
‘रविवारची छान प्रसन्न अशी सकाळ होती. पिकू आजोबा बंगल्याच्या हॉलमध्ये बसले होते. आजोबांनी घड्याळ्यात पाहिले. अकरा वाजायला अजून दहा मिनिटे शिल्लक होती. हं... आज हा काटा काही पुढे सरकायला तयार नाही बोआ....’’ आजोबांनी मस्तपैकी हात वर ताणून आळस दिला. ही नानी काही अकराच्या ठोक्याशिवाय चहा द्यायची नाही. शिस्त म्हणजे शिस्त. मागच्या जन्मी काय मिल्ट्रीत कमांडर होती की काय... कुणास ठाऊक... मिष्किलपणे पिकू आजोबा स्वत:शीच बोलत होते. तेवढ्यात सोनिया आणि सोहम वरच्या मजल्यावरून खाली आले. दोघांच्याही चेहर्यावर नाराजी अगदी स्पष्ट दिसत होती. ‘‘काय रे सोहम, काय झालं... आं... तुमची तोंडं का अशी उतरलेली... काय गं सोनू, आजींनी आज एरंडेल पाजलंय की काय तुम्हांला...’’ नातवंडांना पाहिल्याबरोबर, आजोबा चहाचे विसरून एकदम चेष्टेच्या मूडमध्ये आले. पिकू आजोबा आणि नानी आजी म्हणजे या नातवंडांची एकदम आवडती दैवते होती. आजोबांना डोक्यावर केस भरपूर आहेत. पण ते अंमळ लवकरच पिकून पांढरेशुभ्र झाले होते. म्हणून ते ‘पिकू’ आजोबा. ‘‘आजोबा.... आधीच नानीनी आमचा रविवार वाया घालवलाय आणि तुम्हाला मजा सुचतेय...’’, सोहम म्हणाला. ‘‘अरे हो हो हो... पण झालं काय ते तरी सांगाल की नाही दोस्तांनो.’’ ‘‘मी.. मी सांगते आजोबा’’, सोनू म्हणाली. ‘‘नाही... मी सांगणार.. मी काय लहान नाही राह्यलोय आता! चांगला नववीत आहे म्हटलं’’, सोहम पुढे सरसावला. सोनिया कॉलेजच्या पहिल्या वर्षाला गेल्यापासून आपल्याला फारच बच्चू समजते असे सोहमला वाटते. आजीची तक्रार आजोबांकडे करायची म्हटल्याबरोबर पोरांना जोर चढला. ‘‘सोहू सोनू भांडू नका रे.. दोघांनीही सांगा..’’, आजोबा म्हणाले. ‘‘अहो आजोबा.. आज रविवार म्हणून आम्ही आमच्या सगळ्या मित्रांना बोलावलं होतं. तबला-पेटी-गाणं... आम्ही किती धमाल करणार होतो माहितीये... पण आजीची भिशी पार्टी आहे आत्ता आपल्याकडे,’’ सोनूने तक्रार मांडली. ‘‘थांबा थांबा.. सगळं आलं लक्षात.. म्हणजे आपल्या हिटलरनं.. आपलं... नानीनं हुकुमशाही करून तुमच्या कार्यक्रमावर गदा आणली म्हणा की...,’’ चेहर्यावर खोटेच गांभीर्य आणत आजोबा म्हणाले. झाले.. नानीला आजोबांनी हिटलर म्हटल्याबरोब्बर तिघांच्याही डोळ्यांसमोर, हिटलरच्या वेषातली नानी उभी राहिली आणि सगळे खो खो हसायला लागले. ‘‘दोस्त लोक... काळजी करू नका.. बोलवा पाहू तुमच्या मित्रांना. मी तुम्हा सगळ्यांना एका वेगळ्याच नानी आजीची गोष्ट सांगतो.’’ आपले आजोबा फारच हुश्शार आहेत याची मुलांना बालंबाल खात्री होतीच. पण आपला येवढा मोठ्ठा प्रश्न त्यांनी इतक्या सहज सोडवल्यामुळे दोघांनाही फारच भारी वाटले. थोड्याच वेळात सगळे मित्र मंडळ आजोबांसमोर दाखल झाले. ‘‘हां तर बच्चांनो... आज मी तुम्हाला नानी आजीबद्दल सांगणारे... पण ती आपली नानी आजी नाही बरं का... ही आजी तामिळनाडू राज्यातल्या कोइंबतूर गावात राहायची.’’ ‘‘हो माहित्ये मला कोइंबतूर.. उटी, कोडाई कॅनॉल या हिल स्टेशनला मागच्या वर्षी आम्ही तिथूनच गेलो होतो.’’ प्रसन्न म्हणाला. ‘‘एकदम बरोबर तर ही नानी आजी, अनेक वर्षांपासून जगभरात ‘योगा आजी’ म्हणून प्रसिद्ध आहे बरं का.. ’’, आजोबा म्हणाले. ‘‘पण आजोबा, योगा तर आत्ता तयार झालं ना पाच वर्षांपूर्वी’’, सोहमच्या वर्गमैत्रिणीची, शर्वरीची शंका. ‘‘पाच वर्षं नाही गं वेडू... पतंजली ॠषींनी पंचवीसशे वर्षांपूर्वीच योगाचं शास्त्र तयार केलंय’’, तिच्या डोक्यावर एक हलकेच टप्पू देत अकरावीतली शांभवी म्हणाली. ‘‘हो ना हो आजोबा?’’ हे सगळं ऐकून आजोबांच्या पांढर्याशुभ्र मिशांमधून एक गडगडाटी हास्य बाहेर पडले. ते म्हणाले, ‘‘तुमच्या दोघींचंही बरोबर आहे. योगशास्त्र खूपच प्राचीन आहे. पण आपले पंतप्रधान मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी खूप प्रयत्न करून जगभरात विश्व योगदिन सुरू केला ना... त्यामुळे शर्वरीला तसं वाटणं साहजिक आहे. तर या आजीचं खरं नाव नानम्मल बरं का. वयाच्या अवघ्या तिसर्या वर्षापासून तिनं आपल्या आजोबांकडून आसनं शिकायला जी सुरुवात केली, ती अगदी परवापर्यंत, म्हणजे शंभरी गाठेपर्यंत...’’ ‘‘बाप रे’’ सगळ्यांनी ‘आ’ वासून एकाच सुरात दाद दिली. ‘‘आणखी गंमत तर पुढेच आहे. ही नानम्मा फक्त स्वत:च योगासनं करून थांबली नाही काही! तिची पाच मुलं, अकरा नातवंडं आणि सत्तावीस पतवंडं अशा सगळ्यांना तिनं उत्तम योगशिक्षक बनवलं. आणि मुलांनो, आणखीन कौतुकाची गोष्ट म्हणजे, आजी फक्त भारतातच योगाचं शिक्षण देऊन थांबली नाही. मलेशिया, सिंगापूर, मस्कत अशा अनेक देशांमधे जाऊन तिनं योगाचा प्रचार, प्रात्यक्षिकं, रेडिओवर भाषणं दिली.’’ ‘‘पण आजोबा, हे एवढं मोठ्ठं काम या आजी एकट्या करायच्या का हो?’’, सोहमने उत्सुकतेने विचारले. ‘‘वा!! छान प्रश्न विचारलास! अरे, कुठलंही मोठं काम करायचं असेल तर त्याला घरातल्या सगळ्यांची मदत लागतेच. त्यांचे पती आणि सासुबाईंनीही बरीच मदत केली. नानम्मल जेव्हा लग्न होऊन सासरी गेल्या, तेव्हा तिकडच्या मंडळींना योगाबद्दल फार काही माहिती नव्हती. त्यामुळे फारच मजेशीर प्रसंग घडला!’’ आजोबा आता काय मजा सांगणार याची उत्सुकता सगळ्यांच्याच डोळ्यांत दिसत होती. ‘‘तर सासरी गेल्यावर, सवयीप्रमाणे नानम्मा रोज अगदी भल्या पहाटे उठून स्वयंपाकघरात योगासनं करायला लागल्या.’’ ‘स्वयंपाकघरात?’ सगळी मुले हसायला लागली. ‘‘अरे, एकतर त्यांचं घर छोटं आणि शिवाय कुणाची झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी ही युक्ती केली. पण कितीही केलं तरी थोडाफार आवाज व्हायचाच. त्यांच्या सासुबाईंनी दोन-तीन दिवस ही खुडबुड ऐकली. उंदीर असतील म्हणून दुर्लक्षही केलं. पण नंतर मात्र त्यांना काही राहवेना. एके दिवशी त्यांनी हळूच उठून स्वयंपाकघरात डोकावलंच. आपली नवी सून हे शरीराचे उलटेसुलटे काय प्रकार करते आहे ते त्यांना समजेना. त्यांनी पळतच नानम्मांच्या नवर्याला उठवलं. अरे, उठ उठ! तुझी बायको स्वयंपाकघरात काहीतरी खेळ खेळते आहे. नानम्माचे पतीही उठून पाहायला आले. त्यांना योगातलं फारसं कळत नसलं तरी ती आसनं करते आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि आईला त्यांनी समजावून सांगितलं. हा सगळा प्रकार ऐकताना मुलांची हसून हसून अगदी पुरेवाट झाली. या आजीनं संपूर्ण आयुष्यात दहा लाख लोकांना योग शिकवला. दहा हजार योगशिक्षक तयार केले. भारत सरकारनं त्यांना जानेवारी 2019 मध्ये पद्मश्री हा राष्ट्रीय स्तरावरचा फार मोठा किताब देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला. या आजींचं गेल्याच आठवड्यात, ऑक्टोबर 2019 मध्ये, झोपेत पलंगावरून पडल्यामुळे निधन झालं. आजोबांच्या या गोष्टीत मुले अगदी गुंग झालेली असतानाच सोहमची नानीआजी सगळ्यांसाठी भरपूर खायला घेऊन आली. ‘‘माझ्या भिशीमुळे तुमचं गाणं बजावणं राहून गेलं रे बाळांनो...’’, आजी म्हणाली. ‘‘अगं आजी, बरं झालं... आजोबांनी आम्हांला दुसर्याच एका नानीआजीची कसली भारी गोष्ट सांगितली.....’’ ही दुसरी नानी कोण असा प्रश्नार्थक चेहरा करून आजी आजोबांकडे पाहायला लागली. आजोबा मात्र मुलांपेक्षाही लहान होऊन, तोंडावर हात ठेवून बराच वेळ खुसूखुसू हसत राहिले.
- मनोज पटवर्धन