करून घेण्यात आले. त्यानंतर लाठीकाठी प्रशिक्षण व गोफण चालवण्याचे प्रशिक्षणवर्ग घेण्यात आले. विद्यार्थिनीदेखील या प्रशिक्षणास उपस्थित होत्या. कोल्हापूरहून आलेल्या प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून लाठीचे हात करवून घेतले. रोज संध्याकाळी घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यात आले. दुपारच्या बौद्धिक सत्रांमध्ये शिक्षणविवेकचे उपसंपादक मयूर भावे यांनी विद्यार्थ्यांचे लेखनकला, वक्तृत्व आणि कवितालेखन या विषयांवर सत्र घेतले.
शनिवारच्या (25 डिसेंबर) पहिल्या सत्रात मंजुश्री सरदेशपांडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘तुमच्यातले नावीन्य तुम्ही ओळखायला हवे आणि त्यानंतर कल्पकतेवर भर द्यायला हवा’, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यासभेचे अध्यक्ष किरण भावठाणकर यांनी सत्राचा समारोप केला. संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे यांची प्रमुख उपस्थिती या सत्राला लाभली होती.
दुसर्या सत्रात डॉ. अशोकराव कुकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘इंग्रजी माध्यमामुळे समाजाशी नाळ तुटण्याचा धोका असतो. मात्र, संस्थेच्या अशा उपक्रमांमुळे त्या विचाराला छेद दिला जातो आहे’, अशा शब्दांत त्यांनी संस्थेच्या कामाचा गौरव केला. गहिनीनाथ महाराज औसेकर यांची प्रमुख उपस्थिती सत्राला लाभली. तर, डॉ. सुरेंद्र आलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्र घेण्यात आले.
तिसर्या सत्रात महेश पालकर यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भाष्य केले. ‘विद्यार्थ्यांचा विकास वेगवेगळ्या टप्प्यातून होत असतो. समाजासाठी उत्तम नागरिक घडवण्याचे काम शिक्षक करत असतात’, असे त्यांनी सांगितले. कल्पना चौसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्र घेण्यात आले, तर महेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती सत्राला लाभली.
‘भारत रक्षा मंच’बाबत वीणा गोगरी यांनी माहिती दिली. डॉ. हेमंत वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली हे सत्र घेण्यात आले. मोहन शेटे यांनी आपल्या सत्रात इतिहासातील दाखले देऊन विद्यार्थ्यांमधील देशभक्तीची भावना अधिक दृढ केली. विजय चाटुफळे यांच्या अध्यक्षतेखाली ते सत्र घेण्यात आले. मिलिंद सबनीस यांनी ‘वंदे मातरम्’ गीताबद्दलची अधिक माहिती विद्यार्थ्यांना दिली या वेळी त्यांनी चित्रफितीदेखील दाखवल्या. राधेशाम लोहिया सत्राचे अध्यक्ष होते.
रविवारी (26 नोव्हेंबर) अभिनेते, दिग्दर्शक योगेश सोमण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व या विचारांचे आम्ही पाईक आहोत. राष्ट्रउन्नतीसाठी स्वतःपासून प्रयत्नरत राहू या’, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विवेक पालवनकर यांच्या अध्यक्षतेखाली हे सत्र संपन्न झाले.
दुसर्या सत्रात नितीन शेटे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. ‘मी कोण आहे’, हे मी समजून घेतले, तरच माझे ध्येय साध्य होईल. मात्र, ते साध्य होण्यासाठी आपण सक्षम आहोत का?, हे तपासण्याची गरज आहे. ‘मैं नहीं हम’, एवढा मंत्र जरी आपण लक्षात ठेवला तरी, संघटना बांधणीचे काम होईल’, असे त्यांनी सांगितले. अमरनाथ खुरपे यांच्या अध्यक्षतेखाली हे सत्र झाले. चंद्रकांत मुळे यांची विशेष उपस्थिती सत्राला लाभली होती. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांविषयी चर्चासत्र घेण्यात आले. समारोपाच्या सत्रात योगश सोमण यांनी पुन्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधला.