आजीची माया

शिक्षण विवेक    01-Apr-2021
Total Views |

aajichi maaya_1 &nbs 
 
अमोल आठवीत शिकत होता. आईबाबा दोघेही कामावर जायचे. तो आणि त्याची आजी असे दोघेच दिवसभर घरी असायचे.
आजी दिवसभर बसल्या बसल्या जेवढी जमतील तेवढी कामे करायची. गुडघेदुखीने ती हैराण होती. भाज्या निवडून ठेवा. कपड्यांच्या घड्या करा. जपमाळ ओढा. असं बसल्या बसल्या दिवसभर चालायचं.
एकदा ती चालत आतल्या खोलीत जात असताना ती डावीकडून उजवीकडे नि उजवीकडून डावीकडे अशी हलत हलत चालताना अमोलला दिसली. गुडघेदुखीमुळे तिला सरळ नीट चालता येत नव्हते.
तिचे चालणे पाहून अमोल म्हणाला, ‘आजी, तू पेंग्विनसारखी चालतेस...’आणि हसू लागला. यावर आजी न चिडता म्हणाली, ‘‘काय करणार बाबा? वय झालं आता. तुझ्या वयाची असताना मी नीट चालायचे बाबा. आता या गुडघेदुखीने हैराण झालेय.’’
मग नंतर रोजच अमोल तिला ‘ए पेंग्विन, ए पेंग्विन’ असे चिडवू लागला. ती चिडायची नाही. माफ करायची त्याला. आता तिचं चिडण्याचं वय राहिलं नव्हतं.
एक दिवस तिची चष्म्याची काडी तुटली. तशी ती अमोलला म्हणाली, ‘‘बाळा, मला जरा त्या बाजूला असलेल्या चष्मेवाल्याकडून चष्म्याला काडी लावून आणून दे रे.’’ अमोल म्हणाला, ‘‘ए पेंग्विन, मला आता प्रोजेक्ट बनवायचाय शाळेचा. वीस गुण आहेत प्रोजेक्टला. मी नाही जाणार.’’
आजीने एक दोरा लावला चष्म्याला आणि काम सुरू केलं. आईबाबांना वेळच नव्हता, त्यामुळे अमोल आजीला पेंग्विन म्हणून चिडवतो, हेही त्यांना कळालं नाही. आजीनेही कधी सांगितलं नाही. कारण राग धरून बसायचं आता तिचं वय नव्हतं.
एक दिवस नेहमीप्रमाणे ट्युशन आटोपून अमोल सायकलवरून घरी येत असताना अचानक सायकल स्लीप झाली आणि अमोल जोरदार जमिनीवर आपटला. विव्हळत विव्हळत घरी आला.
आजी घाबरली. त्याला तिने पाणी दिलं. रिक्षावाल्याला फोन लावला. सुनेने इमर्जन्सीसाठी आजीला देऊन ठेवला होता नंबर. एक छोटा मोबाईलही शिकवून ठेवला होता.
रिक्षावाला आला. आजीने अमोलला धरून धरून हळूहळू रिक्षात बसवलं. स्वतःला सावरत सावरत ती अमोललाही सावरत होती. तेवढ्यात शेजारचा साकेत धावत आला. ‘‘आजी काय झालं अमोलला?’’ आजी म्हणाली, ‘‘अरे, पडला तो सायकलवरून.’’ साकेत पटकन रिक्षात बसला. ‘‘मी पण येतो आजी तुमच्याबरोबर.’’, असं म्हणून साकेत दवाखान्यात आजीसोबत गेला.
डॉक्टरांनी तपासलं. गोळ्या दिल्या. ‘‘दोन दिवसात जर दुखणं थांबलं नाही तर एक्सरे काढू’’, असं डॉक्टर म्हणाले.
परत तिघेही रिक्षात बसले. घरी आले. साकेत व आजीने धरून अमोलला बेडवर बसवले.
आजीने ऊन ऊन मऊभात बनवला. अमोलला जेऊ घातलं आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या दिल्या. गोळ्या घेऊन अमोल लगेच झोपायला गेला; पण त्याला झोप लागेना.
‘ज्या आजीला आपण पेंग्विन पेंग्विन चिडवतो, त्याच आजीने आज राग धरून न ठेवता आपल्यासाठी किती केलं! किती माया आहे आजीच्या हृदयात!’
चुकलो मी. यापुढे आजीला कधीच पेंग्विन चिडवायचं नाही.
तो झोपला. आईबाबा आल्यावर आजीने घडलेलं सगळं सांगितलं. आईबाबांना सुद्धा आजीचं खूप कौतुक वाटत होतं. लेकाकडे पाहत पाहत तेही झोपले.
सकाळी ऊठून आईने पटापट सगळ्यांचा डबा केला. बाबांनीही भराभर आवरलं. अमोलला, ‘आज शाळेत जाऊ नकोस. घरीच आराम कर, औषधं घे. खेळायला जाऊ नकोस. असं सांगून आई-बाबा निघून गेले.
जाताना आजीकडे पाचशे रुपये दिले. ‘‘काही लागलं सवरलं तर असू दे म्हणाले.’’
अमोल आठ वाजता उठला. आजी देवाचा जप करत होती. तिला घट्ट मिठी मारली. म्हणाला, ‘‘आज्जी, आजपासून मी तुला पेंग्विन असं चिडवणार नाही. तू माझी फेवरेट आजी आहेस.’’ आज्जी, आज्जी, असं म्हणून त्याने आजीला लाडाने स्वंयपाकघरातून आईने बनवून ठेवलेले पोहे आणून दिले.
‘‘आजी, आता मला बरं वाटतंय, पण आईबाबा म्हणाले की तू आज शाळेत जाऊ नकोस. तुझा चष्मा तुटला होता ना गं. मग आज मी शेजारच्या चष्मेवाल्याकडे जातो. आणि काडी लावून आणून देतो हं.’’
अमोलला उपरती झालेली पाहून व तो बरा झालेला पाहून आजीला खूप बरे वाटले. ती म्हणाली, ‘‘शहाणं आहे गं माझं बाळ ते...’’
- शैलजा भास्कर दीक्षित, सहशिक्षिका
प्राथमिक विद्यामंदिर, मांडा